ज्येष्ठ श्रीगुरूदेव सेवक गुलाबरावजी खवसे – व्यक्ती आणि कार्य

36

[अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विशेष लेख]

मला आजही आठवतो तो दिवस , सन १९९२ च्या ४ आॕगष्टला चंद्रपूरात पहिल्यांदा साई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ग्रामगीता जीवन विकास परीक्षा घेण्याच्या दृष्टीने मी एक सभा बोलावली होती. तेव्हा त्या संस्थेत मी नुकताच प्राचार्य म्हणून रूजू झालो होतो. संस्थेचे अध्यक्ष प्रा. विठ्ठल येरगुडे आणि संस्थेचा संपूर्ण स्टाफ सभेला हजर होता. गुरूकुंज मधून आलेले केशवदास रामटेके गुरूजी यांचे पत्र सभेत मी वाचून दाखविले . आणि असा विचार एका सदस्यांनी मांडला की, ह्या परीक्षेचा आपल्या व्यवसाय प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काय फायदा ?. ह्यावर चांगली साधकबाधक चर्चा झाली आणि असा निर्णय घेण्यात आला की, ” अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम द्वारा संचालित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा ही विद्यार्थी जीवनास योग्य वळण देणारी आणि जीवनमुल्ये रूजविणारी , संस्कार देणारी परीक्षा आहे. त्यामुळे सा-या विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेला बसावे तसेच सर्व निदेशकांनी सुध्दा परीक्षेला बसावे “. त्यानुसार १९९२ च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ह्या केंद्रावर यशस्वीपणे परीक्षा पार पडली.

परीक्षेनंंतर उत्तरपत्रिका रामटेके गुरूजीकडे पाठविल्यात. तर रामटेके गुरूजीनीं इतर केंद्राच्या उत्तरपत्रिका माझेकडे पाठवून पेपर तपासणी चे काम सोपवले . विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पाच गटाच्या एकूण ८९६ उत्तरपत्रिका होत्या. सतत ४ दिवस तपासून त्याचा निकाल गुरूजीकडे पाठवून दिला.नवीन परीक्षा केंद्र सुरू करण्यात पुढाकार घेतला. ॲड. राजेंद्र जेनेकर यांच्या माध्यमातून कढोली बुज. येथे परीक्षेचे नविन ग्रामीण केंंद्र सुरू केले. त्या परिसरातील चार्ली, निर्ली, बाबापूर , धिडशी , कोलगाव येथील शेतकरी कढोली येथेपरीक्षा देण्यासाठी बैलगाड्या , रेंगी द्वारा आनंदाने येत असत, हा आमचेसाठी आनंददायी अनुभव होता.पुढे – पुढे हे काम वाढत जाऊन त्या परीक्षा विभागाचा मी केव्हा एक अंगच झालो , हे मला कळलेच नाही. दि. ११ आॕगष्ट २००८ रोजी कळमेश्वर (जि.नागपूर ) येथे माझी बदली झाल्याने तिथे मी रूजू झालो.

१९९२ ते २००८ ह्या १६ वर्षाच्या कालावधीत विविध शाळेत चंद्रपूर जिल्ह्यात माझा संपर्क वाढला होताच . नॕशनल फाऊंडेशन आॕफ इकालाजी ॲण्ड एन्व्हायर्नमेंट , अंधश्रध्दा निर्मुलन समिती , ग्रामीण जीवन विकास प्रतिष्ठान आदी सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थाशी माझा संबंध होताच. ह्या संस्थानी प्रचारार्थ मदत केली. पाया मजबूत झाला होता. गावागावात असलेले श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या शाखा , गुरूकुंज मध्ये दरवर्षी होणारा सर्वसंत स्मृती दिन , गावागावात होणारे पुण्यतिथी उत्सव ह्यामुळे ग्रामगीता परीक्षा विभागाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यास विशेष गती देऊ शकलो .रामटेके गुरूजी सतत संपर्कात असे. तसेच काही ज्येष्ठ प्रचारक मंडळीने जमेल तसे सहयोग दिले होते, पण त्यांचेसाठी हे काम नवे होते .

🔹कळमेश्वर माझेसाठी – नवे कार्यस्थळ..
कळमेश्वर (जि. नागपूर ) येथे दि.११-०८-२००८ रोजी औ. प्र. संस्थेत नोकरीच्या निमित्ताने रूजू झालो. येथे आल्यावर परीक्षा विभागाचे आणि श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या शाखा स्थापनेचे कार्य वाढावे ह्या हेतूने माझ्यापरीने प्रयत्न सुरू केले. कळमेश्वर शहर ते एमआयडीसी मार्गावर सुंदरसे परमहंस संत लहानुजी महाराज देवस्थान आहे. नाथे परिवारांनी ते बांधलेले आहे. तेथे रोज सांयकाळी सामुदायिक प्रार्थना सुरू होत होती .कळसाईत गुरूजी, देशमुख परिवार आणि नाथे परिवार हे दैनंदिन सामुदायिक प्रार्थनेला हजर राहत असे . ट्रस्ट चे अध्यक्ष सुनिलभाऊ नाथे, त्यांचे सहयोगी साहेबराव गोहणे, पुरूषोत्तम चौधरी , सौ. ललिता भागवत , विजय नागपूरे आदी मंडळीची तेथे ओळख झाली. त्यांना परीक्षा विभागाचा उद्देश सांगितला . ह्या सर्वांनीच परीक्षा विभागाच्या विस्तार कार्यास त्यांनी बरीच मदत केली. कळमेश्वर भागात लोकसहभागातून वाढलेले हे काम पाहण्यासाठी एकदा प्रत्यक्ष भेटीला गुलाबरावजी खवसे कळमेश्वरात आले. ते गुरूकुंजातील परीक्षा विभागात सचिव म्हणून रूजू झाले होते. ते सेवानिवृत्त कर्मचारी असूनही ते मला बरेच उत्साही दिसले. त्यांचे मी एका शाळेत ग्रामगीता जीवन विकास परीक्षा संदर्भात भाषण ठेवले होते.

त्या भाषणात त्यांनी परीक्षा विभागाचा उद्देश सांगितला . त्यांनी त्याप्रसंगी दिलेले विचार सर्वांनाच पटले. कळमेश्वर भेटीत झालेल्या चर्चेत परीक्षा विभागाच्या विस्तार कार्यावर बरेच चिंतन मंथन झाले. शाळा तेथे ग्रामगीता परीक्षा हे अभियान राबविण्याचे ठरले. ह्या तालुक्यात हे काम कसे करावे यासंबंधीत त्यावेळी मी काही सूचनाही केल्यात. त्यावेळी चर्चेच्या ओघात त्यांंनी मला विचारले की , ” तुम्ही पहिल्या पाच परीक्षा पाच वर्षापूर्वीच उत्तीर्ण केल्या असताना शेवटच्या ग्रामगीताचार्य पदवी परीक्षेला का बसत नाही ?.येत्या सत्रात तुम्ही अवश्य ग्रामगीताचार्य पदवी परीक्षेला बसावे , तुमच्यासारखे कार्य करणारे लोक ह्या कार्यात खरे तर पुढे आले पाहिजेत ” .
सन १९९५ ते २००० ह्या काळात झालेल्या ग्रामगीता जीवन विकास परीक्षेला बसून मी पहिले पाच गट उत्तीर्ण झालो होतोच . पण ” ग्रामगीताचार्य ” ह्या पदवी परीक्षेच्या पात्रतेचे आपण सध्यातरी नाही , आणि आपले कार्यही त्या दर्जाचे नाही ,असे मला सतत वाटत असल्याने , ही परीक्षा देण्याची माझी इच्छा मुळीच नव्हती . कळमेश्वर भेटीत खवसे महाराज जोर देत म्हणाले , ” सर्वच जण ह्या पदवी परीक्षेपासून दूर राहिले तर ह्या विभागाचे काम कसे बरे चालेल ?. आपल्या सारख्यांनी राष्ट्रसंताच्या साहित्याचा सखोल अभ्यास करून त्या साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढे आले पाहिजे , आपण पुढाकार घ्यावा .आणि इतरांनाही प्रोत्साहन द्यावे , अशी माझी इच्छा आहे.

” त्यांच्या आग्रही प्रोत्साहनामुळे मी २००८-२००९ ह्या सत्रात ग्रामगीताचार्य पदवी परीक्षेला बसलो आणि गुणानुक्रमे राज्यात प्रथम आलो. गुरूकुंज आश्रमात वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज जन्मशताब्दी वर्षात झालेल्या कार्यक्रमात आद्यग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर , सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ , आचार्य हरिभाऊ वेरूळकर , राष्ट्रसंत साहित्याचे थोर अभ्यासक प्रा. रघुनाथदादा कडवे , केशवदास रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामगीताचार्य ही सन्माननीय पदवी स्विकारली . हा प्रसंग माझेसाठी महत्त्वाचा आणि आनंददायी ठरला. पण ह्या पदवीमुळे माझेवर विशेष जबाबदारी वाढली. हे शिवधनुष्य पेलवितांना बरेच कठीण जात आहे , हेही लक्षात आले. आपली नोकरी उत्तमरित्या करून मिळालेल्या वेळेत ग्रामगीता चिंतन, मनन त्यासोबतच परीक्षा विभागाचेही काम होईलतसे मी हळुवारपणे वाढवित गेलो.

🔸कळमेश्वरात राष्ट्रसंत व्याख्यानमाला आणि खवसेजीचे अनोखे कीर्तन

वं. राष्ट्रसंत जन्मशताब्दी वर्ष असल्याने २००८-२००९ ह्या वर्षात स्थानिक श्रीगुरूदेव सेवा मंडळ आणि ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्या संयुक्त विद्यमाने कळमेश्वरातील परमहंस संत लहानुजी महाराज देवस्थान सभागृहात ” राष्ट्रसंत जन्मशताब्दी व्याख्यानमाला २००८-२००९ ” आयोजित केली गेली. त्यातील विषय पुढीलप्रमाणे होते. राष्ट्रसंताचा राष्ट्रधर्म – सुरेंद्र बुराडे , राष्ट्रसंताच्या साहित्यात आदिवासी दर्शन – डाॕ. विनायक तुमराम , राष्ट्रसंत साहित्यात आलेला श्रमविषयक विचार – श्रीपाद भालचंद्र जोशी आणि डाॕ. इंद्रजित ओरके , राष्ट्रसंताच्या साहित्यात आलेला बौध्दधम्म विचार – आचार्य चौधरी . विदर्भातील नामांकित वक्ते ह्या व्याख्यानमालेसाठी लाभल्याने ही व्याख्यानमाला कळमेश्वर शहरात गाजली. सावनेर ,काटोल पर्यंत ही वार्ता पोहोचली. यामुळे आमच्या चांगल्या ओळख्या ह्या परिसरात वाढल्या. पुढे एका कार्यक्रमात संत सावता माळी देवस्थान ची भक्त मंडळी बसस्थानकाजवळ मला भेटली. त्यांनी “संत सावता महाराज ‘ विषयावर कीर्तन करणारे कीर्तनकार हवे आहे , अशी विचारणा केली असता खवसे महाराजांचे कीर्तन संत सावता महाराज मंदिरात आयोजित केले गेले. कीर्तनाचा फार मोठा अनुभव नसताना सुध्दा विषयानुरूप प्रभावी मांडणी करत ग्रामगीतेची जोड देत चरित्रात्मक कीर्तन त्यांनी सादर केले , ते आयोजकांना आवडले .पुढे स्थानिक सदस्यांच्या सहकार्याने लहानुजी महाराज मंदिरात बालमेळावा , चित्रकला स्पर्धा , दोन नवकवी संमेलने आदी उपक्रम राबविले . तालुक्याच्या शाळांत दौरे – भेटी दिल्यामुळे ग्रामगीता जीवन विकास परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. ती पाच हजाराच्या घरात गेली. ह्या सगळ्या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे अनेकांचा चांगला अभ्यास होऊ लागला आणि त्यातून पुढे येथील साहेबराव गोहणे , सौ. ललिता भागवत, सुलभा वेरूळकर आदी मंडळी ग्रामगीताचार्य पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले हे विशेष.

🔹चंद्रपूर जिल्ह्यात संघटनात्मक कार्यास गती…..

सन २०१२ मध्ये चंद्रपूरात पुन्हा माझी बदली झाल्यामुळे परत चंद्रपूर जिल्ह्यात कामास लागलो. येथे पुर्वीच परीक्षा विभागाचे संघटनात्मक काम उभे केले असल्याने परीक्षा विभागाच्या कार्यास गती आली . यापुर्वी आम्ही १९९२ ते २००८ पर्यंत केलेली मंडळाच्या कार्यकर्त्यांची आम्ही केलेली समन्वयवादी बांधणी कामास आली. परीक्षा विभागाचे जिल्हास्तरीय मेळावे घेण्याचे निश्चित झाले. त्याकरिता स्वतंत्र निधीची तरतुद खवसे महाराजांनी केली. स्थानिक आयोजन समितीवर जास्त आर्थिक ताण येऊ नये ही दूरदृष्टी त्यांची होती . आमच्या नियोजनाप्रमाणे वरोरा( २०११) , चंद्रपूर (२०१२) , गडचांदूर(२०१३) , राजुरा( २०१४) चिमूर(२०१४) , सिंदेवाही( २०१५) ,मुल (२०१६) , घुग्घुस(२०१७) , भद्रावती (२०१८) इत्यादी ठिकाणी झालेली परीक्षा विभागाचे जिल्हास्तरीय मेळावे यशस्वी झाले. जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे सहकार्य मिळाले. त्यांनी काढलेल्या आदेशामुळे जिल्ह्यातील शाळाशाळापर्यंत पोहचण्यास मोठी मदत झाली. चंद्रपूर जिल्ह्यात लक्ष्मणराव गमे, प्रा. अशोक चरडे, प्रेमलाल पारधी , प्रा. श्रावण बानासुरे, विठ्ठल सावरकर , प्रेमदास मेंढूलकर , प्रा. रूपलाल कावळे, विशाल गांवडे ,कालिदास चेडे , ॲड. राजेंद्र जेनेकर , सुरेश चौधरी ,कार्तिक चरडे, हुसेन किन्नाके , विलास चौधरी , शरद सहारे , मोहनदास मेश्राम , सुखदेव चौथाले , बावणे महाराज , रंगनाथ पवार , विजय चिताडे तसेच सर्व तालुका प्रमुख व संघटकांनी जिल्हास्तरीय समितीसह समन्वय साधत परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंनी वाढली. महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हा क्रमांक एकवर आला. यामागे आम्हा सर्व मंडळीची प्रचंड मेहनत होती , हे विशेष . याकामाकरीता जिल्हा परिषद शिक्षण विभाग ,डाॕ. अशोक जीवतोडे , जगन्नाथ गांवडे , माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे , मुल नगराध्यक्ष सौ. रत्नमाला भोयर आदींचे सकारात्मक सहकार्य मिळाले.

🔸नव्या सत्तावीस ग्रामगीताचार्य मंडळीना मार्गदर्शन

चंद्रपूर , गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात माझी नोकरीच्या निमित्ताने झालेली बदली , भ्रमंती त्यातून वाढलेले संघटनात्मक कार्य आणि विविध ठिकाणाचे परीक्षा केंद्र माझेकडे असल्याने अनेकांना ग्रामगीताचार्य पदवी परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या मंडळींना सातत्याने मार्गदर्शन देत गेलो. गुलाबराव खवसे महाराजांकडे कुणीही चंद्रपूर जिल्ह्यातून भेटायला गेले की , पदवी परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी माझेकडे ते पाठवित असत. त्यातील अनेक जण केवळ दहावा , बारावी तर काही पदवीधर असायचे . तेव्हा त्यांचेकडून शोधप्रबंध लिहून काढण्याचे कठीण काम मला करवून घ्यावे लागे. पाठांतर , प्रश्नोत्तरे समजावून देणे , त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, शंका समाधान करणे , त्यांच्या संपर्कात राहून त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातून प्रा. रूपलाल कावळे वरोरा , शरद सहारे मुल , विठ्ठल सावरकर चिमूर , मारोती सातपुते राजुरा , विठ्ठल डाखरे गडचांदूर , गोपाल शिरपुरकर घुग्घुस , प्रेमलाल पारधी घुग्घुस ,कु. कोमल नवले मुर्सा , दादाजी नंदनवार चंद्रपूर , प्रा.नामदेव मोरे घुग्घुस , नागपूर जिल्ह्यातून सौ. ललिता भागवत कळमेश्वर , साहेब गोहणे , सौ. सुलभा वेरूळकर तर वणी भागातील सौ. विजया दहेकर , दिलीप डाखरे , सौ. स्वप्ना पावडे , गंगारेड्डी बोडखे , नारायण मांडवकर , सौ. निर्मला पारखी, जंगलू पारखी , अल्का साळवे , विद्या जुनघरी, लक्ष्मण ढेंगळे , गजानन भगत , बैजनाथ खडसे , दिपक नवले तसेच गडचिरोली जिल्ह्यातून तुषार निकुरे आदी आजवर एकुण सत्तावीस नवीन ग्रामगीताचार्य मंडळीना मार्गदर्शन करण्याचे कार्य माझ्याकडून झाले आहे . यामागे उद्देश हाच होता की, परीक्षा विभागाचे योग्य प्रकारे काम चालावे आणि प्रचार कार्यास उत्तरोत्तर गती यावी .ह्या सा-या पदवी प्राप्त मंडळीनी सुध्दा आपल्या कामाची व्याप्ती लक्षात घेता आपआपल्या भागात काम वाढविले आहे आणि शाळाशाळापर्यंत ते पोहचले आहे ,हे चित्र परीक्षा विभागासाठी आणि माझेसाठी सुखावणारे आहे.

🔹खवसे महाराजांचा राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य प्रचार पुरस्काराने गौरव

एकंदरीत गुलाबराव खवसे ते खवसे महाराज हा त्यांचा जीवनप्रवास निश्चितच खडतर आहे. परीक्षा विभागाच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले जिल्हास्तरीय मेळावे, राज्य मेळावे, वार्षिक हिशोब सभा , केलेली आर्थिक तरतूद , अभ्यासक्रमात केलेले परिस्थितीनुसार बदल, परीक्षा विभागाची केलेली बांधणी लक्षात घेता ते या विभागासाठी तन मन धनाने सेवा देणारे सच्चे सेवक ठरले आहे. प्रचार सेवा उत्तमरित्या घडावी आणि ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे आपल्या हातून कृषी सेवाही घडावी ,ह्या हेतूने गुरूदेवनगरात त्यांनी बांधलेले घर आणि विकत घेतलेली शेती हे सच्च्या प्रचारकाचे लक्षण आहे . त्यांच्या सातत्यपूर्ण ह्या कार्याची दखल राज्यव्यापी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेने घेतली आणि त्यांना घुग्घुस (जि.चंद्रपूर ) येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात उदघाटक माजी खास. नरेशबाबू पुगलिया यांच्या हस्ते रोख पुरस्कार व मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

🔸कडक स्वभावगुण आणि कार्यकर्त्यां मंडळीचे दुखरेपण

स्वभावाने खवसे महाराज खूप कडक आहे, ते अजिबात ऐकून घेत नाही,अशी नेहमीची तक्रार आमच्या जिल्ह्यातील कार्यकर्ता मंडळी माझेकडे करीत असतात .हे खरे असले तरी प्रशासनाचा भाग म्हणून, परीक्षा विभागात शिस्त यावी म्हणून ते सातत्याने प्रयत्नरत असतात, हेही तेवढे खरे . प्रसंगी ते कठोर बोलत असले तरी त्यामागे त्यांची कार्याबाबतची तळमळ मला दिसून येते.माझेही अनेकदा त्यांचेसोबत तात्त्विक वाद झाले पण तात्पुरते ठरले. संघटनात्मक काम करतांना कमीजास्त होत असते , हे आता प्रत्येकांनी समजून घेतले पाहिजे , तेव्हाच श्रीगुरूदेवाचा मानवतावादी विचार सर्वदूर पोहचवू शकू. ह्या कार्यात आपण राहिल्याने राष्ट्रसंताच्या तत्त्वविचारांचा अभ्यास होऊन आपले जीवन सुंदर होण्यासाठी मदतच होईल, असा विचार आम्ही सांगत असतो. गेल्या पाच दहा वर्षात गोंदिया ,यवतमाळ ,भंडारा यासारख्या विविध जिल्ह्यातील नवीन मंडळी मोठ्या प्रमाणात या विभागाशी जुळत जबाबदारी स्विकारते आहे, हे चित्र सुखावह असले तरी गडचिरोली , पुणे , मराठवाडा प्रांतात यासारख्या भागात हे काम कमालीचे मागे पडले आहे . विभागाचे मुख्य शिलेदार श्री. गुलाबराव खवसे महाराज परीक्षा विभागाच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नरत आहे. त्यांच्यासोबत आम्ही सदैव आहोतच. त्यांना अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आणि परीक्षा विभागाच्या उन्नतीसाठी आमच्याकडून अनंत शुभकामना …….

✒️लेखक:-बंडोपंत बोढेकर(गडचिरोली)मोबा. 9975321682
इमेल – brb.rastra@gmail.com