अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटीलांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश

    37

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.28जानेवारी):-सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे राज्य उपाध्यक्ष, युवकांचे आशास्थान युवानेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस आय पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला असल्याने डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येणार असल्याचे राजकीय जाणकर विश्लेषक यांच्यामधून बोलले जात आहे.

    डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार याविषयी मत मतांतर होते. मात्र काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याने निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या विचारांच्या पुणे, सोलापुर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्र विदर्भ, कोकण, मराठवाडा याठिकाणी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी स्वतःची ताकद जनसेवेच्या शिलेदार यांच्या माध्यमातून दाखविली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून एक लाखाचे मताधिक्य व माढा मतदारसंघात निवडून आणण्याकरता डॉ. धवलसिंह यांचा सिंहाचा वाटा आहे. ‌

    तर विधानसभेच्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना पाठिंबा दिलेला होता. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाची ताकत पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रात निर्माण केली होती. लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या वेळी देदीप्यमान विजय मिळवून संपूर्ण देशामध्ये स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाचा गवगवा झालेला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये त्यांना परत बोलावून घेऊन मानसन्मानाने विधान परिषदेवर आमदार केले होते. राजकारणातील कर्तबगार व लोकप्रिय सिंह म्हणून प्रतापसिंह यांच्याकडे पाहिले जाते आणि त्याच सिंहाचा छावा धवलसिंह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याने काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केलेले आहे.

    डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचे युवकांचे संघटन करण्याचे कौशल्य आहे. त्यांचा सुसंस्कृतपणा, निर्व्यसनी वागणूक, मनमिळावू स्वभाव, असल्याने तरुणांच्या गळ्यातील ते ताईत आहेत. उच्चशिक्षित असूनसुद्धा ग्रामीण भागातील जनतेशी कधीही नाळ तुटू दिली नाही. सहकार महर्षी लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शावरच डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचे पावलावर पाऊल सुरू असल्याने आजपर्यंत घेतलेले प्रत्येक पाऊल यशस्वी असल्याने काँग्रेस पक्षातील प्रवेशाचे पाऊल सुद्धा यशस्वीच असणार आहे.
    महाराष्ट्र प्रदेश कार्यालय टिळक भवन मुंबई येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व अनेक काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला असल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीतील ही एक मोठी घडामोड असल्याने अनेकांच्या नजरा पक्षप्रवेशाकडे लागलेल्या होत्या.