असा ही एक प्रपोज डे

  34

  I propose my undying love to you today! Will you hold my hand for the rest of life?

  हे शब्द कानात पडता हृदयाच्या खोल कप्प्यापर्यंत कधी जाऊन पोहचले हे कळलेच नाही. अन् हृदय लाजाळूच्या वेली सारखे अंकुचन पावले. खरंच विश्वास बसेना!! स्वप्नात तर नाही ना??.. उजव्या हाताने डाव्या हाताला चिमटा घेऊन पाहिले… हो खरंच होते..अगदी सत्य!!..

  ती धडधड करणारी ट्रेन हृदय दरवाजात कधी येऊन थांबली हे कळलेच नाही… हो ट्रेनच.. बुलेट ट्रेन!!… काॅलेजचा पहिला दिवस आणि ट्रेन मध्ये बसण्याचा पहिला प्रसंग. चौथ्या डब्यातील पाचवा बाकडा…शेजारी एक मध्यमवयीन अतिसुंदर महिला बसली होती. मी अंग चोरून तिथे बसलो. तिचे सौंदर्य न्याहळत असताना..समोरून आपल्याकडे कोणीतरी पाहतंय हे जाणवले, अन् मी नजर तिकडे वळवली. पहातच राहिलो..शेजारील महिलेचे ते प्रतिबिंब होते!!…

  चेहर्यावर सफरचंदी रंगाची छटा तर गालावर ओघळणार्या रेशमी केसांच्या बटा. धारदार नाजूक नाक सौंदर्य अधिकच खुलवित होते.ओष्ठ पाकळ्या जणू नुकतंच उमलणारे गुलाबाचे फुल. निळसर पाणीदार नेत्र तर ओसंडून वाहणारा अरबी समुद्र…किनार्यावर बसून अकंठ डुंबावे…भान हरपून गेले.
  एक तासाचा हा प्रवास कधी संपू नये असं वाटत होते. गाडी स्टेशनवर थांबली. मग सरळ काॅलेजचा रस्ता धरला.. पहिल्या गल्लीपासून चौदाव्या गल्ली पर्यंत पायपीट केल्यानंतर तो काॅलेजचा बोर्ड दिसला….हुश्श.. करत क्लास मध्ये प्रवेश केला. चौथ्या ओळीतील पाचव्या बाकड्यावर नजर गेली… शाॅकींग..खरंच शाॅकींग..ती धडधडणारी बुलेट ट्रेन..!! माझी धडधड बंद व्हायची पाळी आली होती. मला पाहताच एक ओळखीचे स्मित हास्य त्या कोमल चेहर्यावर तरळून गेले.

  संध्याकाळी परतीच्या प्रवासात परत तोच चौथ्या डब्यातील पाचवा बाकडा!!.. समोर येऊन बसली. हा बाकडा पुढील चार वर्षे एक साक्षीदार बनून राहिला. सकाळी बहुतेक आई सोडायला आली होती. आता मात्र एकटीच होती. मग शब्द संवाद सुरू झाला..

  नाव विचारले तर म्हटली, “मुझे मराठी नही आती।”

  “मराठी येत नाही तर मग?..”

  ती उत्तरली, “कन्नडा, हिंदी, इंग्लिश आती है।”

  “कन्नडा!!! ..निन्न या ऊरू??…”

  तिचे नेत्र विस्फारले, “निमगे कन्नड बरतत री??..”

  “हाऊदू ” मी उत्तर दिले…

  मला कन्नड येतंय हे समजताच अगदी हरखून गेली. भाषेचा पुलावरून हा प्रवास अलगद चालू झाला. मग रोज होणारी भेट अगदी रोज डे पर्यंत कधी मजल मारली हे कळलंच नाही..!!
  त्याला कारणही तसंच होते..नेहमीची होणारी वह्या पुस्तकांची देवाण घेवाण…एक दिवस..एका वहीतून मला तिच्या प्रेमाचा साक्षात्कार झाला तो ते वहीतील पिंपळपान व त्यावर कोरलेले माझे नाव!!..

  मग हा प्रवास बोगद्यातून पुढे गेला…सतारीची तार नाजूक झंकारली..मधुर संगीतमय नाद निघू लागले..अन् आज अचानक…!! हे गुढग्यामध्ये वाकून तिनेच मला केलेले प्रपोज!!..

  ?????????
  ✒️लेेेकख:-श्रीकांत दीक्षित(शाहूनगर,पुणे)मो:-805988172