पिंपळगांव देवी येथील यात्रा रद्द- मंदीरातील कार्यक्रमांना 10 भाविकांच्या उपस्थितीत परवानगी

27

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलडाणा(दि.30जानेवारी):-मोताळा तालुक्यातील पिंपळगांव देवी येथील जगदंबा देवी संस्थान येथे होणारा यात्रा उत्सव कोविड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. कोविड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सर्व सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम, अन्य मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

त्यामुळे गर्दी होणारे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड 19 साथरोगाची लाट पुन्हा उफाळून गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पिंपळगांव देवी येथील यात्रा उत्सवास परवानगी देण्यात आली नाही. मात्र मंदीराच्या आतील कार्यक्रमांसाठी 10 भाविकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे.

सदर सोहळ्याकरीता उपस्थितांना मास्क वापरणे बंधनकारक राहणार असून थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करणे अनिवार्य आहे. कार्यक्रमात उपस्थित व्यक्तींनी आरोग्य सेतू डाऊनलोड करावे. सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.
******