शाकंभरी नवरात्री : सुखी कराया धरित्री !

    46

    [आज दि.२१ जानेवारी २०२१ पौष शुद्ध ८ – दुर्गाष्टमीपासून दि. २८ जानेवारी २०२१ पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा होत आहे. सर्वांवर मातेची कृपादृष्टी राहून सुख-समृद्धी नांदो ! अशी कामना करणारा लेख साहित्यिक कृष्णकुमार निकोडे गुरुजी यांच्या लेखणीतून सेवेशी सविनय सादर…]_

    शाकंभरी देवी आदिशक्तीचे एक रूप मानले जाते. तीच्या नवरात्रात अन्नपूर्णेची आराधना केली जाते. आज पौष शुद्ध अष्टमीपासून म्हणजेच दुर्गाष्टमीपासून शाकंभरी नवरात्र सुरू होतेय. ही नवरात्र पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत असते. आश्विन महिन्यातील नवरात्राइतकेच या नवरात्राचेही खूप महत्त्व आहे. देवीस्तुतीच्या अकराव्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रुपांचं वर्णन केलं गेलंय, त्यातीलच एक महत्त्वाचं हे रूप आहे. शाकंभरी देवीला चार भुजांची तर काही ठिकाणी अष्टभुजा रुपात दर्शविले गेलेय. या नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते. आपल्याला नावावरूनच लक्षात येईल की, शाकंभरी देवी म्हणजे अन्न-देवता आहे. संपूर्ण ब्रह्मांड या माऊलीचे मूलस्थान आहे.

    शाकंभरी नवरात्रीची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म आटोपते घेतले जाते. घर, अंगण, देवघर स्वच्छ करण्यात येतात. स्नान उरकून स्वच्छ पोषाख परिधान केले जातात. मातीच्या भांड्यात बार्लीचे बीज पेरून त्यावर पाणी शिंपडतात. या नवरात्राच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलशाला लाल रंगाचा कपडा गुंडाळून पूजा स्थानी त्याची स्थापना केली जाते. कलशामध्ये गंगाजल भरून त्याला आंब्याची पाच पाने आणि जटा असलेले नारळ त्यावर ठेवतात. नारळाला लाल ओढणी बांधली जाते. नंतर फुले, हार, कापूर, अक्षता, आदींनी देवीची पूजा करतात व आरती म्हणतात –

    “जय देवी जय देवी जय शाकंभरी ललिते,
    अज्ञ बालकांवरी त्वा कृपा करी माते !!धृ!!
    शताक्षी बनशंकरी चामुंडा काली, दुर्गम शुभ निशुंभा स्वर्गी धाडियली ।
    येता भक्ता संकट धावुनी ही आली, दुःखे नाशुनि सकला सुखी ठेविली !!

    नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर घट विसर्जन केले जाते आणि नंतर कलश उचलले जातात. शाकंभरी देवीचे नवरात्र राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये लोकप्रिय आहे. कर्नाटकामध्ये याच देवीला बनशंकरी देवी म्हटले जाते आणि ही अष्टमी खुप महत्त्वाची मानली जाते. देवीची अवतार कहाणी अशी ऐकवितात. ती मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते –
    पृथ्वीवर एक राक्षस दुर्गमासुर अत्यंत बलवान, पराक्रमी, मोठा धूर्त आणि कावेबाज होता. तो देव, मानव, ऋषीमुनी व पशुपक्ष्यांचा फार द्वेष करीत असे. त्याने हिमालयात घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवास प्रसन्न केले. ब्रह्मदेव म्हणाले, ‘‘तथास्तु!’’ या एकाच शब्दाने संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. सजीवांना आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली व त्यांत प्रविष्ट झाली. वरदानामुळे शक्तिसंपन्न बनलेला दुर्गमासुर हाहाकार करीत आला. त्याने सर्वांचा पराभव केला व पिटाळून लावले. अखेर सर्व सजीव स्वत:ला कसेबसे सावरत गहन वनातील खोल गुहेत शिरून लपून बसले. धावा करू लागले. जसे पवित्र महाभारत ग्रंथाच्या वनपर्वातही शाकंभरी देवीची महिमा गायिली आहे –

    “ततो गच्छेत राजेन्द्र देव्या स्थानं सुदुर्लभं !
    शाकम्भरीति विख्याता त्रिषुलोकेशु विश्रुता !!”

    सर्व सजीवांनी जगन्मातेला शरण जाऊन आदिमाता महादेवीची उपासना सुरू केली. त्या सर्वांसमोर भगवती प्रकट झाली. तीचे रुप जगावेगळे – भव्य सृष्टीमधील उंच-उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडेझुडे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला ‘‘शताक्षी’’ असे म्हणू लागले. देवीच्या शंभर नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळावळे आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या ममतेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. या देवीला सर्वांनी ‘शाकंभरी माता’ असे संबोधले.
    यानंतर बाहेर येऊन देवीने गुहेच्या तोंडावर सर्वांच्या रक्षणासाठी मोठे तळपते चक्र ठेवले. आपली शस्त्रास्त्रे बाहेर काढून तिने दुर्गमासुराला युद्धाचे आव्हान केले. तो आपल्या सैन्यासह लढू लागला; पण तो व सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट टळले. सर्व ज्ञान मंत्रसामर्थ्यासह सर्वांना परत मिळाले. देवी त्यांना म्हणाली, ‘‘हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हेच माझं एक स्वरुप आहे. ज्ञानाची जोपासना व शक्तीची आराधना करा. तुमचे कल्याण होईल!’’ एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. म्हणून म्हटले आहे –

    “पाहुनी माते तुजला मन होते शांत, मी पण उरे न काही मानव हृदयात !
    प्रसन्न चित्ते राही तुझ्या क्षेत्रात, ब्रह्मानंदी निमग्न होतो तुझा भक्त !!

    ती स्त्रीरुप आदिशक्ती देवी खर्‍या अर्थाने जगतमाता होती. तिने सर्वांचे रक्षण करून पालनपोषण केले. खर्‍या आराधनेचा मंत्र आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्याचा संदेश दिला. म्हणूनच पौष पोर्णिमाला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. सद्या जगात आलेल्या समस्त आपदांचे निवारण होवो ! शुभम भवतु !!
    !!! सर्व सन्मा.वाचक बंधुभगिनींना शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या पुरोगामी संदेश परिवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!

    ✒️लेखक:-श्री कृष्णकुमार जी. निकोडे गुरुजी,
    ( मराठी साहित्यिक व संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक)मु. पो. ता. जि. गडचिरोली.
    मधुभाष – ७४१४९८३३३९.
    इमेल – nikodekrishnakumar@gmail.com