महर्षी मार्कण्डेयांच्या भक्तीची किमया

41

[महामृत्युंजय महर्षी मार्कण्डेय जयंती उत्सव.]

महामृत्युंजय श्रीमार्कण्डेश्वर हे अख्ख्या भारतातील पद्मशाली समाजाचेच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे आराध्य दैवत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात मार्कण्डादेव येथे मार्कण्डेश्वराचे मंदिर आहे. त्याची ‘विदर्भाची काशी’ म्हणून सर्वदूर ख्याती आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला दोन दिवस खुप मोठी जत्रा भरते. माघ शुद्ध ३ रविवार दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी महामृत्युंजय मार्कण्डेय महर्षींची जयंती आहे. या दिवशी जयंती उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या निमित्ताने हा लेख प्रपंच महामृत्युंजय श्रीमार्कण्डेश्वर चरणी अर्पण…!महामृत्युंजय मार्कण्डेय महर्षींची कथा : काही प्राचीन ग्रंथांत महादेवाचे परमभक्त महर्षी मार्कण्डेयांना दीर्घायुषी झाल्याचे म्हटले आहे. भगवान शिवाची उपासना व महामृत्युंजय सिद्धीने महर्षी मार्कण्डेयांनी सोळा वर्षांच्या अल्पायुष्यावर मात करून दीर्घायुष्य प्राप्त केले. तो भगवान शंकराचा सर्वार्थ साधक मंत्र असा आहे –

“श्री नीलकंठाय वृषभध्वजाय तस्मै शिव काराय नम: शिवाय:।।
अवन्तिकायां विहितावतारं मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम् ।।
अकालमृत्यो: परिरक्षणार्थं वन्दे महाकालमहासुरेशम् ।।”

मात्र सर्वपरिचित सप्त चिरंजीवांमध्ये मार्कण्डेयांचा समावेश नाही, हीच खंत भक्तांच्या मनाला बोचते. महर्षी भृगु यांची कुलपरंपरा फार मोठी आणि कर्तृत्वान वंशजांनी युक्त असली तरी त्यात अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते त्यांचे पणतू महर्षी मार्कण्डेय यांचे! भृगुंचे नातू मृकंड यांना मोठ्या तपश्चर्येनंतर भगवान शंकराच्या प्रसादाने झालेला हा मुलगा दिगंत कीर्तीमंत ठरला. तेजस्वी व कर्तृत्वान मुलगा हवा असेल तर तो केवळ सोळा वर्षेच जगणारा मिळू शकेल, असे भगवान शंकराने वर देतांना म्हटले. तेव्हा मृकुंड व पत्नी मरुध्वती हिने मोठ्या आनंदाने तो मुलगा मागून घेतला. मात्र पुढे या बाल मार्कण्डेयांनी तपोबलाने, वशिष्ठ व ब्रह्मदेवाच्या कृपेने मृत्यूवर मात केली. त्यांनी दीर्घायुष्य प्राप्त केले व मृत्युंजय ठरले, अशी पुराणात कथा आहे. चिरंजीव झालेल्या मार्कण्डेयांचे सर्व विषयांवरील ज्ञान आणि संशोधन विलक्षण आहे. याशिवाय प्रसंगानुरूप त्यांनी मृत्युंजयस्तोत्र रचले. तो महामृत्युंजय मंत्र असा –

“ॐ हौं जूं स: ॐ भूर्भुव: स्व: ओम त्रैम्बकम् यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम ।उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात् भूर्भुव: स्वरोम जूं स:।”

त्यांचे पितृपीडा निवारक स्तोत्र, केलेली नर्मदा परिक्रमा, भविष्यवर्णन आदींचे वर्णन त्यांच्या मार्कण्डेय पुराणात सांपडते. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या मार्कण्डादेव या शिव-तीर्थांची आणि तेथून जवळच असलेल्या आमगाव (महाल) येथील दोन श्रीमार्कंडेश्वर मंदिरे अजुनही दुर्लक्षितच आहेत. भारतीय पौराणिक साहित्यामध्ये जी अठरा पुराणे आहेत, त्यात एक अतिशय महत्वाचे असे श्रीमार्कण्डेश्वर पुराण देखील आहे. या महर्षींचे पौराणिक महत्व विशद करण्यासाठी याहून अन्य दाखल्यांची गरज भासू नये.

महामृत्युंजय श्रीमार्कण्डेश्वर पुराण : हे पुराण महर्षी मार्कण्डेयांनी स्वतः कथन केल्यामुळे या पुराणाला मार्कण्डेश्वर पुराण हे नाव मिळाले. प्रदीर्घ तपाने चिरंजीवित्व मिळवलेले ऋषी म्हणजे मार्कण्डेय महर्षी होत. श्रीमहाभारत संस्करणाच्या बाबतीत महत्त्वाच्या असलेल्या भार्गव ऋषींच्या वंशातील हे महर्षी होते. हे पुराण प्राचीन असून याचा काळ साधारणतः इसवी सनाचे तिसरे शतक असावे, असे सांगितले जाते. गुप्तकालीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे हे पुराण त्याकाळी म्हणजे इ.स.च्या चौथ्या-पाचव्या शतकात गोदावरीच्या उगमावर लिहिले गेले असावे. त्यात सर्ग – जगाची निर्मिती, प्रतिसर्ग – प्रलय, वंश – राजवंश, मन्वंतरे – विशिष्ट कालखंड व वंशानुचरीत ही पुराणाची पाचही लक्षणे दिसून येतात. त्यात १३७ अध्याय असून सुमारे ६,९०० श्लोक आहेत.

या पुराणात केवळ एकच वक्ता नाही. तर अध्याय क्र.१ ते ४२पर्यंत वक्ता जैमिनी व श्रोता पक्षी आहे. अध्याय क्र.४३ ते ९०पर्यंत वक्ता मार्कंडेय ऋषी व श्रोता क्रप्टुकी आहे व नंतरच्या अध्यायांमध्ये वक्ता सुमेधा व श्रोता सुरथ व समाधी आहेत. अठरा पुराणात सातव्या स्थानावर असलेल्या या पुराणाच्या शेवटी मार्कंडेय ऋषींनी पुराण श्रवणाचे फळ सांगितलेले आहे. या पुराणाचे जो श्रवण करतो त्याची पृथ्वीवरील वंशपरंपरा चालत राहाते, त्या मनुष्याची पापांपासून मुक्ती होते. परम योगाची प्राप्ती होते. त्यास हजार अश्वमेध व शंभर राजसूय यज्ञाचे फळ मिळते. सर्वकल्याण व शुभार्थ प्रभावशाली मानला जातो तो श्रीमार्कण्डेश्वर पुराणाचा मंत्र –

“सर्व मंगलं मांगल्ये शिवे सर्वाथ साधिके ।।
शरण्येत्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुऽते ।।
सर्वाबाधा विनिर्मुक्तो धन-धान्य सुतान्वितः ।।”

(‘हे मोक्षा, आम्हास स्वतंत्र कर, मुक्ति दे!’ आम्ही भगवान शिवाची पूजा करतो, ज्यास तीन नेत्र आहेत. जो हर श्वासांत जीवन शक्तीचा संचार करतो आणि संपूर्ण जगाचे पालन-पोषण करतो. रोज रुद्राक्षमाळेने या मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यूचे भय दूर होते. तो सर्व संकटातून मुक्तता करणारा, संपत्ती व संततीचा दाता आहे.)जैमिनी ऋषी हे मार्कण्डेय महर्षींना प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांची उत्तरे द्रोणपुत्र पिंगाक्ष, विबोध, सुपुत्र व सुमुख देतात. या संवादाने पुराणाची सुरुवात होते. पाच पांडवांची पत्नी द्रौपदी एकटी कशी? तिच्या लहान मुलांना का मारले गेले? अशा प्रश्नांची चर्चा यात केली आहे. पराक्रमी बलदेवाला तीर्थयात्रा करून ब्रह्महत्येच्या पापाचे निवारण का करावे लागले? याची कथा त्यात दिसते. राजा हरिश्चंद्राचे आख्यानही यात आले आहे.

त्यात राजांच्या निमित्ताने असाधारण असा त्यागाचा, वचनपूर्तीचा दुर्मिळ आदर्श उभा केला आहे. तेथे ब्रह्मवादिनी मदालसेची कथा येते. यानंतर वर्णाश्रम धर्म कथन, नित्य-नैमित्यिक श्राद्धकल्पाचे वर्णन केले आहे. दत्तात्रेयांच्या अवताराची कथा या पुराणात आली आहे. योगशास्त्राचे निरूपण देखील यात आले आहे. सृष्टी, प्रलय, भुवनकोश, मन्वंतरे, द्विपांचे भौगोलिक विवरण येते. वंश वर्णनात इक्ष्वाकु वंश, सोमवंश, यदुवंश यांचे वर्णन येते. हैहय चरित्र, अलर्क चरित्र, नऊ प्रकारच्या सृष्टिचे पुण्यमयी वर्णन, कल्पान्त कालाचा निर्देश, यक्ष-सृष्टी निरूपण, रुद्रादिकांची सृष्टी, द्वीपचर्या इत्यादी वर्णने महत्त्वाची आहेत.सुरथ, समाधी व सुमेधा यांच्या संवादातून मधुकैटभ, महिषासुर, शुम्भ, निशुम्भ यांच्या वधाची कथा येते. प्रकृती स्वरूपिणी देवी हीच विश्वाची प्रेरक शक्ती आहे, हा मूळ हेतू या पुराणाचा आहे. यात नंदा, रक्तदंतिका, शताक्षी, शाकंभरी, दुर्गा, भीमा, भ्रामरी हे देवीचे सात अवतार मानले आहेत.

चण्डाचा वध करून देवीला चण्डिका नाव कसे पडले? याची कथाही यात येते. दुर्गासप्तशती या नावाने प्रसिद्ध असलेले देवीमहात्म्य या पुराणाच्या तेराव्या अध्यायात आलेले आहे. सर्वमंगला अशा देवीची निर्मिती ही सर्व देवांचे तेजस्वी अंश एकत्र होऊन झाली, असेही वर्णन याच्या ७९व्या अध्यायात दिसते. हा श्रीमार्कण्डेश्वर पुराणाचा अंश आहे. तो देवी महात्म्य धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारही पुरुषार्थांना प्रदान करण्यास सक्षम आहे. सप्तशतीमध्ये काही असेही स्तोत्र व मंत्र आहेत, जे विधिवत पारायणाने इच्छित मनोकामनांची पूर्ती करतात, असे म्हटले जाते. देवीचा ध्यान मंत्र –

“देवी प्रपन्नार्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य ।
प्रसीद विश्वेतरि पाहि विश्वं त्वमीश्चरी देवी चराचरस्य ।”

अग्नी, सूर्य यांचीही स्तोत्रे यात दिसून येतात. राजा अविक्षिताचे चरित्र, नल राजाचे चरित्र, प्रभू रामचंद्राची कथा, भगवान श्रीकृष्णाचे बालचरित्र अशी इतर आख्यानेही यात आहेत. भ.श्रीकृष्णाच्या बाललीला, त्यांच्या मथुरा, द्वारका येथील लीला, अशा सगळ्या प्रकारच्या अवतार-कथा यामध्ये येतात.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे महामृत्युंजय श्रीमार्कण्डेश्वराय नमोऽनमः !!

✒️संकलक व लेखक:-श्री निकोडे कृष्णकुमार जी. गुरुजी.
(मराठी व हिंदी साहित्यिक तथा संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.)मु. पो. ता. जि. गडचिरोली.
मधुभाष – ७७७५०४१०८६.
email – nikodekrishnakumar@gmail.com