जिल्ह्यात महारेशीम अभियानाची सुरूवात- रेशीम रथास जिल्हाधिकारी यांनी दिली हिरवी झेंडी

25

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलडाणा(दि.15फेब्रुवारी):- जिल्हा रेशीम कार्यालयमार्फत सन 2021-22 मध्ये रेशीम शेतीसाठी लाभार्थी निवड करण्यासाठी महा-रेशीम अभियान 2021 ची सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांचे हस्ते महा रेशीम अभियानाचे रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून उद्‌घाटन करण्यात आले. अभियानाच्या उदघाटनप्रसंगी उप जिल्हाधिकारी (रोहयो) अनिल माचेवाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, प्रकल्प अधिकारी सुनील दत्त फडके, तसेच भैरूलाल कुमावत, मुकुंद घाटे, रामदास आटोळे, श्रीपाद कलंत्रे, सचिन श्रीवास्तव, शिवप्रसाद मुंगळे, पवन शिंदे, दत्तात्रय शिंदे, जगदीश गुळवे, श्री. पारवे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती म्हणाले, बागायत क्षेत्र असलेल्या निवडक गावांच्या समुहामध्ये रेशीम शेतीस मोठया प्रमाणावर वाव असल्याने शेतकऱ्यांनी अभियान कालावधीमध्ये रेशीम शेती करण्यासाठी नोंदणी करून मोठया संख्येने सहभागी करून घ्यावे. वातावरण बदलामुळे पारंपारीक शेतीमधुन शेतकऱ्यांना निश्चित व शाश्वत उत्पन्न मिळणे दिवसेंदिवस जिकिरीचे होत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमखास शाश्वत उत्पन्नाची हमी असलेल्या रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

तुती पिकास शासनाने कृषि पिक म्हणुन घोषित केल्यामुळे इतर पिकाप्रमाणेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दूप्पट करणेसाठी रेशीम शेती उपयुक्त ठरणार आहे. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत रेशीम शेतीस अनुदान दिले जाते. यामध्ये तुती रोपवाटिका तयार करणे, सुधारित वाणाची तुती लागवड करणे, रेशीम कीटक संगोपन गृह बांधणे, संगोपन साहित्य खरेदी करणे या घटकांचा समावेश आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले.

रेशीम अंडीपुजांसाठी 75 टक्के व कोष उत्पादनावर प्रती किलो कोषास 50 रूपये जिल्हा वार्षिक योजनेमधुन अनुदान देण्यात येत असल्याचे प्रकल्प अधिकारी सुनील फडके यांनी सांगितले. अभियान कालावधीमध्ये रेशीम शेतीस वाव असलेल्या निवडक गावामध्ये रेशीम शेती करण्यसाठी रेशीम कर्मचारी,शास्त्रज्ञ, रेशीम उद्योजक व कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेशीम रथाच्या माध्यमातुन जिल्हाभर विस्तार कार्यक्रम घेऊन जनजागृती द्वारे शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्हयास सन 2021-22 करिता देण्यात आलेल्या 200 एकर तुती लागवडीचा लक्षांक पुर्ततेसाठी अभियान कालावधीमध्ये जिल्हयातील निवडक गावामध्ये रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिदधी करण्यासाठी विविध कार्यक्रम घेऊन नविन तुती लागवडीकरिता लाभार्थी निवड निश्चित करण्यात येणार आहे.

रेशीम कोषास प्रति किलोस 350 ते 450 रूपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्यामुळे रेशीम शेतीस चांगले दिवस आले आहेत. अती वृष्टीमुळे जिल्हयात एकाही शेतकऱ्याचे तुती पिकाचे नुकसान झालेले नाही, याउलट कोरोना कालावधीमध्येही शेतकऱ्यांना रेशीम शेतीपासून शाश्वत उत्पादन मिळाले ही अत्यंत आनंदाची बाब आहे. चालू वर्षी जिल्हयात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे शेतकऱ्याकडे सिंचनाची मुबलक सुविधा निर्माण झालेली आहे. त्यामुळे रेशीम शेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन रेशीम प्रकल्प अधिकारी यांनी केले.

अशी आहे रेशीम कोष उत्पादन योजना

जिल्हयात मनरेगा अंतर्गत तुती लागवडीद्वारे रेशोम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत प्रति एकर (1 एकर मर्यादित ) रक्कम रू. 2,13,010 अकुशल (मजूरी स्वरूपात) व कुशल रक्कम रू 1,10,780 अशी एकूण 3,23,790 रूपये कामाचा मोबदला तीन वर्षात विभागून देण्यात येतो.

या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकरी हा अल्पभुधारक असावा. रेशीम शेतीसाठी लाभार्थ्याकडे स्वमालकीची जमीन व कुटूंबाचे मनरेगा जॉब कार्ड असावे. या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी गावामध्ये किमान 10 ते 25 शेतकऱ्यांचा गट असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्याकडे बारामाही सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी तुती लागवड करण्यासाठी अभियान कालावधीमध्यें नोंदणी करावी. रेशीम शेती हा शाश्वत उत्पन्न देणारी, कुटुंबातील सर्व व्यक्ती करू शकणारा शेतीवर आधारीत जोडधंदा असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भाग घ्यावा असे आवाहन केले. रेशीम शेतीमध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, धाड रोड, मुट्ठे ले आउट, भोंडे हॉस्पिटल जवळ, बुलडाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.