राष्ट्रसंरक्षणाचे अविभाज्य अंग

28

(विश्व नागरीक संरक्षण दिवस)

सन १९९० मध्ये आयसीडीओ – इंटरनॅशनल सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशनच्या जनरल असेंब्लीच्या निर्णयाद्वारे तयार करण्यात आलेला जागतिक नागरिक संरक्षण दिवस १ मार्च रोजी दरवर्षी साजरा केला जातो. १९७२ मध्ये आंतर-सरकारी संघटना – आयसीडीओतर्फे संविधानाची अंमलबजावणी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. विविध राष्ट्रीय कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातात. जसे – संभाषण, परिषद, रेडिओ आणि दूरदर्शन वादविवाद इत्यादी. नागरी संरक्षणाची संरचना आणि सध्या उपलब्ध असलेल्या तांत्रिक साधन व उपकरणाच्या विकासाचा आढावा यानिमित्ताने घेतला जातो.

देशातील नागरिकांचे जीवित, मालमत्ता तसेच नागरी संस्था, उद्योगधंदे, वसाहती इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभागाने व शासकीय साहाय्याने उभारलेली व्यवस्था म्हणजे नागरी संरक्षणव्यवस्था होय. शत्रूच्या सैनिकी, घातपाती, प्रचारकी वा तत्सम स्वरूपाच्या आक्रमक आणि विध्वंसक कृत्यांनी देशातील नागरी जीवनाची हानी होऊ शकते. त्याचप्रमाणे राष्ट्रांतर्गत घातपाती कारवायांमुळेही देशातील कायदा व सुव्यवस्था बिघडून नागरी जीवन विस्कळित होऊ शकते. म्हणून आधुनिक काळात नागरी संरक्षण हे राष्ट्राच्या एकूण संरक्षणनीतीचाच एक अविभाज्य असा घटक मानला जातो. नागरी संरक्षणाची पारंपरिक कल्पना ही केवळ प्रतिबंधक उपायांपुरतीच मर्यादित असल्याचे दिसते तर शत्रूचे आक्रमण आणि विध्वंसक कारवाया यांपासून नागरिकांना झळ पोचू नये या हेतूने प्रतिकारात्मक व प्रतिबंधक अशी दुहेरी व्यवस्था आधुनिक काळात केली जाते.

गावाला तटबंदी घालणे हा नागरी संरक्षणाचा एक जुना प्रकार होय. आधुनिक काळात आक्रमणाचे, युद्धाचे आणि देशांतर्गत संघर्षाचे स्वरूप आमूलाग्र बदल्यामुळे नागरी संरक्षणाच्या कल्पनेतही बदल झालेला आहे. विशेषतः विसाव्या शतकातील दोन महायुद्धांच्या काळात नागरी वस्त्या व नागरी लोकसंख्या यांच्यापर्यंत युद्धक्षेत्र येऊन भिडल्यामुळे व बाँबहल्ल्यासारख्या मार्गांनी नागरी जीविताची आणि वित्ताची फार मोठी हानी झाल्यामुले नागरी संरक्षण ही एक गुंतागुंतीची व विस्तृत यंत्रणा बनलेली आहे. देशाच्या व राज्याच्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अर्धसैनिक दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल कार्यरत असतात. नागरी संरक्षण करण्याची व्यवस्था पुढीलप्रमाणे केली जाते – (१) यात शत्रूच्या संभाव्य हल्ल्याची पूर्वसूचना नागरिकांना देता येते. यासाठी विमान निरीक्षक दले उपयोगी पडतात.

रडारच्या साह्याने शत्रुविमानांचा वेध घेऊन बाँबहल्ल्याची पूर्वसूचना भोंगा वाजवून देता येते. प्रकाशबंदी केल्याने शत्रुविमानांना शहरे ओळखणे कठीण जाते. ठिकठिकाणी सुरक्षित भूमिगत आश्रयस्थाने आणि खंदक बांधून नागरिक त्यांचा आसरा घेऊ शकतात. या कामी इमारतींचा देखील विशिष्ट प्रकारे उपयोग करता येतो. तसेच महत्त्वाच्या शहरांतून इतर ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करता येते, तर विषारी वायूपासून संरक्षणासाठी वायुमुखवटे वापरता येतात. रुंद रस्ते व मोकळ्या जागा ठेवूनही आगीच्या फैलावास पायबंद घालता येतो. इमारतीभोवती वाळूची पोती रचून ठेवल्यास स्फोटाच्या आघातापासून इमारतींना संरक्षण मिळते. प्रत्येक नागरिकाने प्रतिबंधक उपायांचे ज्ञान मिळविणे आणि त्याप्रमाणे वागणे आवश्यक असते. त्यासंबंधीची माहिती सरकारी कचेऱ्यांतून किंवा सरकारी जिल्हा तालुका कचेऱ्यांत व होमगार्ड संघटनांकडून मिळते.

(२) यामध्ये हल्ल्यात जखमी झालेल्यांना वैद्यकीय उपचार करणे, उद्‌ध्वस्त इमारतीत सापडलेल्या व्यक्तींची सुटका करणे आणि त्यांच्या अन्नपाणीनिवाऱ्याची व्यवस्था करणे इ. उपाय येतात. स्फोट न झालेले बाँब हुडकून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी लष्करी तंत्रज्ञांचे साहाय्य घेतले जाते. (३) यामध्ये नागरिकांची घरे उद्‌ध्वस्त झाली असल्यास त्यांना राहण्यासाठी जागा व इतर जीवनोपयोगी साधने पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते.या दिनानिमित्ताने दरवर्षी एक थीम ठरविलेली असते. उदा. ‘मुलांची सुरक्षा, आपली जबाबदारी!’ आपणही सुरक्षेच्या दृष्टीने जागरूकता वाढवुया. स्वतःचे संरक्षण, बचावात्मक उपाय करूया आणि संकटकाळी स्वयंसेवक बनून नागरिकत्व बजावुया!
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जागतिक नागरी संरक्षण दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!

✒️संकलन व लेखन:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी,
(हिंदी व मराठी साहित्यिक)मु. पो. ता. जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.