वाहतुक चलानला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवू नका रस्ते सुरक्षा अभियानाचे उद्धाटनप्रसंगी खा. बाळू धानोरकर यांचे आवाहन

39

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.19जानेवारी): वाहन चालकाची चुक असेल तेव्हाच त्यांचे चलान केले जाते, या बाबीचा नागरिकांनी प्रतिष्ठचा मुद्दा न बनवता रस्ते वाहतुकीसंबंधातील नियम हे नागरिकांच्या सुरक्षेकरिताच आहेत, या बाबीची जाणीव ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी आज केले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा पोलीस दल व शहर वाहतुक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 32 वे रस्ता सुरक्षा अभियान-2021 चे उद्घाटन बाळू धानोरकर यांचे हस्ते येथील नियोजन सभागृहात करण्यात आले. यावेळी ते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, एस.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक राजेंद्र पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
खा. धानोरकर पुढे म्हणाले की भविष्यात अपघाताचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी वाहतुक पोलीसांनी देखील कर्तव्य दक्ष राहून आपले काम करावे तसेच टॅक्सी, ऑटो चालक यांनी ड्रेसकोड मध्ये रहावे व वाहतुक नियमांचे पालन करावे. रस्ते सुरक्षा अभियानाला खा. धानोरकर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले की एका व्यक्तीच्या अपघातामुळे संपुर्ण कुंटूंब उद्वस्त होते, त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे.

हेल्मेट वापरने, सीट बेल्ट बांधणे ही शिस्त आहे व या शिस्तीचे पालन वाहनचालकांकडून व्हायलाच हवे. तसेच वाहतुक पोलीसांनीदेखील नागरिकांना सौजन्यपुर्वक वागणूक द्यावी असे साळवे यांनी सांगितले.विभाग नियंत्रक राजेंद्र पाटील यांनी रस्त्यावर घाई करणे जीवावर बेतू शकते त्यामुळे वेग नियंत्रीत ठेवा असे सांगितले. तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी अपघातमुक्त चंद्रपूर शहर घडवीण्यासाठी वाहतुक पोलीसांनी रोज किमान तीन नागरिकांना वाहतुक नियमांची माहिती द्यावी, हेल्मेट, सिट बेल्ट वापरने, दारू न पीता वाहन चालविने, वाहनाचा वेग मर्यादित ठेवणे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचेही त्यांनी वाहतुक पोलीसांनी आवाहन केले.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तयार केलेल्या वाहतूकीचे नियम व रस्ता सुरक्षा याची माहिती असणारे पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच ऑटोरिक्षा व प्रवासी वाहनांवर वाहतुक नियमांचे माहिती देणारे स्टिकर्स लावण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन मोन्टू सिंग यांनी केले तर उपस्थितांचे आभार वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी मानले.यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस वाहतुक शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी, महामार्ग पोलीस अधिकारी, मोटार ड्रायव्हींगचे संचालक, ऑटो संघटनेचे पदाधिकारी व शिकावू चालक विद्यार्थी उपस्थित होते.