मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सन्मान

29

🔹जिल्ह्यात रस्ते अपघात कमी झाल्याने सत्कार

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि.18जानेवारी):-रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यामध्ये रस्ते अपघात कमी केलेले आहेत. ही उल्लेखनीय बाब आहे. यासाठी औरंगाबाद जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सत्कार सह्याद्री राज्य अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य रस्ता सुरक्षा समितीला रस्ते अपघात मूत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण 10 टक्याने कमी करण्याचे उद्दिष्ट दिलेले होते.

त्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अधिनस्त समितीने सुनियोजन पद्धतीने कामकाज केले. शहरातील अपघात व मृत्यू प्रमाण कमी करणे करीता शहरातील अपघात प्रवणक्षेत्र असलेल्या ठिकाणी तत्कालिन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, तत्कालिन प्रादेशिक परिवहन अधिकारी सतिश सदामते तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी एकत्रित भेट देवून उपाय योजना सूचविल्या.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघात विश्लेषन समिती गठित करण्यात आली.

त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन परिक्षेत्र निहाय प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा प्रत्येकी एक एक सदस्यांची नेमणूक करून प्राणांतिक व जबर जखमी असलेल्या अपघात ठिकाणास 48 तासांच्या आत भेट देवून उपाययोजना संबंधित विभाग, प्राधिकरणाव्दारे अंमलबजावणी करण्यात आल्याने अपघात व मृत्यू प्रमाण कमी होण्यास मदत झाली.पालकमंत्र्यांकडूनही अभिनंदन
या पुरस्कारानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे औरंगाबाद चे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन केले.

अशाच प्रकारचे कार्य करून भविष्यात राज्यात सर्वात कमी अपघात असलेला जिल्हा औरंगाबाद करावा अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.अपघाताची संख्या कमी
औरंगाबाद शहरात जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 च्या तुलनेत (अपघात संख्या 560, मृत्यू 199) जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 (अपघात संख्या 406, मृत्यू 136) कालावधीत 28 टक्यांनी अपघाताची संख्या कमी करण्यात आली, मृत्यू संख्येत 32 टक्केंनी घट झालेली आहे. त्यामुळे औरंगाबादचा तिसरा क्रमांक आला.

सदर समितीत जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, सदस्य सचिव म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी व सदस्य म्हणून पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), औरंगाबाद शहर यांनी कामकाज पाहिले. यासाठी पोलीस आयुक्त, (मुख्यालय) मीना मकवाना, औरंगाबाद शहर यांच्या अधिनस्त शहर वाहतूक पोलीस विभागाने मोलाचे परिश्रम घेतले, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.