पुसद व परिसरात कडक संचारबंदी -3 मार्चपासून नवीन निर्देश जारी

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

यवतमाळ(दि.2मार्च):-पुसद येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपविभागीय अधिकारी यांनी पुसद शहर तसेच काकडदाती ग्रामपंचायत क्षेत्र, श्रीरामपूर ग्रा.पं. क्षेत्र, धनकेशवर ग्रा.पं.क्षेत्र, शेंबाळपिंपरी ग्रा.पं.क्षेत्र, बेलोरा ग्रा.पं.क्षेत्र, जांबबाजार ग्रा.पं.क्षेत्र, वरूड ग्रा.पं.क्षेत्र या ठिकाणी अटी व शर्तीच्या अधीन राहून संचारबंदी लागू करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(1)(2)(3) मधील तरतुदीनुसार कोविड -19 चा प्रादुर्भाव होवू नये याकरीता, सादर केलेल्या प्रस्तावानुसार दिनांक 3 मार्च 2021 ते दिनांक 8 मार्च 2021 च्या मध्यरात्री पावेतो खालील नियम लागू करण्यात येत आहेत.

पुसद शहर व शहरालगत असलेल्या वर दर्शविण्यात आलेल्या ग्रामीण भागातील सर्व प्रकारची जीवनाश्यक दुकाने, किराणा, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत सुरु राहतील. पुसद शहर व शहरालगत वर दर्शविण्यात आलेल्या क्षेत्रामधील सर्व प्रकारची बिगर जीवनाश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील.

नमुद क्षेत्रातील सर्व प्रकारची आठवडी बाजार बंद राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (महाविद्यालय, शाळा) येथील शैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे ई. कामाकरीता परवानगी अनुज्ञेय राहील. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरु राहील आणि वाहतूकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही. स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारी, तहसिलदार यांनी सार्वजनिक वाहतुक अंतर्गत बसस्टेशन या ठिकाणी येणारे – जाणारे प्रवासी यांना वाहतुकीबाबत परवानगी अनुज्ञेय करण्यात यावी.

सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक अतिआवश्यक कामासाठी संबंधीत क्षेत्रातील पोलीस निरिक्षक यांची पुर्व परवानगी घेणे अनुज्ञेय आहे. ठोक भाजीमंडई सकाळी 4 ते 6 या कालावधीत सुरु राहील. परंतु सदर भाजी मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. पुसद तालुक्यातील संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे, मनोरंजन विद्यालय व इतर संबंधीत ठिकाणे तसेच सर्व सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसम्मेलन हे या कालावधीत बंद राहतील.

सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये नागरीकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय अत्यावश्यक सर्व सेवा तसेच पशुवैद्यकीय दवाखाने व औषधालये सुरु राहतील.
दुध विक्री आणि संकलन सकाळी 7 ते सकाळी 9 व सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत करता येईल. चिकन, मटन, मच्छी मार्केट विक्री बंद राहील. घरगुती गॅसची फक्त घरपोच सेवा सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत देण्यात यावी व त्याकरीता गॅस वितरक कर्मचारी यांना गणवेश व ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य असेल. कृषी केंद्र खत विक्री, बि-बियाणे विक्री सकाळी 7 ते दुपारी 12 या कालावधीत सुरु राहील. पुसद तालुक्यातील सर्व बँकेचे कर्मचारी त्यांचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज बँकेत उपस्थित राहून करू शकतील. अंत्यविधी व लग्न समारंभाकरीता 25 व्यक्तींना (वधू व वरासह) तहसिलदार/मुख्याधिकारी यांचेकडून परवानगी अनुज्ञेय राहील. टु-व्हिलर बंद राहील. थ्री व्हीलर, फोर व्हीलर चालक व इतर 2 व्यक्तीस फक्त वैद्यकीय अतिआवश्यक सेवेसाठी सुरु राहील. दारू दुकाने बंद राहील.

वरील आदेश पुसद शहर, काकडदाती ग्रामपंचायत क्षेत्र, धनकेश्वर ग्रा.प.क्षेत्र, शेंबाळपिंपरी ग्रा.प.क्षेत्र, बेलोरा ग्रा.प.क्षेत्र, जांब बाजार ग्रा.प.क्षेत्र, व वरूड ग्रा.प.क्षेत्र या क्षेत्राकरीता लागू राहील. वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियमांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.