दिङोरी गटशिक्षणाधिकारी मा.भास्कर कनोज यांची चिंचखेड शाळेला भेट

29

🔸चिंचखेडच्या विद्यार्थ्यांनी अनुभवलेले आगळे वेगळे साहेब

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

दिङोरी(दि.15फेब्रुवारी):- तालुक्यातीलचिचंखेङ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गटविकासाधिकारी भास्कर कनोज यानीभेट दिली.

“Education is the key to unlocking the world, a passport to freedom.”

ओप्रा विंफ्रे यांचं हे वाक्य, शिक्षण आणि शाळेची महत्ता सांगतं. शिक्षण हे जगाला उघडण्याची चावी होय. पण कोरोना काळात शाळेतील पाखरांचा चिवचिवाट आणि शाळेची वाजणारी घंटा कुठेतरी लुप्त झाली होती. शाळा सुरू झाल्या आणि पुन्हा तोच तजेलदारपणा विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावरून ओसंडून वाहायला लागला. कोरोना काळात देश लॉकडाऊन मधून जात होता, पण दिंडोरीचे ज्ञानदूत, नवोपक्रमशील गटशिक्षणाधिकारी मा. श्री कनोज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी मधील शिक्षण मात्र जडत्वाच्या नियमाला खो देत धावतच होते.

शाळा सुरू झाल्या; शाळांनी वेग पकडावा व प्रगतीची शिखरे गाठावीत हा निर्धार घेऊन मा श्री. कनोज साहेब यांनी शाळांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. अशातच मा. श्री. कनोज साहेबांनी जि. प. प्राथ. शाळा चिंचखेड येथे आज वार शुक्रवार दि.12.02.2021 रोजी भेट दिली. यावेळी कार्यकुशल व उत्तम मार्गदर्शक असे जोपुळ केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. ठाकरे साहेबही उपस्थित होते.इंग्रजांची राजवट संपली पण ‘साहेब’ या शब्दाचा आजही असा काही दरारा आहे की, नुसता शब्द ऐकला तरी अनेकजण गर्भगळीत होतात. तसाच काहीसा प्रवास चिंचखेडचे शिक्षक व विद्यार्थ्यांचा चालू होता. पण प्रत्यक्ष ती वेळ आली. मा. श्री. कनोज साहेब शाळेत आले. शाळेत प्रवेश करताच साहेबांनी शालेय आवार व शाळेच्या भौतिक सुविधांची अतिशय बारकाईने पाहणी केली. त्यासमवेत आवश्यक तेथे सूचना केल्या. विद्यार्थी नेहमी कार्यप्रणव असावेत यासाठी त्यांनी काही उपक्रम सांगितले.

तदनंतर मा. श्री. कनोज साहेब व मा. श्री. ठाकरे साहेब यांनी वर्गांना भेटी दिल्या. ‘साहेब’ हा शब्दही ऐकूनही मुले घाबरतात, त्यांचे शब्द त्यांच्या मनातच घुटमळतात. पण आज चिंचखेडच्या विद्यार्थ्यांनी आगळेवेगळे साहेब अनुभवले. वर्गात प्रवेश करताच साहेबांनी हसत खेळत लहान मुलांप्रमाणे त्यांच्याच मधील एक असल्याप्रमाणे हितगुज करायला सुरुवात केली. त्यांनी सर्व उच्च प्राथमिक वर्गांना भेट दिली. प्रत्येक वर्गात हास्यविनोद करत, विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी करत; त्यांचा अभ्यास व कोरोना काळातील त्यांच्या दिनक्रमाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचा आणि साहेबांचा संवाद बघून शिक्षकही कोड्यात पडल्यागत वाटत होते. विद्यार्थी मनमुराद हसत होते. यादरम्यान साहेबांनी गावातील बिबट्याच्या दहशतीस अनुसरून विद्यार्थ्यांना जंगली प्राणी आणि त्यांचे संकटात आलेले वास्तव्य याविषयी माहिती दिली.

सरतेशेवटी साहेबांनी कार्यालयात प्रवेश केला. साहेबांनी कार्यालयीन अभिलेख्यांची तपासणी केली व आवश्यक तेथे सुधारणाही सुचविल्या. शाळेने मागच्या वर्षी राबविलेले विविध उपक्रम व स्पर्धा यासंबंधी साहेबांनी हितगुज केली. शाळेची वाटचाल पाहून समाधान व्यक्त केले. शाळेचा आलेख नेहमी असाच चढत राहावा असा आशावाद व्यक्त केला.
*विद्यार्थ्यांचे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून जि प शाळा चिंचखेड येथे प्रवेश घेतलेल्या 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांविषयी ऐकून मनस्वी आनंद व्यक्त केला.* विद्यार्थी हाच सर्व शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असावा. विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण करण्यासाठी छोटे व गमतीदार असे अनेक उपक्रम साहेबांनी सांगितले. साहेबांनी तालुक्यातील शाळांनी स्वतःशीच स्पर्धा करून एक आदर्श निर्माण करावा अशी याप्रसंगी इच्छा व्यक्त केली.

Leadership is based on inspiration, not domination; on co operation, not intimidation.

या वरील ओळी नेतृत्व म्हणजे नुसती अधिकारवाणी नसून प्रेरणेचा स्रोत आहे हे सांगतात. नेतृत्व म्हणजे काय असते आणि नेता कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण आज चिंचखेड शाळेच्या प्रत्येक घटकाने अनुभवले.

शाळेचे मुख्या. श्री. संजय चौधरी सर यांनी मा. श्री. कनोज साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. श्री. मनोहर देसले सर यांनी केंद्रप्रमुख श्री. दादासाहेब ठाकरे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तर याप्रसंगी उपस्थित असलेले जोपुळचे श्री. अहिरे सर यांचा श्री.शंकर ठाकरे सरांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.या प्रसंगी शाळेतील शिक्षक श्री.सुधाकर भामरे सर,विठ्ठल डंबाळे सर,उत्कर्ष कोंडावार सर,प्रकाश पाटील सर व श्रीमती. प्रतिभा गुरव म्याडम उपस्थित होत्या.

मा.श्री. कनोज साहेबांनी शाळेला दिलेली भेट, त्यांनी विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी केलेली अनौपचारिक चर्चा, विद्यार्थी कार्यप्रवण करण्यासाठी सांगितलेले विविध उपक्रम, भौतिक सुविधा व आवश्यक सुधारणा शाळेसाठी नेहमीच अमूल्य असतील. यासमयी उपस्थित असलेले मा.श्री ठाकरे साहेब हे नेहमीच केंद्रातील शाळांना मार्गदर्शन करत असतात.आजची साहेबांची भेट शाळेसाठी नवी ऊर्जा व नवी उभारी देणारी नक्कीच असेल. विद्यार्थी व शाळेने अनुभवलेली साहेबांची आजची आगळीवेगळी भेट चिरस्मरणीय होती.