सवंगडी कट्टा द्वारे आयोजित आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद

28

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.14फेब्रुवारी):-शहरातील सवंगडी कट्टा व सुश्रुत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ हेमंत मुंडे ,वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, गंगाखेड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिनांक 14 फेब्रुवारी रोजी शहरातील द्वारका फंक्शन हॉल येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.सवंगडी कट्टा मित्रपरिवार गेल्या 4 वर्षापासून विविध सामाजिक, धार्मिक, आरोग्यदायी उपक्रम शहरात राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन तहसिलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर सत्कार मूर्ती डॉ हेमंत मुंडे, डॉ.स्वाती मुंढे, प्रमुख पाहुणे म्हणून नारायण सेवा संस्थानच्या अध्यक्षा मंजुषा दर्डा, डॉ. पी.आर.चट्टे ,डॉ गोविंद रसाळ, डॉ. केशव मुंडे, डॉ.किशन गारोळे, धारखेड च्या नवनिर्वाचित सरपंच आशाताई चोरघडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या शिबिरामध्ये ह्रदयाच्या सर्व तपासण्या 2D इको, मधुमेह, थायराइड ,व इतर तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरात जवळपास 261 रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली . यावेळी तहसीलदार कंकाळ यांनी सवंगडी कट्टा या शहरामध्ये विविध सामाजिक व लोकहिताचे उपक्रम राबवून समाजाला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे व आजच्या या शिबिराचा निश्चितच गरजू रुग्णांना फायदा होणार आहे असे प्रतिपादन केले. मंजूषा दर्डा यांनीही सवंगडी कट्टा यासह डॉ. हेमंत मुंडे यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमात शॉर्ट फिल्म मेकर दिग्दर्शक गोपी मुंडे यांनी डॉ. मुंडे यांच्या वैद्यकीय सेवेची एक प्रातिनिधिक भावनिक शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली.

कार्यक्रमच्या यशस्वीते साठी सवंगडी कट्ट्याचे रमेश औसेकर, मनोज नाव्हेकर, कारभारी नीरस, प्रा डॉ मुंजाजी चोरघडे, गजानन महाजन, पारस जैन, गोपाळ मंत्री,डॉ योगेश मल्लुरवार, प्रवीण जायभाये, राजकुमार फड, लक्ष्मीकांत नाव्हेकर, प्रशांत शिंदे, विशाल देशमुख ,अतुल तुपकर, दिलीप सोळंके ,सुहास देशमाने ,नंदकुमार सोमानी, शेख खाजा, हरिभाऊ सावरे, केशव देशमुख, अक्षय जैन, योगीराज चावरे, सुहास पाठक, संतोष मुंडे, सचिन सुपेकर, फेरोज शेख, कृष्णा तापडिया आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू मुरकुटे तर आभार मनोज नाव्हेकर यांनी मानले.