पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमध्ये लिफ्टचे उद्घाटन

25

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

यवतमाळ(दि.28जानेवारी):- ग्रामीण भागासाठी मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. यात दिव्यांग नागरिकांसह ज्येष्ठांचाही समावेश असतो. या नागरिकांना सुविधा व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लिफ्टचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि.प. अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, महिला व बालकल्याण सभापती जया पोटे, समाजकल्याण सभापती विजय राठोड आदी उपस्थित होते.

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट अतिशय आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अनेक सभापतींचे कॅबिन वरच्या माळ्यावर आहे. तेथे जाण्यासाठी दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत होता. त्या अनुषंगाने लिफ्ट बसविण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.सदर लिफ्ट ही 10 नागरिकांसाठी असून जोकवेरा प्राय. लिमि. कंपनीच्या वतीने ती लावण्यात आली आहे. सदर लिफ्टची एक वर्ष देखभालदुरुस्ती कंपनीकडे राहणार आहे.

विशेष म्हणजे ज्या माळ्यावर लिफ्ट जाईल, तेथील सर्व विभाग दिसण्याची सुविधा यात आहे. तसेच इनबिल्ट आटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाईस बसविल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्यावरसुध्दा सदर लिफ्ट जवळच्या माळयावर जाऊन थांबेल. प्रशासकीय इमारतीमधील तीन माळ्यांसाठी ही लिफ्ट असल्याची माहिती देण्यात आली.पालकमंत्र्यांच्या हस्ते लस भांडार वास्तुचे लोकार्पण : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली आहे. लस साठवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या लस भांडार वास्तुचे लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीसाठी 40 लक्ष रुपये खर्च आला असून यात 22 फ्रिजर राहणार आहेत. यावेळी पालकमंत्र्यांनी इमारतीतील शित साखळी कार्यशाळा, शित साखळी गृह आदींची पाहणी केली.