प्रत्येक नाशिककर हा असेल साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष – ना.छगन भुजबळ

27

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

नाशिक(दि.1फेब्रुवारी):-अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने गोखले एज्युकेशन सोसायटी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, महापालिकेचे अप्पर आयुक्त सुरेश खाडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपायुक्त मनोज घोडे पाटील, डॉ.मो.सो.गोसावी, चंद्रकांत महामीने, नगरसेवक शाहू खैरे, गजानन शेलार, जयप्रकाश जतेगावकर, शंकर बोऱ्हाडे, डॉ.कैलास कमोद, दिलीप खैरे, वसंत खैरनार, श्रीकांत बेनी, दत्ता पाटील, विनायक रानडे, रंजन ठाकरे, लक्ष्मण सावजी यांच्यासह नाशिक शहरातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देशभरातून येणाऱ्या प्रत्येकाचा यथोचित सन्मान व्हावा ; नाशिकचे साहित्य संमेलन संस्मरणीय व्हावे यासाठी माझ्यासह नाशिकच्या प्रत्येक नागरीकाने स्वागताध्यक्षाच्या भुमिकेतून संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे आवाहन यावेळी केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देशभरातून साहित्यिक येणार आहेत. याचे सगळे नियोजन करण्याची जबाबदारी स्वागतध्यक्ष म्हणून व एक नाशिककर म्हणून मी पार पाडणार आहे. तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या संमेलनस्थळाला ‘कुसुमाग्रज नगरी’ म्हणून नामकरण केले असल्याचे यावेळी जाहीर केले.

घरोघरी उभारा सहभागाची , सन्मानाची गुढी संमेलनाचा उत्साह आणि आनंद हा केवळ साहित्य संमेलनाचे आयोजन असलेल्या वास्तूभोवती न राहता संपूर्ण शहरात त्याचे प्रतिबिंब उमटायला हवे. यासाठी प्रत्येक नाशिककराने संमेलन काळात आपल्या घरावर या सन्मानाची आणि साहित्य सोहळ्याची गुढी उभारावी. जेणेकरून या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या शहरात आलेल्या साहित्यिक आणि मान्यवरांच्या मनावर प्रभाव पडेल की, प्रत्येक नाशिककर या सोहळ्यात तितक्यात तन्मयतेने सहभागी झाला आहे.

या संमेलनास शासनामार्फत 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार निधी मधूनही मदत दिली जाणार आहे. येत्या 50 दिवसांत सूक्ष्म नियोजन करुन संमेलनाची परिपूर्ण नियोजन करण्यात यावे. तसेच संमेलनासाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्या लवकरात लवकर गठीत करण्याची सूचनाही आयोजकांना केली. संमेलनाच्या काटेकोर नियोजनासाठी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महानगरपालिका, महावितरण आदी विभागांतील अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच संमेलनाच्या अनुषंगाने आलेल्या सूचनावंरही योग्य ती अंमलबजावणी करण्यात येईल

नाशिकमध्ये होणारे संमेलन वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येईल. तसेच यासाठी प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित आहे. माध्यमांनी देखील संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य व योगदान द्यावे तसेच कोरोनाचा प्रादूर्भाव अजून संपलेला नसल्याने संमेलन काळात कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जावे. तसेच त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याची सूचना केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी नाशिक महानगरपालिकेच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महापौर सतीष कुलकर्णी यांनी या बैठकीत दिले.
संमेलनाच्या निमित्ताने नाशिकची संस्कृती जगासमोर यावी तसेच आरोग्य विषयक परिसंवाद व्हावा अशी अपेक्षा डॉ. मो. स. गोसावी यांनी व्यक्त केली.