स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सलग १२व्या वर्षी अध्यक्षपदी अरुण जोशी

32

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.17फेब्रुवारी):-हिंदुमहासभेचे ज्येष्ठ नेते तसेच अनेक नामांकित शैक्षणिक संकुलांच्या माध्यमातून ज्ञानप्रचाराचे कार्य सर्वदूर नेणारे नागपूरस्थित सावरकरभक्त अरुण शामराव जोशी यांची सलग १२ व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळेच प्रदीर्घकाळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचाराला राष्ट्रकार्यात परावर्तित करण्याच्या परंपरेचा आणि कार्याचा त्यांना मिळालेला सन्मान म्हणावा लागेल. हा कार्यकाळ विक्रमी असला तरी स्वातंत्र्यवीरांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे हे भाग्य असल्याची त्यांची यामागची विनम्र भावना आहे.

गेल्या ११ वर्षांत अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अरुण जोशी त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यात प्रामुख्याने भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान असलेला वाडा दत्तक घेणे, लडाख येथे सावरकरांच्या नावे गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करणे, `हे मृत्युंजय’ हे दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान पर्वावर आधारित नाटकाचे प्रयोग राज्य आणि देशभर करून स्वातंत्र्यवीरांच्या विचारांचा देशभर प्रचार करणे, जेएनयू तसेच नाशिक कारागृहांत या प्रयोगाचे आयोजन केले गेले. हिमालय पर्वतरांगेत हिमाचल प्रदेशात असलेल्या बातल जवळच्या हिमशिखराला स्वातंत्र्यवीर सावरकर हिमशिखर असे नाव देण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.

अंदमानच्या पोर्ट ब्लेअर येथील विमानतळाला स्वातंत्र्यवीर सावरकर असे नाव असून त्या ठिकाणी त्यांचा पुतळा नसल्याचे निदर्शनास येताच स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धपुतळ्याची त्या विमानतळावर प्रतिष्ठापना करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित थ्री डी वॉल मॅपिंग तंत्रावरील ध्वनी-प्रकाशाचा `शो’ हा भारतातील एकमेव असावा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उर्दू गझलांचा शोध लागल्यानंतर त्यांच्यावर आधारित `हम ही हमारे वाली हैं’ ही संगीतमय ध्वनीफित निर्माण करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निवडक ग्रंथसंपदा स्मारकाच्या वतीने 12 भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्रेलमध्येदेखील रुपांतरित करण्यात आली आहे. `सावरकर श्री’ ही शरीरसौष्ठव स्पर्धा देखील नियमित आयोजित केली जाते. त्याशिवाय मुष्टियुद्ध, धनुर्विद्या, नेमबाजी आदींमध्ये स्मारकाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर अव्वल कामगिरी केली असून अनेक पदकं प्राप्त केली आहेत.अरूण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार आणि कृतिशीलता जनमानसात वेगवेगळ्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आणि व्यापकतेने रुजविण्यात येत आहे. त्यातून देशकार्यालादेखील बळकटी मिळत आहे.