कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सदैव तत्पर रहावे – पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

24

🔹शिवजयंती साधेपणाने साजरी करावी

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलडाणा(दि.13फेब्रुवारी):- समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांती प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य टिकून राहून प्रगती होते. तरी नवीन भरती होणाऱ्या पोलिसांनी ही बाब प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सदैव तत्पर रहावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.स्थानिक प्रभा सभागृह येथे अनुकंपा तत्वावर पोलीस शिपाई पदावर नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे आदी उपस्थित होते.

आगामी येणारी शिवजयंती कोविड आजाराच्या पार्श्वभूमी वर साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन करीत पालकमंत्री म्हणाले, शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात यावी. याबाबत सर्वत्र जनजागृती करावी. माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी पोलिस यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. गुणवत्तेच्या आधारावर निवड होणे ही बाब ती उमेदवारांच्या बाबतीत महत्वाची असते. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कार्यक्रमा मागील आयोजनाची भूमिका विषद केली. याप्रसंगी पोलीस विभागातून पोलीस अंमलदार या पदावरून पोलीस उपनिरीक्षक पदावर एमपीएससी विभागीय परीक्षेतून निवड झालेले अंमलदार यांचा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये रमेश दळवी, नानाभाऊ काकड, विष्णू बोडखे, शेख अख्तर शेख सत्तार व संदीप बालोद यांचा समावेश आहे.
तसेच अनुकंपा तत्त्वावर भरतीतील उमेदवारांना पोलीस शिपाई या पदावर नेमणूक देण्यात आली आहे. अशा सर्वांना पालकंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पोलीस दलात ३१ जणांना नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. संचलन पोलीस शिपाई निलेश रत्नपारखी यांनी तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.