ग्रामपंचायत निवडणुकीमुळे महाडीबीटी नोंदणीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

28

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.5जानेवारी):-तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी विभागाने आता महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे. अर्ज करण्यापासून तर प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी सध्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

बिलोली तालुक्यातील ६४ गावामध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यामुळे या रणधुमाळीत ग्रामीण भागातील शेतकरी सध्या गुंतलेले असून त्यांनी अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे योजने संदर्भात आजही पाहिजे तशी जनजागृती झाली नसल्याने शेतकऱ्यांना या संदर्भात माहिती नसल्याचे चित्र आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही आधार लिंक नसल्याने अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत त्यामुळे कंटाळून अनेक शेतकरी अर्ज भरत नसल्याचे चित्र आहे यासाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देता यावा, यासाठी महाडीबीटी पोर्टल ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका क्लिकवर अनेक योजनांचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत 31 जानेवारी पर्यंत वाढून देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

एका क्‍लिकवर महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री कृषी शाश्वत कृषी सिंचन योजना, अन्नसुरक्षा अभियान, बिरसा मुंडा, कृषी क्रांती योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आधी योजनांचा लाभ घेता येणार आहे.

शेतकऱ्यांना पसंतीनुसार निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या पोर्टलवर इच्छुक शेतकरी शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास त्यांना नोंदणी करता येते त्यामुळे या महाडीबीटी पोर्टल वरील मर्यादा वाढवून देण्यात यावी अशी मागणी कुंडलवाडी शहर व परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत

◆ अशी करावी लागते नोंदणी
शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला वैयक्तिक मोबाईल नंबर आधार कार्डशी संलग्न करून महाडीबीटी पोर्टल च्या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा शेतकरी स्वतःहून मोबाईल आतला संगणकाद्वारे सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीच्या संग्राम केंद्र आदीच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करू शकतात.