माझ्या प्रशिक्षणाची सुरुवात

  48

  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य नागरी सेवा परीक्षेत यश आले आणि उपजिल्हाधिकारी पदी पहिल्याच प्रयत्नात 1982 मध्ये निवड झाली. ओएनजीसी ची मुंबई येथील वर्ग 1 ची नोकरी सोडून ,वर्धा जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी मार्च 1983 ला रुजू झालो. पूर्वी, तलाठी यांचे व्यतिरिक्त ,तहसीलदार ,एसडीओ, जिल्हाधिकारी यांना पहिल्यांदा भेटत होतो. खरं सांगतो मी उपजिल्हाधिकारी झालो होतो तरी तेव्हा मनात भीती आणि न्यूनगंड होता. या अधिकाऱ्यांबाबत आजही सर्वसामान्य , शोषित , वंचित दुर्बल समाज घटकांच्या लोकांच्या मनात भीती आहेच. अपवाद वगळता, या अधिकाऱ्यांकडून, आपुलकीची, संवेदनशीलतेचि वागणूक व मार्गदर्शन मिळतेच असे नाही. बोलणे तसे वागणे घडत नाही.

  2.आरडीसी यांनी प्रशिक्षण कार्यक्रम दिला आणि सोबत एका शिपायाची नेमणूक केली. परंतु ,शिपाई माझे सोबत नसायचाच. त्याचे दृष्टीने मी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी असल्यामुळे महत्वाचा नसावा. तक्रार करणे वैगरे ध्यानीमनी आलेच नाही.

  3. देवळी येथे तलाठी प्रशिक्षण सुरू झाले. वर्धेवरून रोज एस टी ने जायचा व यायचा. बसायला जागा मिळायची नाही. बरेचदा तहसील कार्यालयातील तलाठी मीटिंग हॉल मध्ये मुक्काम असायचा, तेथेच झोपायचा. माझे कोणतेही नाते नव्हते तरी अशावेळी एकनाथराव कांबळे हे टिफिन पाठवायचे. खरं तर माझेपासून त्यांना कोणताही फायदा, लाभ नव्हता हे माहीत असूनही माझी काळजी घ्यायचे. शक्य आहे, तलाठ्याने सांगितले असावे. महसूल खात्याबाबत तहसीलदार काही सांगायचे नाही. त्यांचेकडे बसलो की मिठा पान आणि चहा मात्र द्यायचे.त्यांनी प्रशिक्षण देण्याचा प्रश्नच नव्हता. मी एकदम नवीन परंतु उपजिल्हाधिकारी म्हणून मानसन्मान मिळत होता. आपल पद महत्वाचे आहे असे वाटायचे. मनापासून प्रशिक्षण घेत होतो. तलाठ्याने खूप चांगले शिकविले, शेतात घेऊन जात असे, शिकवत असे.

  तलाठी दप्तर खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. खूप चांगले ,अभ्यासू व प्रामाणिक तलाठी लाभले होते. त्याचा फायदा शेवटपर्यंत आणि आताही होतो आहे. या काळात आपुलकी, माणुसकी चे धडे निरीक्षणातून शिकत गेलो. वर्ष 2006 मध्ये जिल्हाधिकारी वर्धा म्हणून रुजू झालो तेव्हा देवळीचे एकनाथराव कांबळे यांची आठवण झाली आणि भेटलो सुद्धा. जुन्या आठवणी ला उजाळा मिळाला. काही काम असेल तर हक्काने सांगा म्हटलं ,तेव्हाही त्यांनी मला कोणतेही काम सांगितले नाही. तलाठ्याची ही विचारपूस केली. भेट झाली. राजस्व निरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती. आनंद वाटला. प्रशिक्षणाच्या सुरुवातीला अशी माणसं भेटलीत, आठवणीत राहली . क्रमशः लिहीत राहू.

  अनेक घटना आणि प्रशासकीय अनुभव जाणून घेण्यासाठी वाचा माझे पुस्तक, “आणखी, एक पाऊल” आणि “प्रशासनातले समाजशास्त्र”.

  ✒️इ झेड खोब्रागडे(भाप्रसे निवृत्त)मो:-9923756900