राजे, तुमच्या स्वराज्यात हे काय चाललय ?

32

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधार)मो:-9561551006

महाराष्ट्रात राजकारणातल्या लोकांची व त्यांच्या चेले-चमच्यांची प्रवृत्ती हलकट होताना दिसत आहे. काही अपवाद वगळता बहूतेकांना पक्षीय काविळ झाली आहे. प्रत्येक गोष्टीकडे पाहताना राजकीय नजरेतून पाहिले जात आहे. प्रत्येक बाबतीत राजकारण आणले जात आहे. राजकारणात मोकळी, व्यापक व निखळ संस्कृती असणारा महाराष्ट्र आज द्वेषाच्या राजकारणाने लडबडलेला दिसतो आहे. सगळ्या ठिकाणी सुडबुध्दी, द्वेष आणि तिरस्काराच्या भावना पेरल्या जात आहेत. द्वेष, तिरस्कार आणि सुडबुध्दीतूनच भूमिका घेतल्या जात आहेत. महिला अत्याचाराबाबतही हेच सुरू आहे. एखाद्या महिलेवर अत्याचार झाला, बलात्कार झाला तर ती कुठल्या पक्षाची आहे ? कुठल्या जातीचे आहे ? ते पाहून निषेध किंवा विरोध केला जातो. सोय पाहूनच प्रतिक्रीया दिल्या जातात. सोईनुसार त्या सकारात्मक द्यायच्या किंवा नकारात्मक द्यायच्या हे ठरवले जाते.

अत्याचारिता स्वपक्षिय असेल, स्वजातीय असेल तर लगेच विरोधाच्या व निषेधाच्या पिचका-या सुरू होतात. त्याच्याही पलिकडे जावून अत्याचार करणारे हरामखोर स्वपक्षिय, स्वजातीय असतील तर स्त्री दाक्षिण्य, आदर, सन्मान वगैरे प्रकार नसतो. नराधम ज्या जातीचा आहे, ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचे, त्या जातीचे लोक तोंडात गुळणी धरून बसतात. त्यांचा कंठ एकाएकी बंद होतो. त्यांना चिड येत नाही, त्यांना राग येत नाही. जणू सगळे मिळून भाडखाऊ आणि नपुंसक होतात. काही बोलले तर सावध बोलतात. जे विरोधी पक्षात असतात, जे इतर जातीय असतात त्यांचा कंठरव मात्र जोरजोरात सुरू असतो. यातून एकच जाणवते ते म्हणजे या लोकांना अन्याय-अत्याचाराशी काही देणे-घेणे नसते. अत्याचार करणारा स्वपक्षिय, स्वजातीय असला की त्याने अत्याचार करण्याचे लायसन काढल्यासारखे बोलतात. तो स्वपक्षिय व स्वजातीय नसेल तर हे मुके-बहिरे लगेच पेटून उठतात. आरोप-प्रत्यारोप चालू करतात. खरेतर हे चित्र लाज वाटणारे आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात असल्या विकृती वाढाव्यात हे लाजिरवाणे आहे.

सगळ्यात वाईट म्हणजे इथले राज्यकर्तेच असल्या रोगट आणि कुचकट प्रवृत्तीचे निपजत असतील तर ते क्लेषकारक आहे. जिजाऊंच्या, तुकोबांच्या आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात हे काय चाललय ? असा प्रश्न पडतो आणि मन अस्वस्थ होवून जाते. आज छत्रपती शिवाजीराजे असते तर खजिल झाले असते. त्यांना आपल्याच लोकांची लाज वाटली असती. राजे संतापले असते. त्यांनी या हरामखोरांचा चौरंग केला असता. त्यांनी या हलकटांचा कडेलोट केला असता. संतापलेल्या राजांनी यांना तोफेच्या तोंडी दिले असते.

राज्यकर्ते परस्परांशी भांडताना शाळेतल्या पोरांसारखे भांडतात. आमदार-मंत्रीही एकमेकांशी भांडताना असेच भांडतात. एकमेकांशी आरे-तुरे बोलतात. एकमेकांच्या अंगावर धावून जातात. युपी-बिहारची संस्कृती इथे कशी काय रुजते आहे ? पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात हे खुलेआम चालू आहे. अशा स्थितीत सारा समाज चिडीचुप आहे. तो याच बांडगुळांचा उदोउदो करतो आहे. नेत्यांची पायताणं विष्ठेने माखलेली असली तरीही तो डोक्यावर घेतो आहे. नेत्यांच्या पायाला राड लागली असेल तरीही त्यांचे तळवे चाटतो आहे. समाजातला सज्जन शांत आहे. समाजातले विचारवंत बिळात लपले आहेत. साहित्यिकांच्या विवेकाला आणि जाणिवेला सोरायसिस झाल्याने ते ही व्यक्त होत नाहीत. त्यांच्या साहित्यिक प्रसव कळा बंद झाल्या आहेत. त्यांच्या लेखण्या चालत नाहीत. त्यांची वाचा उघडत नाही.

त्यांच्या बुध्दीला लाचारीचा आणि भयाचा ज्वर चढला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवणा-या माध्यमांचे तर सरळ सरळ कुंटनखाने झाले आहेत. “पैसा फेको और तमाशा देखो ।” अशी त्यांची स्थिती आहे. ज्याची सत्ता असते, जो पैसे फेकतो त्याच सत्ताधिशांच्या आणि भांडवलदारांच्या बाजल्यावर माध्यम नावाच्या गणिका जात आहेत. त्यांच्या सोबत इष्काचे खेळ रंगवत आहेत. आता सत्य हा त्यांचा धर्म उरला नाही. सत्य सांगणे, सत्य मांडणे हे त्यांचे काम राहिले नाही. सत्याचा अपलाप करणे, ते मोडून तोडून असत्याला सत्य म्हणून पेश करणे आणि आपल्या मालकाची सेवा करणे हेच या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवणा-या माध्यमाचे काम झाले आहे. राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात झुंडशाही वाढताना दिसत आहे. झुंडशाहीची प्रवृत्ती एकट्या भाजपातच नव्हे तर सगळ्याच पक्षात दिसून येते आहे. लायकी नसलेले नेते आणि त्यांचे तेवढेच नालायक अंधभक्त प्रत्येक ठिकाणी वाढताना दिसत आहेत. राजकारणातले सर्वपक्षीय भिष्म म्हणवणारे जेष्ठ लोक या बाबत चकार शब्द काढत नाहीत. त्यांची बोलती बंद आहे. ते सत्तेच्या भाकरीसाठी मिंधे झालेत. त्यांच्या सत्ता त्यांना शाश्वत टिकतील असे वाटते आहे. दुर्योधनाच्या सभेतल्या भिष्मासारखे ते ही सत्वहिन झालेत की काय ? असा प्रश्न या निमित्ताने पडतो आहे.

देशात पुरोगामी म्हणून गणला गेलेला महाराष्ट्र, व्यापक व उदार संस्कृती जपणारा महाराष्ट्र, शिवरायांचा विचार जपणारा महाराष्ट्र राजकीय द्वेषाने इतका कसा काय पछाडू शकतो ? हा प्रश्न संवेदनशील मनाला सतावत राहतो. पुजा चव्हाण प्रकरण असेल, त्या आधीचे धनंजय मुंडे प्रकरण असेल या सगळ्या बाबी राजकीय चौकटीतून पाहिल्या जात आहेत. एकमेकांची जिरवण्यासाठी राजकीय षढयंत्र रचली जात आहेत. या गटारघाणीत मात्र ज्यांच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो त्या महिलांची पुन्हा पुन्हा धिंड काढली जाते. त्यांना न्याय मिळवून द्यायची कुणाचीही मानसिकता नसते. अत्याचार करणारा त्यांच्यावर अत्याचार करतोच पण स्वत:च्या हलकट राजकारणासाठी ही मंडळी पुन्हा पुन्हा त्यांच्यावर अत्याचार करत राहतात. सत्तेतले लोक या नालायकांना पाठीशी घालतात तर विरोधक त्यांची राजकीय मलई काढू पाहतात. ज्यांच्यावर अन्याय झालाय, ज्यांच्यावर अत्याचार झालाय त्याच्याशी सोयरसुतक कुणाला आहे ? फक्त आलीय संधी तर घाल घाव अशीच मानसिकता आहे. सोशल माध्यमात सर्व पक्षीय भक्तांडांची मांदियाळी महिलांबाबत कशीही व्यक्त होते. खालच्या थराला जावून त्यांना अवमानित करते.

महिलांना आदर द्यायची, त्यांचा सन्मान करण्याची संस्कृती विसरलेले हे सैतान आज मोठ्या प्रमाणात फोफावलेले आहेत. विरोधी पक्षाची महिला असली की तिच्यावर कसेही तुटून पडत आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी असतील, अमृता फडणवीस असतील, समाजकारणात व्यवस्थेला प्रश्न करणा-या तृप्ती देसाई असतील किंवा आघाडी सरकारला प्रश्न विचारणा-या चित्रा वाघ असतील या सर्व महिलांच्या बाबतीत सर्व पक्षिय पिलावळ पक्षिय चौकटीतून हवे तसे विष ओकत असते. या महिला आपल्या पक्षिय भूमिकेच्या विरोधातल्या असतील तर त्यांच्यावर कशीही चिखलफेक केली जाते. सोशल माध्यमात त्यांचे कसलेही फोटो एडीट करून सोडले जातात. या लोकांच्या विकृत उचापती पाहून हे स्त्रीच्याच पोटाला आलेत का ? त्यांना आई-बहिण आहे का ? त्यांच्या आई-बहिणीबाबत हे असे वागतील का, असल्या पोस्ट करतील का ? असे प्रश्न पडतात.

भाजपवाल्यांच्या आयटीसेलने या देशात ही विषवल्ली पेरली आहे. लोकांचे चारित्र्यहनन करणे, त्यांच्या चारित्र्याची विटंबना करणे, त्यांच्यावर कमरेखाली जावून आरोप करणे असला हलकट प्रकार त्यांनी पेरला. आज त्याला उत्तर म्हणून सगळेच त्या थराला जात आहेत. सर्व पक्षातल्या लोकांना विवेकाचे वावडे आहे. भाजपावाल्यांनी पेरलेले विष तरारून उगवते आहे. त्यामुळे समाज नासल्यासारखा झाला आहे. भाजपवाल्यांच्याही वाट्याला तेच येते आहे. त्यांनी निर्माण केलेला भस्मासुर त्यांच्यावरच उलटला आहे. विरोधी पक्षातल्या, विरोधी विचारांच्या महिलांच्या चारित्र्याचे धिंडवडे काढणा-या भाजपाच्या आयटीसेलवाल्या हरामखोरांना उत्तर देताना इतर पक्षाचे कार्यकर्तेही तेच करू लागलेत. त्याचाच परिणाम म्हणून अमृता फडणवीस, स्मृती इराणी, चित्रा वाघ यांनाही या प्रकारच्या बदनामीला सामोरं जावं लागतं आहे. हा सगळा प्रकार विकृत व लाजिरवाणा आहे. शत्रूच्या स्त्रीयांचा गौरव करणारा, त्यांचा मान-सन्मान राखणारा शिवरायांचा महाराष्ट्र हाच आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने पडतो.