स्वराज्य संकल्पक- मॉ जिजाऊ

28

भारतीय महिलांचे हक्क अधिकार सर्वच हिरावून महिलांना अबला, अक्षम करून हिनतेची वागणूक देणारा भारत एकमेव देश आहे. जातीधर्माला महत्त्व देऊन माणुस व माणुसकीची हत्या करणारे धर्मांध लोक भारत देशातच आहेत. विषमतेच्या उतरंडी खाली मानुस, माणुसकी आणि नैतिकता दबलेली होती. फक्त वरच्याच वर्णाच्या लोकांना सत्ता, संपत्ती, सुख व समाधान उपभोगता येत होते. बाकीच्या वर्णातील लोकांना फक्त चाकरी करून गुलाम म्हणून जगायचं आणि गुलाम म्हणून मरायचं एवढाच अधिकार होता. गुलामांच्या मनाचा, अस्तीत्वाचा आणि मान सन्मानाचा कोणीच विचार करत नसते. म्हणून विषमतावादी व्यवस्थेमध्ये विषमता बळकट करून विशिष्ट वर्णांच्या हाती सत्ता घेऊन धर्माला अवास्तव महत्त्व देऊन राज सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचे कट कारस्थान करणारा वर्ग पुर्वीपासुनच सक्रिय आहे. याच विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात अनेक युगपुरुष यांनी आवाज उठवून विषमतावादी व्यवस्थेला लाथाडून समतावादी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपले योगदान दिलेले आहेत.

परंतु विषमतेला धर्माची जोड देऊन, धर्माला भावनिक बनवले गेले आणि धर्माच्या आडून विषमतावादी व्यवस्था पोसल्या जात आहे. हिच व्यवस्था हानुन पाडण्यासाठी १२ जानेवारी ला एक सुर्य उगवला आणि एका क्रांती चा पर्व झाला तो म्हणजे मॉ साहेब जिजाऊ यांचा जन्म. जिजाऊंच्या जन्माचा आनंद सर्वांनाच झाला होता. म्हणून मॉ साहेब जिजाऊ यांच्या जन्म दिनी हत्तीवरून साखर वाटली गेली. आणि स्त्रि जन्माचे स्वागत किती जल्लोषात करता येते याची जाणीव करून दिली तिथेच विषमतावादी व्यवस्थेच्या छाताडामध्ये लाथ बसली. जिजाऊंचा जन्म म्हणजे व्यवस्था परिवर्तनाची सुरवात होती. ज्या वेळी महिलांना घराबाहेर पडण्याची मुभा या व्यवस्थेने नाकारली होती तेव्हा मॉ साहेब जिजाऊ घोड्यावर बसुन तलवारीचे प्रशिक्षण घेत होत्या. कोणत्याही प्रकारचा भेद न करता जिजाऊंचे बालपण अगदी आनंदाने गेले. परंतु विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात लढून समता प्रस्थापित करून समतावादी व्यवस्थेचे स्वप्न उराशी वाळगलेल्या मा मातेला स्वस्थ बसता येत नव्हते. स्वराज्याचे बघितलेले स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी खुप मोठ मोठे स्वप्न होते. आणि याच स्वप्न पुर्तीसाठी जिजाऊंनी आपले आयुष्य खर्ची घातले.

छत्रपती शिवराय जिजाऊंच्या पोटामध्ये असताना आपल्या पोटी राजा जन्माला येणार याचे स्वप्न बघत होत्या. शिवरायांच्या जन्माने त्यांची स्वप्न पुर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होती. स्वतः च्या मुलाच्या हाती खेळणे आणि खाऊ देण्याच्या वयात तलवार देऊन तु जन्मानेच राजा आहे आणि तुला राजाच बनायचे आहे. याची शिकवन दिली. स्वतः च्या मुलाला घोडेस्वारी, तलवारी वाजी शिकवून आदर्श राजा घडविण्यासाठी मॉ जिजाऊ साहेब सज्ज होत्या. व्यवस्थेच्या विरोधात जाऊन मुलाला शिक्षण देणे, नैतिकता शिकवून आदर्श राजाच नाही तर आदर्श पुत्र घडविला. आदर्श समाजव्यवस्था कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे मॉ साहेब जिजाऊ होत. मुलांवरती संस्कार कसे घालायचे, आपल्या मित्र आणि शत्रुची ओळख कशी करायची, जाती धर्मापलिकडे जाऊन मानव केंद्रीत कार्य कसे करायचे, स्त्रियांचा सन्मान कसा करायचा, शेतकऱ्यांचे व सैन्याचे पोषण कसे करायचे, अशा अनेक प्रश्नांवर उत्तर म्हणजे जिजाऊ आहेत. जिजाऊ जयंती साजरी करताना फक्त फोटो ला हार घालून आणि जोर जोरात जिजाऊंचा जयजयकार करून त्यांचा विषय होणार नाही तर खऱ्या अर्थाने त्यांचा जय तेव्हाच होईल जेव्हा आपण त्यांचे कार्य आणि विचार समजून स्वतः च्या जीवनामध्ये उतरवून. मॉ साहेब स्वतः च्या जिवनामध्ये उतरवल्या तर समतावादी व्यवस्था निर्माण होऊन त्यांचे स्वप्न पुर्ण होण्यास मदत होईल.

त्यामुळे जिजाऊंचे कार्य आणि विचार व आजची समाजव्यवस्था याचा तुलनात्मक अभ्यास करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवरायांना जिजाऊंनी नैतिकता शिकवली होती. कोणत्याही चांगल्या कामाची सुरवात स्वतः च्या घरापासून झाली तर येणारी पिढी संस्कारमय बनत असते. जिजाऊंनी शिवरायांना शिक्षण दिले, महिलांचा मान सन्मान आदर करण्याची शिकवण दिली तर छत्रपती शिवराय यांनी शत्रुच्या महिलेचा देखील सन्मान केला. याचे कारण आईचे संस्कार. महिला हि महिला असते तिच्या कडे बघताना आणि सन्मान करताना जात धर्म वर्ण वंश वा नातलग असा भेद न करता स्त्रियांचा सन्मान करावे एवढीच शिकवण छत्रपती शिवरायांना दिली. ज्या देशात ज्या राज्यात शत्रुच्या महिलांचा सन्मान केला गेला आणि त्याच राज्यात आपल्याच महिलेलेवर आपणच बलात्कार करत असु तर हे खुप लाजिरवाणे आहे. बलात्कार करताना, किंवा एखाद्या युवतीला महिलेला कोणी छळताना ज्यांचे रक्त गरम होत नाही तो जिजाऊंचा आणि छत्रपतींचा मावळा होऊ शकत नाही. आजही प्रत्येक महिलेने आपल्या मुलावर जिजाऊ सारखे संस्कार जर केले तर महिला सुरक्षित व संरक्षित राहतील.

आपला शत्रु कोण याची ओळख सुद्धा जिजाऊंनी छत्रपती शिवराय यांना करून दिली होती. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारे छत्रपती शिवराय सर्वांना परिचित आहेत परंतु कृष्णा भास्कर चे दोन तुकडे करणारे छत्रपती शिवराय जेव्हा आम्हाला कळतील आणि आम्ही तुलनात्मक अभ्यास करू तेव्हा आमच्या लक्षात येईल की छत्रपती शिवराय हे कोणताही धर्माच्या विरोधात नसुन व्यवस्थेच्या विरोधात होते. आणि शत्रु जात धर्म बघून नाही तर कर्म बघून निश्चित केला जातो याची शिकवण सुद्धां जिजाऊंनी दिली होती. आपण राजा जरी झालो तरी माणुस असतो आणि याची जाणीव सतत रहावी याची शिकवण जिजाऊंनी शिवरायांना दिली. राजा असुन सुद्धां शेतकऱ्यांच्या मेथीच्या झाडाला हात न लागु देणारा एकमेव आदर्श राजा फक्त छत्रपती शिवराय होत. आपण राजा असलो तरी राज्यातील संपती ही रयतेची आहे म्हणून ती गहानात टाकणार नाही एवढा दुरदृष्टीचा राजा घडवून आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी जिजाऊ झटल्या.

आजच्या परिस्थितीचा आपण आढावा घेतला तर आज महिलांना अजून जिजाउच कळाल्या नाही तर त्यांचे विचार आणि कार्य कळणे दुरची गोष्ट आहे. स्वतः सिरीअल आणि मनोरंजना मध्ये गुंतणाऱ्या महिलांना आज आपल्या ईतिहासाची जाणीव उरली नाही म्हणून समाजात आज अराजकता माजलेली आहे. मुलांच्या हाती मोबाइल आणि रिमोट देणाऱ्या महिला आपल्या मुलांकडून कोणत्या अपेक्षा ठेवत असतील. जन्मा पासून जिजाऊ शिवरायांच्या डोक्यात तुला राजा व्हायचे म्हणून वारंवार बिंबवत असत आणि आजची स्त्री तु अस करो नको तस करू नको म्हणून लहान पणापासून नकारात्मक भावना डोक्यामध्ये भरून देतात. यातून आदर्श आणि सक्षम पिढी कशी बदलेले. पर स्त्री आई समान मानणाऱ्या स्वराज्यात स्त्रियांवर बलात्कार होतात. कोणत्याही आईला आपला मुलगा बलात्कारी किंवा व्यभिचारी व्हावा असे वाटत नसले तरी लाडाच्या नावाखाली त्याला तिकडे ढकलले जाते. हातात मोठा फोन अनलिमिटेड नेट आणि त्यात पॉर्न. ऑनलाइन रोज पॉर्न, खुन, सिनेमा मालिकेतील विनयभंग बलात्कार अशा गोष्टी रोज बघितल्या नंतर नैतिक विचार किती जागृत राहतील हा प्रश्नच आहे. आजही स्त्रियांना आपला शत्रु कोण मित्र कोण याची ओळख झाली नाही. जो दूसऱ्याच्या जगण्यावर बंधी लादून स्वतः संधी साधुन घेतात ते खरे शत्रु आहेत. दुष्मानाची कबर बांधण्याची संस्कार असलेल्या देशात बलात्कार पिढीतेवर परस्पर अंतिम संस्कार करण्यात येतात एवढी लाजीरवाणी गोष्ट दूसरी कोणतीच नाही.

एक जिजाऊ जन्माला आली तर स्वराज्याचे दोन संभाजी घडविले आणि रयतेची सत्ता असावी हे स्वप्न साकार केले. आज जिजाऊंचे विचार घेऊन आपण रयतेचा विचार केला तर सध्या रयत समस्या ग्रस्त असून शासक वर्ग निर्णायक भुमिके मध्ये नाही. एका जिजाऊंनी एक शिवाजी घडवीला तर व्यवस्था उलथून पाडली. आज करोडो जिजाऊंच्या लेकी आहेत त्यांनी पोटी आलेल्या मुलाला मावळा जरी बनवले तरी शेतकऱ्यांची भांडवलदाराकडे जाणारी जमीन वाचेल, बलात्कार कमी होऊन स्त्रियांचा सन्मान होईल, धर्मानुसार नव्हे तर कर्मानुसार शत्रु ठरेल, संघटन कौशल्य वाढून देशाच्या एकात्मतेसाठी हात भार लागून विषमतावादी व्यवस्था मातीत गाडली जाईल आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याचा डोलारा पुन्हा उभा राहील यासाठी मेंदू सक्रिय ठेऊन सत्य गोष्टी स्विकारण्याचे धाडस पाहिजे. तरच समतावादी व्यवस्था निर्माण होऊन. जिजाऊंच्या स्वप्नातील स्वराज्य उभे राहीलं म्हणून आज जिजाऊ वाणु समजून घेऊन प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला येण्याची गरज आहे. जेव्हा प्रत्येक घरात वैचारिक जिजाऊ जन्माला येईल तेव्हा या देशात समता प्रस्थापित होऊन आदर्श समाजव्यवस्था निर्माण होईल व खऱ्या अर्थाने आपण जिजाऊ जंयती साजरी करण्याचे सार्थक होईल.
जिजाऊ जयंतीच्या मनपूर्वक सदिच्छा…
************************************
✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगाव ता मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
*************************************