रक्षी माणसा रे रक्षी : वन्य जीव पशू पक्षी

26

(आंतरराष्ट्रीय वन्यजीव दिन.)

आपल्या आसपासच्या सृष्टीतील प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष यांची विविधता खरोखरीच थक्क करणारी आहे. अगदी आजही त्यांच्या नव्या जाती सापडत आहेत! आपण निसर्गाची सतत कत्तल करून त्यांचा जगण्याचा अधिकारच हिरावून घेत आलो आहोत. पण खरी गोष्ट अशी आहे की ते जगले तरच आपण जगू ! ते तर आपलेच सख्खे-सोयरे आहेत. संत-महात्म्यांचे भाकित सत्यात उतरत आहेत. सन १९७० च्या सुमाराला, वन्यप्राणी म्हणजे कोणते रे भाऊ? असा प्रश्न विचारण्याची वेळ येणार असे वाटू लागले होते. कारण वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते. त्यांपैकी बरेचसे कायमचे नष्ट होतात की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत जागृती करण्यासाठी युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने वन्यजीवन दिवस ठरविला. नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्य सृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा – सीआयटीइएस. दि.३ मार्च १९७३ रोजी तब्बल १८० देशांनी मान्य केला. म्हणून या दिवसाला महत्व प्राप्त झाले आहे.

खेड्यातील शिकारीच नव्हे तर चांगली नामांकित व्यक्ती किंवा लोकांना पटवून सांगू शकणारे जननायकच असले क्रूरकर्म करीत असतात, हे अनेकदा सिद्धही झाले आहे. ते रात्री पाणवठ्याजवळ आपला बंदुकीचा नेम धरून बसतात. पाणी पिण्यासाठी आलेल्या सावजाला निर्दयपणे टिपतात. त्यामुळे जंगलातील सांबर, बारशिंगा, नीलगाय, हरीण, ससा, रानटी डुक्कर, आदी वनवैभव बेमुर्वत संपवतात. यासाठी मचान व दडून बसण्याची लपण आदी तयार करण्यासाठी वृक्ष, फांद्या वेली आदींचीही नाहक कत्तल केली जाते. आज त्यामुळेच वनेच्या वने ओस पडली आहेत. रात्रीचा हा असा धुमाकूळ घालून माणूस वन्यजीवांचा नायनाट करू लागला. तर भर दिवसाही तो पाणवठ्यावर दाणे पसरवून ठेवतो व स्वतः जवळच तयार केलेल्या खोपटात लखलखत्या उन्हात दबा धरून बसतो. मस्त मजेने किलबिलाट व विहार करित आलेला पक्ष्यांचा अख्खा थवाच्या थवा पाण्यासाठी उतरतो. पाणी पिऊन तृप्त होतो न होतो, तोच दाण्यांचा पडलेला सडा त्याला दाणे टिपण्यास मोहित करून बाध्य करतो. …आणि याच संधीची प्रतिक्षा डोळ्यात तेल घालून करीत असलेला भामटा व संधीसाधू शिकारी त्या अख्ख्या थव्यावर आपले जाळे फेकतो.

संपूर्ण थव्यातील ३० ते ४० पक्षी जीवानिशी एका दिवसात खल्लास केले जातात. असा माणूस किती कनवाळू नाही का? सृष्टीला वाचवायचं कि देशोधडीला लावायचं हे कोणाच्या हातात आहे? याचा पारमार्थिक विचार माणूस प्राणी नाहीतर काय डुक्कर करणारेय!विघ्नसंतोषी मानवाच्या या असल्याच उपद्रवामुळे जंगलातील शाकाहारी जीवांचे कळपच्या कळप, झुंडीच्या झुंडी नामशेष झालेत. त्याचाच हा विपरित परिणाम मानवाच्या पदरी पडू लागला आहे. हिंस्त्र प्राण्यांना वनातल्या वनात शिकार मिळणे दुरापास्त झाले.

म्हणून आता त्यांनी आपला मोर्चा मानवी वस्त्यांकडे वळविला आहे, असे म्हणणे काही गैर नाही. वन्य हिंस्त्र जीव वाघ, सिंह, लांडगा, अस्वल, कोल्हा आदी जीवविशेष यांनी माणसाविरुद्ध जंग पुकारलेले दिसत आहे. पाळीव प्राणीपक्षी गायी, बैल, म्हशी, रेडे, शेळ्या, मेंढ्या, बदक, कोंबड्या, कबुतरे आदींना आपल्या डोळ्यांदेखत फरफटत नेत आहेत. एवढ्यावरच त्यांची तहानभूक न भागल्याने, मानवाच्या बदल्याची आग न शमल्याने ते मानवावरही हल्ला करण्यास मागेपुढे पाहात नाहीत. मानवाच्या नरडीचा घटा-घटा घोट डोळे मिचकावून मिचकावून घेत आहेत. याची भल्या माणसाला आतातरी उपरती व्हावयास नको का?जंगली पशुपक्ष्यांची शिकार तसेच त्यांचा आणि दुर्मिळ वनस्पतींचा चोरटा व्यापार तेथील स्थानिकांच्या मदतीशिवाय शक्यच होणार नाही. त्यामुळे असे न करण्याबाबत सर्वप्रथम त्यांना समजावले पाहिजे. निसर्गाच्या साखळीतला प्रत्येक घटक – किड्यांपासून तर सिंहापर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टीत महत्त्वाचा आहे, ही बाब सर्वांनी ध्यानात घेतली पाहिजे.
!! पुरोगामी संदेश परिवाराच्या आंतरराष्ट्रीय वन्यप्राणी दिवसानिमित्त समस्त मानव जातीला मनस्वी शुभेच्छा !!

✒️लेखक:-श्री.एन.कृष्णकुमार गुरुजी.
मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली (७७७५०४१०८६).
email – nikodekrishnakumar@gmail.com