नाशिक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने टाळा ठोको हल्लाबोल आंदोलन

    36

    ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

    नाशिक(दि.6फेब्रुवारी):-महावितरणने वीजबिल न भरल्यास ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली असून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणच्या व महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ आज शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालय, तिबेटीयन मार्केट येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने टाळा ठोको हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

    कोरोना काळात अवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही. अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी महाविकास आघाडीच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची हिम्मत महाविकास आघाडी सरकार मध्ये नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून आधिच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नये.

    तसेच राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावा. निर्णय मागे न घेतल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यांवर उतरून पुन्हा आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे महाविकास आघाडी सरकारला दिला.

    यावेळी आ.देवयानी फरांदे , लक्ष्मणजी सावजी, हिमगौरी आडके, देवदत्त जोशी, नगरसेवक प्रशांत जाधव, पवन भगूरकर , हरिभाऊ लोणारी, नगरसेविका स्वाती भामरे, आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.