आरोग्य विद्यापीठाचे औरंगाबाद विभागीय केंद्र विद्यार्थीभिमुख बनवावे- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

39

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि.17फेब्रुवारी):- आरोग्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उल्लेखनीय योगदान असून या विद्यापीठाच्या औरंगाबाद येथील विभागीय केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास आज होत आहे, ही आनंदाची बाब असून अत्याधुनिक सुविधांसह हे केंद्र विद्यार्थीभिमुख बनवावे. त्यादृष्टीने गतिमानतेने येत्या अठरा महिन्यात केंद्र उभे करावे, असे वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे सांगितले.

आज मुकुंदवाडी येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या औरंगाबाद विभागीय केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास समारंभ तसेच “ध्येय: शून्य टक्के रॅगिंग” अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन व जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ श्री. अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. नितिन करमरकर, माजी कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव श्री. चव्हाण, यांच्यासह विविध शाखांचे अधिष्ठाता इतर संबंधित मान्यवर उपस्थित होते.

श्री. देशमुख यावेळी म्हणाले, आरोग्य विद्यापीठाला 20 वर्ष पुर्ण झाली असून कमी कालावधीत या विद्यापीठाने लक्षवेधी काम केलेले असून येत्या काळात या विद्यापीठाच्या माध्यमातून डॉक्टर, नर्सेस यांना घडवण्यासह वैद्यकीय क्षेत्रातील महत्वपुर्ण संशोधनाच्या संधी विस्तारण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभाग गतिमानतेने पाऊले टाकणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाचे विकेंद्रीकरण करण्यात येणार असून त्याची सुरूवात विभागीय केंद्राच्या माध्यमातून होत आहे.

औरंगाबादसारख्या महत्वाच्या विभागात आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र सुरू होणे हे निश्चितच समाधानाची तसेच समाजासाठी उपयुक्त ठरणारी बाब असल्याचे सांगून श्री. देशमुख यांनी हे विभागीय केंद्र अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपुर्ण करत असतांनाच 21 व्या शतकातील बदलती आव्हाने लक्षात घेऊन याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी संशोधन, प्रशिक्षण कार्यक्रम, विविध चर्चासत्र, कार्यशाळा यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्याच्या दृष्टीने नियोजन ठेवावे. हे विभागीय केंद्र विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनासह इतर शैक्षणिक कारकिर्दीतील प्रशासकीय बाबींची पुर्तता करण्याच्या दृष्टीने मध्यवर्ती केंद्र ठरेल या पद्धतीने येथे कार्यपद्धती अवलंबवावी तसेच विद्यार्थ्यांसाठी नाशिक प्रमाणे समुपदेशन केंद्र सुविधा विभागीय केंद्रात सुरू करावी.

तसेच विविध डिजीटल माध्यमे, ई-ग्रंथालय, अभ्यासिका या सुविधांसह माजी विद्यार्थ्यांच्या ज्ञान व अनुभवाचे आदान-प्रदान करण्याच्या दृष्टीने संवाद उपक्रम सुरू करावा जेणे करून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे केंद्र उपयुक्त ठरेल यादृष्टीने सर्वांनी लक्ष देऊन विद्यार्थीभिमुख केंद्र बनवण्याच्या दृष्टीने गतिमानतेने काम करावे, असे श्री. देशमुख यावेळी म्हणाले. तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयांचे ऑडिट नियमितपणे होणे हे गरजेचे असून त्यादृष्टीने ऑडिटर नेमुन विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालय व रूग्णालये नियमित ऑडिट करत असल्याची खातरजमा वेळोवेळी करणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे सांगून श्री. देशमुख म्हणाले, वैद्यकीय शिक्षण विभागाने आता कात टाकण्यास सुरूवात केली असून शासनाने नुकतीच विद्यापीठाला स्वत:चे अध्यापण आणि प्रशिक्षण रूग्णालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

येत्या तीन-चार वर्षात विद्यापीठाचे वैद्यकीय शिक्षण संकुल नाशिकमध्ये तयार करण्यात येणार आहे. याठिकाणी सर्व वैद्यकीय शाखांचे शिक्षण, संशोधन, उपचार, या सर्व सुविधा भविष्याची गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या असतील. महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन, वैद्यकीय शिक्षण पर्यटनास व्यापक संधी असून त्यादृष्टीनेही काम सुरू करण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख यावेळी म्हणाले.
यावेळी विद्यापीठातर्फे विविध वैद्यकीय शाखांमध्ये उत्कृष्ट योगदान दिलेल्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या सर्वांचे अभिनंदन करत श्री. देशमुख यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले.डॉ. करमरकर यांनी विद्यापीठाच्या वाटचालीबद्दल तसेच विभागीय केंद्राच्या उभारणीबद्दल कार्यक्रमाच्या प्रास्तविकात माहिती दिली.

जीवन गौरव पुरस्कार प्राप्त डॉ. इंद्रप्रकाश गजभिये यांचे दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी दु:खद निधन झालेले असल्याने त्यांच्या अर्धांगिनी डॉ. मिनाक्षी गजभिये या त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आल्या मात्र त्यांनी त्यांच्या हातात असलेल्या डॉ. गजभिये यांच्या अस्थिंना सन्मानित करण्याची विनंती मंत्री महोदयांना केली. श्री. देशमुख यांनी आपल्या मनोगतात आवर्जून या भावनिक क्षणाची नोंद घेत डॉ. मिनाक्षी गजभिये यांची यापुढे काळजी घेणे ही शासनाची, वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी असून ती यथोचित पार पाडणे हिच डॉ. गजभिये यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगितले.

यावेळी डॉ. अरूण महाले, डॉ. इंद्रजित गजभिये, डॉ. शरद कोकाटे, डॉ. ज्ञानेश्वर मुखेडकर, वैद्य रमेश गांगल, डॉ. अरूण भस्मे, डॉ. विलास वांगिकर या मान्यवरांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच “ध्येय: शून्य टक्के रॅगिंग” अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.