श्यामची आई : सुसंस्काराचा अमूल्य ठेवा !

31

(श्यामची आई जन्म सप्ताह)

श्यामची आई ही पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना त्यांनी हे पुस्तक लिहून पूर्ण केले. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. या पुस्तकावर आधारित असलेला ‘श्यामची आई’ याच नावाचा चित्रपटदेखील पडद्यांवर झळकला. मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना या पुस्तकात मांडलेल्या आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीस प्रस्तावना व प्रारंभ ही प्रकरणे आहेत. नंतर रात्र पहिलीपासून रात्र बेचाळिसावीपर्यंत ४२ प्रकरणे आहेत. प्रारंभ या प्रकरणात आईची महती विशद केलेली आहे –

आईने तेलकट खाल्ले, तर मुलाला खोकला होईल, आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला, तर मुलाला थंडी होईल, त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळआपट केली, भांडणतंडण केले, तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणे, सवरणे, मुलाच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुध्दीचे, हृदयाचे दूध होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील, तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावे.

वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो; त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात, ही गोष्ट खरी. आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो; त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात, हे खरे. सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आई-बापांची कृत्ये, स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील, तर मुलांची मने कमळांप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील. नाहीतर ती किडींनी खाल्लेली, रोगट, फिक्कट, रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील. मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी.खरं तर पुस्तकात कोणतेही उपदेशाचे डोस साने गुरुजींनी पाजले नाहीत, परंतु प्रत्येक प्रसंगात, जीवनात प्रेमाने कसं वागावं याचा प्रत्यय आपल्याला येत राहतो. भूतदया, मांजरीचं प्रेम, म्हातारीची गोळी, श्यामचे पोहणे, बंधुप्रेमाची शिकवण, सांब सदाशिव पाऊस पडू दे, आईचा शेवटचा आजार, सात्त्विक प्रेमाची भूक अशा छोट्या छोट्या कथांमध्ये सर्वसामान्य घरातले प्रसंगच वर्णिले आहेत.

परंतु त्याकडे पाहायची सात्त्विक दृष्टी, लबाडपणा, खोटेपणा नसलेलं निर्मळ मन यामुळे ते प्रसंग आपल्या मनात ठसतात. ते प्रसंग आपण विसरूच शकत नाही. आपल्याला वाटेल हा श्याम काय लहानपणापासून असाच आदर्श होता की काय? मग याचे लहानपण, निरागसपण हिरावून गेले असणार? तसंही नाही. श्वासही खुलायचा, घरून पळून जायचाही त्यात प्रयत्न केलेला दिसतो. आई पाठवत नाही म्हणून रुसतानाही दिसतो. परंतु प्रेमळ आईच्या समजूत काढण्यावर त्याला ते पटतं आणि आई आपल्या चांगल्यासाठीच हे करीत असणार असा त्याला ठाम विश्वास असल्यामुळे तो प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकतो हेच तर हे पुस्तक आपल्याला सांगतं. श्यामची आई ही खरं तर सर्वसामान्य कोकणातली साधीसुधी आई; परंतु ती या श्याममुळे प्रसिद्धी पावली. कारण लेखक रक्ताची शाई करून लिहितात, मात्र साने गुरुजींनी हे पुस्तक आपल्या पावन अश्रूंनी लिहिले आहे.

श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३च्या पहाटे ती लिहून संपविली. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. प्रत्येक मायबाप व मुलांनी ते आवर्जून वाचले पाहिजे, असे मला वाटते.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे या साहित्यकृतीच्या लोकप्रियतेला मानाचा मुजरा !!

✒️संकलन व शब्दांकन -श्री निकोडे गुरुजी ऊर्फ
श्री निकोडे कृष्णकुमार गोविंदा.(मराठी व हिंदी साहित्यिक)
मु. श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ,रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.जि. गडचिरोली (४४२६०५)
मोबा. ९४२३७१४८८३.
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com