रामदास स्वामी शिवरायांचे कधीच गुरु नव्हते

38

शिवरायांनी शिकविले तलवारीचा घाव! महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितले शिक्षणाचा प्रभाव! शाहू महाराजांनी शिकविल्या कुस्तीचा डाव आणि भीमरावाचे रुजविला इथे प्रेम आणि बंधुभाव!!!असे सुंदर आणि समर्पक सुरुवात करत ‘दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमी वर! एक ते रायगडावर एक चवदार तळ्यावर!!अशा अवघ्या दोनच ओळीत महापराक्रम आणि अखिल मानवतेची महती जगासमोर मांडणा-या कवी-शाहीराला शत शत नमन.!

छत्रपती शिवराय आणि विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर यांच्यात त्यांच्या जन्मापासूनच अनेक साम्य आढळतात. दोघांच्याही जन्माची पार्श्वभूमी साहस आणि पराक्रम अशी आहे. शिवराय राजपुत्र आणि भीमराव सुभेदारांचे पुत्र. दोघांचाही एकच बाणा होता आणि तो म्हणजे मानवतावाद, जन उद्धार होय. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील एकेक प्रसंगाकडे बारकाईने पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे, युद्धात ही त्यांनी जोपासलेला तथागत गौतम बुद्धांचा मानवतावाद. आणि अख्या जगाने एक बुद्धिमान माणूस म्हणून गौरविलेले बाबासाहेब आंबेडकर पत्रव्यवहार करताना पत्राची सुरुवातच ‘जय शिवराय’ असे करत यालाही काही तरी आधार असणार यात शंकाच नाही.पुढे जावून बाबासाहेब तर स्पष्टपणे म्हणतात की, मला संविधान लिहीताना अधिक श्रम करावे लागलेच नाहीत कारण माझ्या डोळ्यासमोर आणि डोक्यात तथागतांचे तत्वज्ञान आणि महाराजांचा राजधर्म,त्यांची शासन व्यवस्था आदर्श म्हणून होती. एकूण काय तर बहुजनांचे हे दोन्ही राजे एक आदर्श तत्वज्ञानाच्या वातावरणात आणि महापुरुषांच्या शिकवणीनुसार वाढल्यामुळे एक मॉं जिजाऊ सोडले तर दुस-या कुणाही जिवंत माणसांच्या सहवासात महान झाले नाहीत. कारण ज्योतिबांनी तथागतांना पाहिले नव्हते बाबासाहेबांनी ज्योतिबा आणि संत कबीरांना पाहिले नव्हते तरिही गुरु-शिष्याची शृंखला अद्वितीय अशी होती.ते दोन्ही राजे आजही जगात महानच आहेत. तरीही शिक्षणाची मक्तेदारी आपल्याकडे होती आणि बहुजनांना तर शिक्षणाची कवाडेच बंद होती. असे असताना जर बहुजनातील दोन राजांची महती गायली जात असेल तर ‘मनुस्मृती’ वर आधारित वर्ण आणि जाती व्यवस्थेची ही नाचक्की ठरणार हे ओळखून रामदास हे शिवरायांचे गुरु होते आणि त्यांच्यामुळेच शिवाजी महाराज घडले असे बिंबवण्याचे अत्यंत धूर्तपणे षडयंत्र रचले गेले आहे.

हा दावा खोडून काढताना पाण्यातील मासा निरंतर पाण्यात असतो.त्याला कुणी तरी पोहायला शिकवताना कुणी तरी पाहिलंय का असा उलट प्रश्न विचारुन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे रामदास हे शिवरायांचे गुरु होते अशी शेखी मिरवणा-यांची दातखिळी बसवतात.परंतु ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’अशा उक्ती प्रमाणे ‘खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं’ अशी परंपरागत पेशा पत्करलेले डोकी अधूनमधून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत कुरापत काढत असतात. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यातील गुरुशिष्य नात्याचा वाद अधूनमधून उफाळून येत असतो, जाणूनबुजून उकरुन काढला जातो.महाराष्ट्रात शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेचा जसा घोळ घालण्यात येतो त्याप्रमाणेच या गुरु-शिष्य वादालाही मोठी पार्श्वभूमी आहे. शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेच्या वादाचा उल्लेख गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्याचप्रमाणे शरद पवार यांना ‘जाणता राजा’ हे बिरुद लावलं जाण्याबाबतही त्यांनी आक्षेप घेतला होता.

त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी हे बिरुद मी स्वतः कधीच वापरण्यास सांगितलं नाही, असं स्पष्ट केलं होतं. तसे पाहिले तर ‘जाणता राजा’ ही उपाधी शिवाजी महाराजांनी रामदासांच्या अस्तित्वाची अजिबात दखल न घेतल्याने चिडून महाराजांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी,त्यांची मर्जी संपादन करण्याच्या हेतूने रामदासांनी स्वतःदिली होती, असे इतिहासाचे अभ्यासक आणि जाणकार सांगतात.पूर्ण अभ्यासाअंती रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते तर, मॉं जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं. त्याच त्यांच्या गुरु होत्या, असं सिद्ध झालं आहे.परंतु शरद पवार यांच्या अलिकडील गुरु-शिष्य या विषयी एका विधानामुळे रामदास आणि शिवाजी महाराज यांचे यांच्यातील हे (कथित) गुरुशिष्याचं नातं पुन्हा चर्चेत आलं आहे. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झालीच नव्हती.युगपुरुष शिवाजी महाराज म्हणजे तमाम बहुजनांचे दैवत आहेत हे ओळखून महाराजांच्या नावावर राजकारण केलं जातंय. अशा राजकीय पक्षांना शिवरायांच्या नावावर मतंही मिळतात. परंतु नवनवीन आश्वासने देऊन निवडून आलेल्यांना अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं नेमके काय झालं हे विचारायला मात्र कुणीही आवाज उठवत नाही हे खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे. छत्रपती हा उल्लेख टाळला तर शिवाजी महाराजांचा अपमान होतो ही जशी बहुजनांची मानसिकता तयार झाली आहे अगदी तसेच कुणाचाही अर्थाअर्थी संबंध नसताना कुणालाही महाराजांचा गुरु म्हणून पुढे केले जात असेल तर त्यांना रोखायचेही प्रयत्न व्हायला हवेत.

अधिकांश इतिहास अभ्यासक, संशोधक आणि इतिहासकारांच्या मते 1672 पूर्वी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे कुठेही उल्लेख आढळत नाहीत. त्यामुळे स्वराज्य निर्मितीच्या काळात, तसेच शिवाजी महाराज यांच्या बालपणी रामदासांनी मार्गदर्शन केले याबाबतचे पुरावेच सापडत नसल्यामुळे जे कुणी रामदासांचा उल्लेख शिवरायांचे गुरु म्हणून करतात ते तद्दन खोटे आहेत.
आजवर म्हणजे क्रांतीसुर्य ज्योतीबा तात्यांनी बहुजनांना अक्षर ओळख करून देईपर्यंत लेखन स्वातंत्र्यच नसल्यामुळे जे काही उपलब्ध साहित्य होते किंवा लहानपणापासून सोयीनुसार लावलेले जे शालेय अभ्यासक्रम शिकवले जाते ते अभ्यासून एक विशिष्ट वळणाची विचार सरणी तयार झालेली आहे.तेव्हां इतिहासाचे वाचन करताना तो कुणी लिहीला आहे याकडेही लक्ष देणे गरजेचे असते.

चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले वसंतराव वैद्य यांनी लिहिलेल्या श्री शिव-समर्थ भेट नावाचे पुस्तक 26 एप्रिल 1990 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत, ‘शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची शिंगणवाडी बागेत भेट झाली म्हणून त्याजागी रामदास आणि शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व मंदिर बांधण्यात आले’ असल्याचे चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त रा. ना. गोडबोले यांनी नमूद केले आहे.हे ध्यानात घेतले पाहिजे. त्या दोघांशिवाय वर उल्लेख केल्याप्रमाणे आजवर कोणत्याही प्रसिद्ध-प्रमुख इतिहासकार अथवा शिवचरित्रकारांनी शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यात गुरुशिष्याचं नातं होतं असं कधीच म्हटलेलं नाही.

तसेच दर बुधवारी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सोलापूर आकाशवाणी वर संतवाणी या कार्यक्रमात मंजुशा सोनटक्के या रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांच्या भेटीबद्दल आणि रामदासांनी केलेल्या चमत्कारांविषयी विश्वास न बसणा-या गोष्टी सांगतात हे ही योग्य नाही.हा वाद जाणूनबुजून काढला जात आहे.रामदासांच्या मनात शिवाजी महाराजांप्रती आदरभाव असेलही कारण ते राजे होते.परंतु रामदासांबद्दल शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आदरभाव असणे ही काही. असाधारण गोष्ट नाही. कारण शिवाजी महाराज हे मुळातच दयाळू वृत्तीचे होते.त्यामुळे केवळ रामदासच नव्हे तर,अगदी सर्वसामान्य रयतेच्या बद्दलही शिवरायांच्या मनात आदरभाव आणि दयाळू वृत्ती होती. आणि म्हणून तर शिवरायांचा उल्लेख गौरवाने रयतेचे राजे, प्रजाहितरक्षक म्हणून केला जातो.गोब्राम्हणप्रतिपालक म्हणून नव्हे.

त्यांनी महिपतगड आणि सज्जनगडावर रामदासांना राहाण्याची परवानगी दिली असेल, शिधा उपलब्ध करण्याचे आदेशपर पत्रंही किल्लेदारांना पाठवली असतील.तो शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील प्रजारक्षणाचा एक भाग होता. याला त्यांच्यात गुरुशिष्य संबंध असल्याचा पुरावा म्हणता येणार नाही.राज्यकर्ता म्हणून स्वराज्यातल्या संत-महंतांचा ते आदर, सन्मान करायचे हा भाग वेगळा. शिवाजी महाराजांचे कार्यच 1642 साली सुरु झाले होते. त्यांची रामदासांशी भेट झाली नसल्याचे अनेक संदर्भानुसार स्पष्ट झाले आहे. शिवाजी महाराजांचे रामदास गुरु असल्याचा सबळ पुरावाच कुठे आढळून येत नाही.
शिवाजी महाराजांचे रामदास गुरु असते तर ते पोर्तुगीज, डच आणि इंग्रजांच्या नजरेतून सुटलं नसतं. त्यांनी रामदासांचा उल्लेख नक्कीच कुठे ना कुठे केला असता. जसे नंतरच्या शतकातील ब्रह्मेंद्रस्वामींचा उल्लेख इंग्रजांनी केला आहे तसा रामदासांचा उल्लेख नक्कीच केला असता.

सज्जनगड व समर्थ रामदास या भाटे यांनी लिहिलेल्या पुस्तकात भास्कर गोसाव्यांनी दिवाकर गोव्यांना लिहिलेलं एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यात भास्कर गोस्वामी शिवाजी महाराजांकडे भिक्षेस गेले असता त्यांनी आपण रामदास स्वामींचे शिष्य असल्याचे सांगितल्यावर महाराजांनी कोण रामदास त्यांचे मूळ गाव व इतर चौकशी केल्याचा उल्लेख आहे.गुरुबद्दल एवढी अनभिज्ञता कुठलाही शिष्य दाखवत नाही हे विशेष रुपाने ध्यानात घेतले पाहिजे.शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी रामदासस्वामींचा संबंध असल्याचा कसलाही ठोस पुरावा नाही.तरिदेखील जर ओढून ताणून काही ठिकाणी तसा उल्लेख केला जात असेल तर मग अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो आणि तो म्हणजे अत्यंत शूर आणि पराक्रमी असलेल्या शिवाजी महाराजांचा एक शूद्र म्हणून राज्याभिषेक नाकारला जात होता तेंव्हा हे रामदास कुठे होते ? आपल्या एका शूर पराक्रमी शिष्याचा राज्याभिषेक, होणारा गौरव त्यांना मान्य नव्हता का ? महाराजांच्या बाजूने ते त्यावेळी का पुढे आले नाहीत ?

काहीही असो रामदासांना मानणारे कुणी कितीही अनेक कथा उपकथा जोडून रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु असल्याच्या कहाण्या पसरवून मारुन मुटकून महाराज हे गोब्राम्हण प्रतिपालक होते हे समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत असले तरी महाराज हे कुणा विशिष्ट वर्गाचे नव्हे तर ते सर्व रयतेचे प्रतिपालक होते हे निर्विवाद सत्य आहे.
त्यामुळे रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे ही निर्विवाद सत्य असल्यामुळे याबाबत वाद उकरुन काढणं हे अनावश्यक आहे.इतकेच !

✒️लेखक:-विठ्ठलराव वठारे(अध्यक्ष
भारतीय जन लेखक संघ, महाराष्ट्र)
मो. 9325499046.