अन्ननलिका अर्धवट विकसित झालेल्या बाळाला मिळाले जीवनदान

27

🔹अंबाजोगाईच्या लाड हॉस्पिटलमध्ये झाली पहिल्यांदाच दुर्मिळ शस्त्रक्रिया

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

अंबाजोगाई(दि.26फेब्रुवारी):-अन्ननलिका अर्धवट विकसित झालेल्या चार दिवस वय असलेल्या बाळाला अखेर जीवनदान मिळाले. अंबाजोगाईच्या लाड हॉस्पिटल मध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली.बाळ वाचल्यामुळे माता-पित्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

सौ.सोनाली सुनिल जाधव (रा.नांदुरघाट ता.केज,जि.बीड) या महिलेवर सिझेरियन प्रकारची शस्त्रक्रिया ही अंबाजोगाईतील डॉ.नयना सिरसाट यांचे कलावती हॉस्पिटल मध्ये करण्यात आली. मुलगा झाला.परंतु, अचानक बाळाला श्‍वास घ्यायला त्रास होऊ लागला.म्हणून बाळ तात्काळ लाड हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्यानंतर बाळाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर असे समजले की,बाळाची अन्ननलिका ही अर्धवट विकसित झालेली आहे.

त्यानंतर डॉ.विजय लाड यांनी त्यांचे मित्र आणि लहान मुलांचे शल्यचिकित्सक डॉ.देवदास सामला (अदिलाबाद,आंध्रप्रदेश) यांच्याशी तात्काळ चर्चा केली.लवकरात लवकर बाळाची ही अवघड अशी शस्त्रक्रिया करण्याचे ठरले अशा प्रकारची दुर्मिळ शस्त्रक्रिया ही अंबाजोगाई शहरातील वैद्यकीय क्षेत्रात पहिल्यांदाच लाड हॉस्पिटल मध्ये होणार होती.यासाठी डॉ.देवदास सामला यांनी ही शस्त्रक्रिया यशस्विरीत्या पूर्ण केली.त्यानंतरची काळजी व पूर्ण उपचार (ट्रीटमेंट) डॉ.विजय लाड यांनी केले.शस्त्रक्रियेनंतर बाळाला 48 तास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

पाचव्या दिवशी बाळाने उपचाराला योग्य असा प्रतिसाद दिला.बाळाला दूध सुरू करण्यात आले. बाळाला दूध पचू लागले.हळूहळू दूध वाढवण्यात आले. बाळ आता सुखरूप आहे.त्याला नुकतीच रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ.नितीन पोतदार, डॉ.हनुमंत चाफेकर या सगळ्यांचे विशेष सहाय्य लाभले.या तज्ज्ञांच्या प्रयत्नांनी चार दिवसांच्या बाळाचा अखेर जीव वाचला.अशी माहिती लाड हॉस्पिटलचे संचालक डॉ.विजय लाड यांनी दिली आहे.

🔹बाळाचे प्राण वाचविण्यात यश आले
===================
वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असताना सतत नवनवीन आव्हानांचा सामना करावा लागतो.रूग्णांचे प्राण वाचविणे याला आमचे नेहमीच प्राधान्य राहीले आहे.नुकतीच वैद्यकीय क्षेत्रात काहीशी अवघड व दुर्मीळ समजली जाणारी शस्त्रक्रिया आणि ती देखिल चार दिवसांच्या बाळावर करून बाळाचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश आले आहे.बाळ सुखरूप आहे तर माता-पिता हे आनंदी आहेत.हेच आमचे खरे समाधान आहे.

🔸-डाॅ.विजय लाड (लाड हॉस्पिटल, अंबाजोगाई.)

*लेकराला मिळाला नवा जन्म*
====================
पत्नीचे सिझेरियन झाले.याची काळजी होती.त्यातच मुलगा झाला.याचा आनंद ही होता.परंतू,अचानक बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.परंतू, डाॅ.विजय लाड,डॉ.देवदास सामला यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत साक्षात एखाद्या देवदूताप्रमाणे आमच्या लेकरास नवे जीवनदान दिले. त्याबद्दल डॉक्टरांचे आभार.

*-सुनिल शिवाजी जाधव (बाळाचे पिता,रा.नांदुरघाट ता.केज,जि.बीड.)*