कृष्णमुर्ती शाळांकडून शिक्षक म्हणून मी काय शिकावे ?

27

शिक्षकांना प्रेरणा देणार्‍या भारतातल्या शाळा कोणत्या ?अशी यादी करताना सर्वप्रथम नाव समोर येते ते कृष्णमुर्ती शाळांचे. गेल्या ७५ वर्षापासून भारतात ५ शाळा आणि जगात २ अशा ७ शाळा सुरू आहेत. या शाळा संख्येने खूप कमी असल्याने त्या व्यवस्थेवर परिणाम करत नाहीत पण मी त्याकडे एक प्रयोगशाळा म्हणून बघतो. या शाळांकडून आपल्या प्रचलित शाळा सहजपणे दृष्टीकोण घेऊ शकतात हे मला महत्वाचे वाटते. 

जे कृष्णमूर्तीनी इतके शिक्षण चिंतन करूनसुद्धा आपल्या शिक्षण क्षेत्राला ते माहीत नाहीत याचे कारण त्यांच्याविषयी एकही धडा पुस्तकात नाही की डी एड बी एड ला ते शिक्षणतज्ञांच्या यादीत नाहीत.पुन्हा. पण आज परीक्षेऐवजी आलेली नवी मूल्यमापन पद्धती, मुलांना शिक्षा न करणे यासारख्या आज स्विकारलेल्या गोष्टी या शाळा ७५ वर्षे अमलात आणत आहेत यावरून या शाळांचे द्रष्टेपण लक्षात यावे
या शाळा कुठे आहेत ?शाळांमध्ये आंध्र प्रदेशातील बहुचर्चित शाळा ही ऋषी व्हॅली आहे. या शाळेला सर्वात जास्त जगभरच्या लोकांनी भेट दिली असावी. कृष्णमूर्तींचे जन्मगाव मदनपल्ली जवळच वसविण्यात आली. साधनसामग्रीअभावी बाहुलीनाट्य व विविध कार्ड्सद्वारे मुलांना शिकविण्याची पद्धती विकसित करण्यात आली. या शाळेत इयत्ता नाही. मुले स्वयंअध्ययनातून शिकतात. बाहुलीनाट्य हे खास वैशिष्ट्य. हा प्रयोग युनिसेफने अभ्यासून भारतभर अनेक ठिकाणी गेली 30 वर्षे राबविला जात आहे. महाराष्ट्रात मुंबई महापालिकेसह अनेक ठिकाणी तो सध्या राबविला जात आहे.

वाराणसीची राजघाट बेझंट स्कूल. सारनाथच्या रस्त्यावर आहे वर्गाच्या खिडक्यांमधून गंगा नदीचा प्रवाह दिसतो. या शाळेच्या उभारणीत महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसेनानी अच्युतराव पटवर्धन यांचा सर्वात मोठा वाटा होता. चेन्नईची ‘द स्कूल’ ही शाळा प्रसिद्ध आहे. इयत्ताविरहित शिक्षण देण्याचा इथला प्रयोग महत्त्वाचा आहे… कृष्णमूर्तींची बंगळुरूमधील व्हॅली स्कूल शेकडो एकरांच्या जंगलात वसली आहे. कलाविषयक खूप चांगले काम इथे झाले आहे. महाराष्ट्रात राजगुरुनगरजवळ भीमाशंकर रोडला वाडा या गावाजवळ सह्याद्री स्कूल आहे. उंचच उंच टेकडीजवळ ही सुंदर शाळा व खाली चासकमान धरणाचे अथांग पाणी, कडेला सह्याद्रीच्या रांगा अशा अत्यंत मनोहारी वातावरणात ही शाळा आहे..भारताबाहेर ओहायो व बाकवुड पार्क इथेही दोन शाळा आहेत, तर मुंबईत एक बालशाळा आहे. कृष्णमूर्ती शाळांपासून प्रेरणा घेऊन देशात अनेक ठिकाणी अशा शाळा सुरू झाल्या आहेत… प्रत्येक शाळेत मला जाता आले. काही दिवस थांबून अभ्यास करता आला… माझ्यासाठी आयुष्याला वळण देणारे व रोमांचित करणारे दिवस आहेत ते.

या शाळांचे वेगळेपण नेमके काय आहे ?आपल्या शिक्षक व पालकांना या शाळाकडून काय शिकता येईल याच उत्सुकतेने मी या शाळा बघितल्या. मला वेगळेपण सर्वात मोठे वाटले की इथे कृष्णमुर्ती शाळा असूनही व्यक्तिपूजा नाही. कृष्णमुर्ती चा फोटो ही कुठे नाही किंबहुना ते वारले तेव्हा शाळेला सुटी सुद्धा दिली नाही.दुसरे भावले ते म्हणजे शिक्षक व विद्यार्थी संबध..ते खूप समान पातळीवर आहेत. शिक्षक व विद्यार्थी एकत्र राहतात एकत्र जेवतात आणि एकत्र खेळतात. ही सम पटलीवरची वागणूक मला खूप महत्वाची वाटली.वर्गात बसून मी शिक्षकांचे तास बघितले तिथेही मुलांवर शिक्षकांचे अजिबात दडपण मुलांवर येत नाही. मुले शिक्षकांना शिकवताना टोकतात.. काहीही विचारतात.ही भीती जाणे हे महत्वाचे वाटले. प्रभातकुमार हा शिक्षक मला म्हणाला रस्त्यावरून जाणार्‍या एखाद्याने पत्ता विचारावा त्या सहजतेने मी शिकवताना माहिती सांगतो. ही अहंकारविहीनता मला मोलाची वाटते.

या शाळेत अभ्यासासोबत कला या विषयाला खूपच महत्व आहे. शनिवार रविवार तर गायन वादन नृत्य चित्रकला मातीकाम यालाच वाहिलेले असतात.अनेक नामवंत कलाकार इथे येतात.त्यामुळे करियर म्हणून कलावंत होणे अनेक विद्यार्थी पसंत करतात. नासिरुद्दीन शाह यांचा मुलगा या शाळेचा विद्यार्थी होता. स्पर्धा विहीन शिक्षण हा इथला गाभा आहे. संगीताने च दिवसाची सुरुवात होते. सर्व शिक्षक विद्यार्थी एकत्र बसून वाद्यांच्या साथीने सुंदर गाणी भजने गातात .त्या निसर्गरम्य वातावरणात सकाळी ते आपली भावावस्थाच बदलून टाकते.. कुठलीच स्पर्धा इथे होत नाही. पण तरीही १० वी १२ वीचे निकाल खूप चांगले असतात. मुले महत्वाकांक्षा विरहित शांत विकसित होतात. इथला निसर्ग ही त्याला मदत करतो. या सर्वच शाळा निसर्गरम्य ठिकाणी आहेत…सर्वात अप्रतिम उपक्रम हा रोज संध्याकाळी सूर्यास्त पाहण्याचा असतो.

मी ही मुलांसोबत रोज जायचो. तेव्हा आपण रोजच्या जगण्यात काय गमावतो हे लक्षात येते.. सूर्यास्त कडेचा निसर्ग आणि अथांग शांती त नकळत डोळ्यात पाणी यायला लागते आणि हळूहळू मुले आपल्या खोल्यात जातात. इतके साधे उपक्रम कुणीही करू शकतो.यातून मुले कोमल आणि संवेदनशील होतात. प्रत्येक शाळेत नेचर क्लब आहेत.रविवारी सकाळी मुले पक्षिनिरीक्षण करतात.त्या परिसरातील सर्व पक्ष्यांची माहिती आहे. पर्यावरण विषयात राष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प मुलांनी केले आहेत.प्रकल्प पद्धतीने शिकणे हे एक वैशिष्ट्य.टागोरांच्या जन्मशताब्दीत ८ दिवस विविध कार्यक्रम मुलांनी केले. अनेक नवे प्रयोग सुरू असतात. चेन्नई आणि बगलोर च्या शाळेत सध्या इयत्ता विहीन शिक्षणाचा प्रयोग सुरू आहे.यात १ ली ते ४ थी च्या मुलांना एकत्र शिकविले जाते. लहान मुले खेळताना जर एकत्र खेळतात तर मग एकत्र शिकू का शकणार नाहीत ?मोठ्या मुलांनी लहानांना मदत करण्याची ही कल्पना अभ्यासावी अशीच आहे.

शिक्षक सक्षमीकरणाचे उपक्रम महत्वाचे आहेत. शिक्षकांना विकसित करणार अभ्यासक्रम तयार केला आहे. सर्व शाळांतील विषय निहाय शिक्षकांच्या परिषदा होतात..शिक्षकांच्या उपक्रमाचे नियमित जर्नल प्रकाशित केले जाते..दर आठवड्याला विषयनिहाय शिक्षक एकमेकांना भेटतात. कृष्णमुर्ती यांच्या प्रभावातून शिक्षक होण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी भारतातून विविध ठिकाणचे कलावंत प्रतिभावान लोक इथे शिक्षक व्हायला येतात .. ते म्हणायचे की ‘प्रेमाचा प्रारंभ खरोखर शिक्षकांपासून झाला पाहिजे. तुम्हाला गणित, भूगोल किंवा इतिहास यांची माहिती देण्याबरोबरच शिक्षकांच्या हृदयातही प्रेमभावना असावी! त्यांच्या संभाषणात, कामात, खेळात, संगतीत किंवा एकटे असताना ही विलक्षण भावना सतत जाणवावी. शिक्षकात सौम्यता वसत असली, तर विद्यार्थ्यांमध्येही स्नेहभवना व इतरांबद्दलही आदर तुम्ही निर्माण होईल.’

शिक्षकाने कोणत्या पद्धतीने शिकवावे हे त्याला प्रेमातूनच कसे शिकवायचे हे शिक्षकाला कळू शकेल. ते लहान मुलाचे उदाहरण देतात की, मुलाला चित्र काढावेसे वाटले, तर ते कोणत्या पद्धतीने काढावे असा प्रश्न त्याला पडत नाही. तसे शिक्षकाचे मुलांवर प्रेम असेल तर आपोआप पद्धती निर्माण होतील.
निसर्ग संगीत प्रेम ही इथल्या शिक्षणाची भाषा आहे आणि त्यातून मुलांना स्वत:चे अवलोकन करायला मदत केली जाते.याचे कारण ही सारी धडपड आपले स्वत: चे ‘निवडरहित अवधान’ करून आपल्याला बदलणे असते.त्यांच्या विचारांचा हा मुख्य गाभा होता.मान्य आहे की या उंचीवर या शाळा पोहोचत नाहीत किंवा सर्वच शिक्षक कृष्णजींच्या विचारानुसार नाहीत. इतर निवासी शाळांसारख्याच हळूहळू होत आहेत पण या शाळेतील हे महत्वाचे दृष्टिकोन मोलाचे आणि इतर शिक्षकांना मार्गदर्शक आहेत

कृष्णजींच्या शाळांकडून आपल्या शाळा पुढील बाबी अगदी सहजपणे घेऊ शकतील —– .
1. त्या शाळांमध्ये खेळ व कला-नृत्य-संगीत याला शाळेच्या वेळापत्रकातच मोठा वेळ दिला आहे.
2. दर आठवड्याला चाचणी होऊन मागे पडणा-या विद्यार्थ्याला पूरक मार्गदर्शन केले जाते.
3. शिक्षक व मुले एकत्र खेळतात, एकत्र जेवतात. शिक्षकांची मुलांना भीती वाटत नाही.
4. रोज संध्याकाळी मुले सूर्यास्त बघतात व नंतर तसेच काहीवेळ स्वत:चे निरीक्षण करतात.
5. रविवारी सकाळी डोंगर निसर्गात निरीक्षणाला जातात.
6. शाळा मुलांना विविध वाद्ये वाजवायला शिकवते.
7. पाठांचे नाट्यकरणावर जास्त भर असतो. चित्रकलेला विशेष महत्त्व दिले जाते.
8 मुलांना उपदेश करण्यापेक्षा स्वत: चे अवलोकन करण्याचे वातावरण तयार करण्यावर भर आहे

शिक्षकांना मार्गदर्शक ठरणारी कृष्णमुर्ती शाळांची माहिती (पुस्तके व वेबसाइटस)

साकेत व चंद्रकला प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत. इंग्रजीतली बहुतेक सर्व पुस्तके ही कृष्णमूर्ती फाउंडेशनने प्रसिद्ध केली आहेत. पण इंटरनेट वापरणार्‍ यांसाठी खुशखबर ही आहे की, त्यांचे सर्व विचार सर्व व्हिडिओ नेटवर उपलब्ध आहेत. ‘ऑनलाइन कृष्णमूर्ती’ या साइटवर ते आहेत. त्यात कोणताही शब्द टाकला की कृष्णजींनी त्या विषयावर काय म्हटलंय याची शेकडो पाने समोर येतात. त्याची लिंक www.jkrishnamurti.org/
सर्व कृष्णमूर्ती शाळांच्या विषयीची एकत्रित माहिती याच वेबसाइटच्या
http://www.kfionline.org/education/education-centres या लिंकवर वाचायला मिळेल. भारतात त्यांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचे वेबसाइट खालीलप्रमाणे आहेत.
http://www.rishivalley.org/
http://www.kfirural.org/Apschool.html
http://www.j-krishnamurti.org/
http://www.thevalleyschool.info/
http://www.theschoolkfi.org/
http://www.sahyadrischool.org/
परदेशातील कृष्णजींच्या शाळांची माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहेत.
http://brockwood.org.uk/
http://www.oakgroveschool.com/

✒️लेखक:-हेरंब कुलकर्णी 8208589195

( लेखकाने भारतातील सर्व कृष्णमुर्ती शाळांना भेट देवून अभ्यास केला असून त्यावर ‘ *कृष्णमुर्ती आणि कृष्णमुर्ती स्कूल्स’ (मनोविकास प्रकाशन)* हे पुस्तक लिहिले आहे.