पैठणीवरचं नक्षीदार नातं

26

झी मराठीवर होममिनिस्टर हा कार्यक्रम सुरू झालेला होता.रोज संध्याकाळी हा कार्यक्रम बघण्यात आमचं कुटुंब एकत्र बसलेलं असायचं.आणि आमच्या वहिनीला इथंच स्वप्नं पडायला सुरुवात झाली.की,होम मिनिस्टर माझ्याही घरी यावा.मलाही पैठणी मिळावी.आणि आपणही टीव्ही वर दिसावं.आणि वहिनी कार्यक्रम संपल्यानंतर आदेश भावजी जो नंबर सांगायचे त्यावर ती रोज मेसेज करू लागली.मी म्हणायचो तिला,”अगं वहिनी ते कशाला येतील आपल्या घरी एवढ्या दूर, ते फक्त पुणे मुंबईतल्याच घरी जात असतात.तू हा नाद सोडून दे.” त्यावर वहिनी म्हणायची,”नितीन भावजी,बघा एक ना एक दिवस आपल्या घरी होममिनिस्टर येणारच असं म्हणून ती तिच्या कामात व्यस्त व्हायची.आणि मी त्यावर #थोबाड बघावं आपलं आरशात” असं बोलून पळून जायचो.त्यावर ती मागून ओरडायची. ” या गिळायला मग बघते कोण देतंय ताट वाढून असं चिडून बोलायची.”आणि घरातले सगळेच खळखळून हसायचे.पण वहिनी अगदी पार त्यात गुंतून गेलेली असायची.

प्रत्येक कार्यक्रम तो जवळ बसून बघायची.एकटीच उगाचच हसायची,मोठ्याने खिदळायची.मला गम्मतच वाटायची.
माझी बारावी झाली.आणि मी पुण्यात आलो.काम करून शिकायला लागलो.अधून मधून फोनवर दादाशी आणि वहिणीशी बोलणं व्हायचं.तिला कधी करमत नसलं की ती मला फोन करायची.मला करमत नसलं की मी तिला फोन करायचो.कारण तिच्याच मायेच्या पदराखाली मी मोठा झालो.सुनिता वहिनी माझ्यासाठी आई होती,मोठी बहीण होती,आणि मनातलं सगळं मनमोकळेपणाने बोलण्यासाठी हक्काची जागा होती.
मला तो दिवस आठवतोय.मी कंपनीमध्ये बसलो होतो.आणि समोर लँडलाईन फोन होता.चला म्हणलं वहिनीची जरा गंमत करूया.असं म्हणून मी रुमाल तोंडाला लावला आणि वहिनीला फोन केला,हा लँडलाईन चा नंबर बघून तिने तो कट केला.

मी परत लावला मग तिने उचलला.मी जरा मोठ्या आवाजात रुमाल तोंडाला लावून अगदी शुद्ध पुणेरी भाषेत बोललो,”हॅलो,नमस्कार सुनिता चंदनशिवे यांच्याशी आम्ही बोलतोय का?”वहिनी घाबरत होय म्हणाली,मी लगेच पुढचं वाक्य बोललो, “ह आम्ही झी मराठी मधून होम मिनिस्टर या कार्यक्रमामधून बोलतोय आणि आम्ही उद्याच तुमच्या घरी कवठेमहांकाळ ला म्हणजे सांगलीला येतोय.आपली परवानगी आहे असे आम्ही समजावे का?” त्यावर वहिनी मोठ्याने तीन वेळा ” या या या” असं म्हणली.बाकीचं जरा इकडंच तिकडचं बोललो,आणि “उद्या संध्याकाळी आम्ही बरोबर पाच वाजता आपल्या घरी येत आहोत” असं म्हणून मी फोन कट केला.नंतर मी कामात व्यस्त होऊन गेलो.वहिनीला फसवलं याचा मनात आनंद झालेला होता.पण आनंदाने उड्या मारण्याचं माझं वय आता निघून गेलेलं होतं.

गावी मात्र सुनिता वहिनीने सगळीकडे बोंबलत ही बातमी आनंदाने पसरवली.भावाला कामावरून सुट्टी काढून बोलावून घेतलं.तिचा आनंद बघून सगळेच आनंदी झाले.साफसफाई सुरू झाली.नव्या दोन साड्या आणल्या.ही बातमी बायकांच्या जवळची असल्यामुळे आपोआप सगळ्या गावभर झाली.आणि सुनिता वहिनी एकदम सेलिब्रिटी झाली.एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही.वहिनीने तिच्या तीन बहिणी,तिचे दोन भाऊ,माहेरची सगळी माणसं आई वडील,तिच्या मावशी,सगळ्यांना ताबडतोब गाडीला बसायला सांगितलं.बघता बघता बातमी ग्रामपंचायतपर्यंत पोहचली.आपलं गाव टीव्ही वर दिसणार म्हणून सरपंच,उपसरपंच इतर सदस्य आणि विरोधी पक्षातले पण सगळ्यांची मिटिंगसुद्धा बसली.आणि बघता बघता आमचं घर आणि आमच्या सुनिता वहिनीची चर्चा वाऱ्यागत पसरत राहिली.सेलिब्रिटी असल्यागत आमची वहिनी वागू लागली.अचानक तिचं ग्रामीण बोलणं अगदी शुद्ध झालं.तिचं चालणं तिचं बोलणं सगळं बदलून गेलं.

आमचा दादाही तिच्या आनंदात हरवून गेला.आणि लग्नात सुद्धा एवढं मेकअपचं सामान आणलं नव्हतं त्याहून कितीतरी जास्त आणि महाग सामान दादाने तिला आणून दिलं.दोन तासात त्याने आणि त्याच्या मित्रानी घर ही रंगवून काढलं.आणि सगळ्या गावात होमिनिस्टरचं वातावरण तयार झालं.बिश्या फोडून आमच्या घरातल्या सगळयांना नवीन कपडे घेतले गेले.मला यातलं एक टक्काही काही माहीत नव्हतं.मी माझ्याच नादात इकडं रमून गेलो.आणि आपण वहिनीला होममिनीस्टर बोलतोय म्हणून फोन केला होता हे ही विसरून गेलो.कारण अशा गमती जमती करणं हा माझा रिकामा उद्योगच होता.त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या माहेरहून वीस पंचवीस माणसं लहान लेकरं वेगळीच.अस सगळं गणगोत गोळा झालं.आणि फार मोठा उत्सव असल्यागत वातावरण झालं.नुसतं आमच्या घरातच नाही तर गल्लीतसुद्धा सगळ्यांच्या तोंडात एकच चर्चा एकच विषय आणि तो म्हणजे होममिनिस्टर आणि सुनिता.आणि आमच्या सुनिता वहिनीचा रुबाब म्हणजे काय सांगावं.तिच्यासमोर इतर बायका म्हणजे चिल्लरच.एकटीचीच बडबड,सगळ्यांना आदेश सोडत होती.ये असं करायचं,तसं करायचं कुणी दंगा करायचा नाही.मध्ये मध्ये बोलायचं नाही.आणि सगळेजण तिचा आदेश नम्रपणे ऐकून घेत होते.आणि सुनिता वहिनी एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेली होती.

सायंकाळचे चार वाजून गेले.घरासमोर गर्दी झाली.सुनिता वहिनी बघावं आणि बघतच राहावं अशी नटली होती.सगळे नातेवाईक नटून थटून बसलेले होते.अजून कसं कुणी आलं नाही म्हणून हळूहळू वातावरण काळजीचं होऊ लागलं.दादाने तिच्या मोबाईलवर आलेल्या म्हणजे मी केलेल्या नंबरवर परत परत फोन करायला सुरुवात केली.पण फोन काही कुणी उचलत नव्हतं.कारण रविवार होता आणि ऑफिस बंद होतं.मी रूमवर झोपलो होतो.काय झालं कुणास ठाऊक,वडिलांना शंका आली आणि त्यांनी मला फोन केला.मी वडिलांचा नंबर फादर म्हणून सेव्ह केला होता.मी फोन उचलला तसे वडील म्हणाले,” हे बघ मी तुझा बाप आहे,मी जे विचारीन त्याचं एकाच शब्दात उत्तर द्यायचं आणि खरं द्यायचं.”मी घाबरलो,अण्णा असं का बोलतायत म्हणून मी उठुनच बसलो.फोन कानाला आवळून धरला.आणि वडील म्हणाले,” ते कोण टीव्ही वाले येणारयत म्हणून सुनिताला काल तूच फोन केला होता का?”मी गप्प झालो,वडिलांनी आवाज वाढवून पुन्हा विचारलं आधीच धमकी दिली होती मी पटकन म्हणलं ” होय अण्णा मीच काल आवाज बदलून वहिनीला फोन केला होता.

“त्यावर अण्णांनी असल्या शिव्या दिल्या मला की बस्स.आपोआप डोळ्यातून पाणी यायला लागलं.मी फोन कट केला.आणि माझ्या बहिणीला फोन केला, म्हणलं “तायडे,काय सुरुय ग घरी,?'” त्यावर माझी बहिण इतक्या आनंदाने तिथल्या वातावरणाबद्दल सांगत होती.आणि माझ्या छातीत चमकत चाललं होतं.आणि डोळ्यासमोर हातात हिरव्यागार बांगड्या, तळहातावर मेहंदी काढलेली, आणि नटलेली सुनिता वहिनी दिसू लागली.मी फोन कट केला.आणि मला दम लागला.
तिकडे वडिलांनी सुनिता वहिनीला आणि इतर लोकांना कसं सांगितलं माहीत नाही.पण सुनिता वहिनी मात्र हे सगळं नितीन भावजीने केलं आहे.आपली इतकी मोठी फसवणूक झालीय या धक्क्याने गपकन खालीच बसली होती.ती रडत ही नव्हती कुणाशी बोलत ही नव्हती.एकटक ती दातात ओठ पकडून भिंतीकडे बघत बसली होती.सगळं वातावरण काही काळ शांत झालं होतं.सुनिता वहिनीला हा फार मोठा धक्का बसला होता.आणि सगळ्यांच्या तोंडात एकाच नावाने शिव्या सुरू झाल्या होत्या आणि तो ग्रेट माणूस नितीन चंदनशिवे म्हणजे मी होतो.तिच्या माहेरून आलेल्या तिच्या बहिणी तर वाट्टेल तसं बोलत होत्या.सगळेजण सुनिता वहिणीला एकच वाक्य बोलत होते.

” घे तुझा लाडाचा नितीन भावजी.लै बोंबलत होतीस माझा नितीन भावजी माझा नितीन भावजी.कर अजून लाड त्याचा.बस ताटात घेऊन त्यालाच.चांगलं पांग फेडलं बघ तुझ्या भावजीने.” समोर भिंतीच्या फळीवर माझा फोटो मी एका काचेच्या फ्रेममध्ये बनवून ठेवला होता.वहिनी अचानक उठली आणि तिने तो फोटो जोरात फरशीवर आपटला.सगळ्या घरात काचा झाल्या.कुणीच काही बोललं नाही.माझ्या मोबाईलवर सगळ्यांचे फोन यायला सुरुवात झाली.मी उचलायचो कानाला लावायचो आणि शिव्या खायचो.तोंडातून आवाज निघत नव्हता.वहिनीची केलेली मस्करी चांगलीच महाग पडली होती.आनंदाने उत्साहाने भरलेलं घर एका क्षणात शांत झालं.सगळेजण आपल्या आपल्या गावी निघून गेले.आणि सुनिता वहिनी आजारी पडली.चार दिवस घराच्या बाहेर आली नाही.तिने टीव्ही लावला नाही.कुणाशीच बोलली नाही.आईने आणि बहिणीने मला बजावून ठेवलं दोन तीन महिने इकडं यायचं नाव काढू नकोस.तिचा राग शांत झाला की मग ये.पण माझं धाडसच होत नव्हतं.

तीन महिने होऊन गेले.वहिनीने एकही फोन केला नाही.माझं नाव काढलं तरी ती तिथून उठून जायची.तिचा राग शांत होण्याची लक्षणे दिसत नव्हती.आणि त्यातच आमच्या मोठ्या आत्तीच्या मुलीचे म्हणजे सोनालीचं लग्न ठरलं.वहिनीला घाबरून मी लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतला.पण सोनालीने स्वतः फोन करून सांगितलं तू मला लग्नात हवा आहेस काहीही करून ये.मी ही मनात ठरवलं.काय व्हायचं ते होऊ दे.असं वहिनीपासून तोंड लपवून कुठवर राहायचं.एकदाच काय असेल ते होऊ दे राडा.जीव तर घेणार नाही ना ती.आणि मी लग्नाच्या दिवशीच डायरेक्ट मंडपात हजर व्हायचं.लग्न करून तिथूनच माघारी यायचं असा निर्णय घेतला.

तो दिवस उगवला.मनात धाकधूक घेऊनच प्रवास केला.आज आपल्याला तुडवलं जाणार आहे.हे मनाशी पक्के ठरवूनच मी तिकीट काढलं होतं.मी विवाहस्थळी पोहचलो.लांब थांबून अंदाज घेतला.तोंडाला रुमाल बांधला होता.नवरदेवला घोड्यावरून नाचवत मंडपात नेलं जात होतं.मंडप गच्च भरला होता.मी लांबून बघत होतो.आई,बहिणी अण्णा चुलते चुलत्या सगळ्याजणी दिसत होत्या.आणि माझी नजर शोधत होती ती फक्त सुनिता वहिनीला.तिला पाहण्यासाठी.तिच्या जवळ जाऊन लहान लेकरू होऊन हट्ट करण्यासाठी कायम आसुसलेला मी.आज वहिनी नजरेला दिसूच नये असं वाटत होतं.
अक्षता वाटप सुरू झालं.नवरा आणि नवरीला आत कुठेतरी नटवत होते.मी तोंडाला रुमाल बांधूनच दबकत दबकत मंडपाजवळ गेलो.दोन्ही बाजूला खुर्च्या अगदी व्यवस्थित लावल्या होत्या.मंडप गच्च भरला होता.लग्नात सगळे नातेवाईक खूप दिवसांनी एकमेकांना भेटत असतात.सगळेजण गप्पा मारत बसले होते.मी आल्याचं कुणालाच कळलं नव्हतं.मी मागेच अक्षता हातात धरून उभा राहिलो.आणि तेवढ्यात माझी चुलत बहीण स्नेहा अचानक माझ्या जवळून जात असताना तिने मला ओळखलं.तिने माझ्या तोंडावरून रुमाल ओढला आणि जोरात ओरडली.”नितीन दादा आलाय इथं”. माझ्या पोटात कळ आली.पण मी पळून जायचं नाही असं ठरवूनच आलो होतो.आणि स्नेहल पळतच आला आला आला असं करत धावत नवरीच्या रूमकडे गेली.

सुनिता वहिनी सोनाली ला म्हणजे त्या नवरीला तयार करत होती.आणि तिच्याजवळ ही बातमी गेलीच.”एका दमात सात आठ जणींनी तिला सांगितलं “आलाय बघ तुझा नितीन भावजी”वहिनीने सगळं हातातलं काम सोडलं.ती त्याच वेगाने तिथून बाहेर आली.इतर सगळ्या बायका तिच्या मागे.आणि ती माझ्या नजरेसमोर दिसू लागली.दोघी तिघी जणींनी तिला धरायचा प्रयत्न केला.लग्नात भांडू नकोस म्हणून समजावू लागल्या तशी वहिनी जोरात ओरडली “जे कुणी मध्ये येतील त्यांनाही मी सोडणार नाही.”तिचा तो अवतार पाहून सगळेजण उभे राहिले.साउंड सिस्टम बंद झाली.तसं सगळयांना माहीत होतच मी वहिनीसोबत काय केलेल होतं ते.त्यामुळे मला धडा मिळायला हवा अशी तमाम लोकांची इच्छा होतीच.पण यात गंमत अशी झाली होती.जे नवऱ्याकडचे नवे वऱ्हाडी पाहुणे होते त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं.ते माझ्याकडे एखादा पाकीटमार असल्यागत एकटक बघत होते.

दोन्ही बाजूला लोक उभे होते.मी या टोकाला तर वहिनी त्या टोकावरून चालत यायला लागली.तिची एकटक रागीट नजर माझ्यावर रोखलेली.माझ्या पोटात कळ दाटून येत होती.समोरून वहिनी नाही तर तीन महिन्यांपासून आपली न बरी झालेली जखम सांभाळणारी जखमी वाघीणच येत होती.असंच मला वाटत होतं.वहिनी अगदी जवळ आली.मी मान खाली घातली तशी वहिनीने उजव्या हाताने माझ्या डाव्या गालावर खनकन मुस्काडीत वढली.तिच्या हातातल्या दोन तीन बांगड्या फुटून खाली पडल्या.परत दुसऱ्या हाताने दुसऱ्या गालावर वढली.तेव्हाही बांगड्या फुटल्या.मी अडवायला हात वरती केला तर हातावर तिच्या मनगटाचा मोठा दणका बसला.आणि एका बांगडीची काच माझ्या हातात घुसली.एक तुकडा तिच्या मनगटात रुतला.वहिनीने जोरात हाणायला सुरवात केली.मी शांत उभा होतो.समोरचं काहीच दिसत नव्हतं.डोळ्यावर अंधारी यायला लागली.वहिनीने वेग वाढवला.मला वेदना सहन होत नव्हत्या.मी खाली बसलो.कपाळाच्या डाव्या बाजूला वर एक काच घुसली होती.तिथून रक्त येत होतं.

डोळा मोठा झाला होता.ओठांवर काही दणके बसले होते त्यामुळे दात ओठात रुतल्यामुळे तिथून ही रक्त येत होतं.वहिनीचा राग शांत होत नव्हता.मी खाली बसलो.तर बाजूची खुर्ची तिने उचलली आणि मला मारण्यासाठी दोन्ही हाताने वर उचलली.पण काय झालं कुणास ठाऊक.तिने खुर्ची बाजूला जोरात आपटली.तिचे दोन्ही पाय तुटले.अण्णा जवळ आले.”वहिनीला म्हणाले आता बास झालं.जा तू आत.”वहिनी शांत झाली आणि आत निघून गेली.मी तसाच तिथंच बाजूच्या खुर्चीत बसून राहिलो.सगळेजण माझ्याकडे केविलवाणे बघत होते.लग्नात आलेल्या नव्या पोरी बघण्याची लै हौस असायची मला.पण आज मानच वर होत नव्हती.

त्याच अवस्थेत अक्षता टाकल्या.सोनालीचं लग्न झालं.आणि सगळेजण जेवायला गर्दी करू लागले.मला भूक लागली होती.पण कोणत्या तोंडाने जेवायचं हेच कळत नव्हतं.नवऱ्याला आणि नवरीला भेटून जावं म्हणून स्टेजवर गेलो तर सगळेजण बाजूला झाले.सोनालीजवळ जाऊन फक्त दहा सेकंद उभा राहिलो.कुणीच माझ्याशी बोललं नाही.आई आणि अण्णा जवळ आले.आई म्हणाली “जेवण करून घे चल.”मी हुंदके देत मान हलवली.आणि मी पुण्याला चाललोय परत असं म्हणून तिथून काढता पाय घेतला.पावलं टाकत मंडपाच्या बाहेर आलो.
जेवढी मस्करी वहिनीची केली होती त्याहून जास्त अपमान झाला होता.पण वहिनीला एका शब्दाने बोललो नाही.तिने एका खोलीत नेऊन हवं तेवढं मारलं असतं तरी चाललं असतं.असं काहीतरी विचार करून मी रुमालाने तोंड पुसत होतो.जेवणाचा वास घुमत होता.पण जेवायचं तरी कुठं आणि कसं?नकोच म्हटलं बाहेर जाऊन खाऊ अस म्हणून निघायला लागलो. तेवढ्यात सुनिता वहिनीने मागून येऊन मानेवर अजून एक फटका हाणला.मी दात ओठ खात रागाने मागे बघितलं तर सुनिता वहिनीचे दोन्ही डोळे गच्च भरले होते.माझे ही डोळे गच्च भरून आले.

मी हात जोडले आणि म्हणलं “वहिनी माफ कर.माझं चुकलं.अजून काय मारायचं बाकी राहिलं असेल तर सांग घे मार मला.सगळा राग शांत करून टाक”.वहिनी काहीच बोलली नाही.मी तसंच हात जोडून म्हणलं “निघतो वहिनी.एकाच दिवसाची सुट्टी काढून आलो होतो.उशीर होईल जायला गाडी मिळणार नाही” असं म्हणून निरोप घेऊन पाठ तिच्याकडे केली आणि चालायला लागलो तेवढ्यात,माझं मनगट वहिनीने हातात घट्ट धरलं आणि आणि हात जोरात मुरगाळात वहिनी म्हणली.”मला उपाशी ठेवून जाऊच कसं वाटतय भावजी तुम्हाला”.खळकन डोळ्यातून पाणी वाहायला लागलं.मागे फिरलो,आणि वहिनीच्या गळ्यात पडलो.तिच्यापेक्षा माझी उंची वाढली होती.हुंदके बाहेर पडू लागले.वहिनी ही रडू लागली.सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.सुनिता वहिनी पदराने माझं तोंड पुसत होती.आणि एका हाताने मला धरून जिकडे जेवणाची पंगत बसली होती तिकडे घेऊन चालली होती.

आणि मला हळूच म्हणत होती “ओय भावजी ती बघा ती हिरव्या ड्रेसमध्ये जी उभी आहे ना ती लै तुमच्याकडे बघतेय बर का लावा जरा सेटिंग” मला हसू ही येत होतं आणि रडूही येत होतं.आणि आमच्या घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उगवताना दिसत होतं.वहिनीने एका ताटात वाढून घेतलं.दादा एका बाजूला आणि वहिनी एका बाजूला बसली दोघांच्या मध्ये मी.दादाने एक गुलाबजाम माझ्या तोंडात त्याने स्वतःच्या हाताने कोंबला.इकडून वहिनीने भाताचा घास माझ्या ओठाजवळ केला.आणि फोटू वाल्याला आमची सुनिता वहिनी म्हणत होती “अरे ये फोटूवाल्या काढ की आमचा बी एक फोटू”
कॅमेरावाल्याने क्लीक केलं आणि मंडपात गाणं वाजू लागलं. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा होम मिनिस्टर…होम मिनिस्टर..होम मिनिस्टर वहिनी बांदेकर पैठणी घेऊन आला..आणि डोळ्यातली आसवं पुसत पुसत सुनिता वहिनी मला घास भरवू लागली.

हे आयुष्य आहे.या आयुष्यात अशा गमती जमती घडतात.हे सुखाचे आणि दुःखाचे धागे विणत विणत ज्याने त्याने फाटेललं आयुष्य शिवत शिवत जगायचं असतं.नाती ही अशीच निखळ असावीत.पवित्र असावीत.यात गोडवा,माया,ममता सगळं असावं.आयुष्यात सुखाचे फवारे हसऱ्या कारंज्यासारखे कायम सप्तरंगात उडत असावेत आणि दुःखाचे हुंदके उंचीवरून कोसळणाऱ्या धबधब्यासारखे सुंदर असावेत.मोठ्या भावाच्या ओंजळीत धाकट्या भावाने तोंड लपवून दुःखाचे हुंदके रिते करावेत.मोठ्याने धाकट्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मन हलकं करावं.आपल्या प्रत्येकाच्या घरात ही माझ्या वहिनीसारखी एक तरी सुनिता असतेच आणि आहे.आणि माझ्यासारखा दिर म्हणजेच नितीन ही आहे.म्हणूनच म्हणावं दुनिया ही फक्त प्रेमाची,ममतेची,आणि करुणेची आहे.ज्याने त्याने आपली नाती जपावीत.उसवलेली जागा लवकरात लवकर हसत हसत शिवून घ्यावी.आणि ही उसवलेली जागा जर वेळेत शिवता आली नाही तर,नंतर अशा जागा शिवता येणारी सुई आणि दोरा जगात कुठेच मिळणार नाहीत.आनंदात जगा.प्रत्येक घरात आनंद खेळत राहो माझी हीच इच्छा आहे.आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक सुनिता वहिनीला खूप साऱ्या शुभेच्छा.आणि अशा कितीतरी सुनिता आहेत ज्यांच्या घरी पैठणी घेऊन आदेश बांदेकर भावजी जाऊ शकले नाहीत.पण त्या वाट पाहतायत त्या प्रत्येक सुनिता वहिनीपर्यंत ही आमच्या नात्याची कथा मात्र नक्की पोहचती करा.पण पैठणी पेक्षा ही कथा जास्त आनंद देऊन जाईल असा मला विश्वास आहे.

✒️लेखक:-दंगलकार नितीन चंदनशिवे(मु.पो.कवठेमहांकाळ जिल्हा.सांगली.)मो:-7020909521(कथा आवडल्यास आपण लेखकांशी थेट कॉल करून किंवा व्हाट्सअपवर प्रतिक्रिया देऊन बोलू शकता.)

▪️संकलन:-नवनाथ पौळ(केज तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185