अग्निपरीक्षेचे वेळापत्रक : माणुसकीच्या असीम सौहार्दाच्या सौंदर्यपौर्णिमेची कविता

33

कवी यशवंत मनोहर यांच्या अग्निपरीक्षेचे वेळापत्रक हा कवितासंग्रह नुकताच वाचण्यात आला.अतिशय गाभिर्यपूर्ण विचाराचे तत्वज्ञान विशद करणारा कवितासंग्रह वाचकाला उपलब्ध करून दिल्याबद्दल कवी यशवंत मनोहर यांना मनःपूर्वक सदिच्छा देतो.मराठी कवितेच्या प्रांतात साठोत्तरी आंबेडकरी कवितेने नवी क्रांतीगर्भ पेरणी केली.साठोत्तरी काळातील एक विद्रोही कवी म्हणून कवी यशवंत मनोहर यांनी आपली नाममुद्रा मराठी कवितेवर कोरली आहे.उत्थानगुंफा या कवितासंग्रहापासून प्रवाहित झालेल्या काव्यझऱ्याचे रूपांतर महाकाव्यसागरात झाले आहे असे वाटते.जीवनातील खडतर प्रवासात हा कवी कधीही थांबला नाही.तर नव्या नव्या प्रतिमासृष्टीच्या आविष्कार घडवत जागतिक क्षितीजावर मानवमुक्तीची ऊर्जा आपल्या कवितेतून प्रज्वलीत करत आहे.या कवीच्या मनातील क्रियान्वयनतेला अधिकच धुमारे फुटत आहेत.विश्वाच्या बदलत्या सर्वंकष परिघाचा परामर्श घेऊन चिंतनात्मक भावआवेग शब्दांच्या माध्यमातून प्रगट करत आहेत.

यशवंत मनोहरांची कविता एका साच्यात बांधता येत नाही.ती जागतिक मानवाला आपले बांधव मानते .त्याच्या कवितेतून अरियतत्वाची सम्यक क्रांतीजाणिवा सदोदीत प्रज्वलीत होत असते.कवितेच्या असीम नभशिखरावर हा कवी माणुसकिचे विद्यापीठ तयार करत आहे.या कवितासंग्रहाचे नाव वाचताच वाचकाला आपल्या जीवनातील दिलेल्या परिक्षेचे स्मरण होते. जगात घडणाऱ्या घटनांचा मर्मंदृष्टीकोनातून अग्निपरीक्षेचे वेळापत्रक या कवितासंग्रहात मनोविश्लेषणात्मक भावगर्भ अत्यंत क्रांतीदर्शी रेखाटला आहे.दागो काळे आपल्या समीक्षेत म्हणतात की,”माणसाचे कुठल्याही पातळीवर अवमूल्यन सहन न करणारी ही कविता मानवी सौहार्दाचा अवकाश अधिकाअधिक उज्ज्वल करीत जाते.बंधुता आणि भगिनीता या दोन पंखानी उडत ती मानवी सावल्याचा वाटा प्रशस्त करते .समतोलाचे व सलोख्याचे सौंदर्यविश्व उभे करते.विज्ञाननिष्ठेच्या हाताने माणसामधील परस्परोपकारक नात्याचे सर्जन करणारी ही कविता माणसालाच सर्व शक्यतांची उगमभूमी मानते.”ही वैचारिक तत्वप्रणाली कवितेतील सत्वसत्यचा परिपोष व्यक्त करणारी आहे.

कवी उपोदघात मध्ये मी अशीच कविता का लिहतो ? यामध्ये म्हणतात की,”मी कविता लिहतो म्हणजे माणसांच्या डोक्यात विज्ञानमयता रचणारा हातच लिहतो आणि निरंतर बदलू शकणाऱ्या माणसांचे प्रीअँम्बलच लिहतो.”ते पुढे लिहितात की,”माझी कविता जीवनाच्या सलोख्याचे,समतोलाचे आणि सौंदर्याचे राजकारण करते .हे ‘प्रति’भा तसे ते पर्यायी राजकारणच असते .हे देववादाच्या विषमतेच्या संयुक्त राजकारणाला नष्ट करू इच्छिणारेच राजकारण असते.”कवीची ही भूमिका नक्कीच नव्या राजकारणाच्या पडसादाचे पडघम आहे.बदलत्या समाजकारणाचा व राजकारणाचा आकृतीबंध विशिष्ट शैलितून विस्तृत झाला आहे. मानवीय मेंदूत सेंद्रिय पोषतत्वे देणारी ही कविता नव्या जगाच्या ग्लोबल क्रांतीसि्ध्दात मांडण्याचा प्रयत्न करते.आजच्या संक्रमण अवस्थेच्या काळात कवी व माणूस बोलायला हवा.जर आपण बोलणे बंद केले तर अइहवादी विकृत थवे भारताला नष्ट करतील त्यासाठी आपण सातत्याने बोलले पाहिजे ,लिहले पाहिजे.शेवटचा थेंब आहे शरीरात तोपर्यंत उजेडाची मशाल तेवत ठेवली पाहिजे.हा आशावाद या कवितेतून रेखांखित झाला आहे.माणसाला गुलाम करणाऱ्या राजकिय शक्तीचा बिमोड करण्यासाठी नवे राजकिय समीकरणे तयार करून समान विचाराचा अजेंडा निर्मावावा ही तळमळ कवीची आहे.

अग्निपरीक्षेचे वेळापत्रक या कवितासंग्रहात मनोविश्लेषणात्मक भावगर्भ चिंतनाचे उजेडमय आशयबंध दिसून येतो.या कवितासंग्रहात एकूण ५५ कविता असून त्या ३२० पानात सामावल्या आहेत.कविने सुरवातीलाच सुप्रसिध्द कवी हर्मिस्ट हेमिग्वे यांचे क्रांतीशब्दवचन दिले आहे.”A man can be destroyed but not defeated”हा विचार वाचकाला उर्जास्वल देणारा आहे.हा कवितासंग्रह पेरिसार रामास्वामी नायकर,कवी केशवसूत,व कवी बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या व्यवस्थांतराच्या ध्यासाला कृतज्ञतापूर्वक म्हणून समर्पित केला आहे.यावरून कवीची दृष्टी विश्वकल्याणकारी विचारवंताच्या भूमिकेशी तादात्म पावणारी आहे.पेरियार रामास्वामी नायकर यांना तामिळनाडू मध्ये ब्राम्हणी विचाराविरूध्द जबरदस्त आंदोलन छेडून माणसाच्या नवसृजनत्वाची लढाई लढले.कवी केशवसुताने मराठी कवितेला नव्या क्रांतीजाणिवाचे शब्दशिल्प दिले आहे.बर्टोल्ट ब्रेख्त यांनी अंधकारमय पेरणाऱ्या अमाणूषतेवर प्रचंड प्रहार केला आहे.नाझी पक्ष व हुकूमशाह हिटलर यांच्या निषेध केला आहे.दोन महायुध्द् त्यांनी अनुभवले त्याचा परिणाम त्यांनी कविता व नाटक याद्वारे मांडला होता.

यशवंत मनोहर यांची कविता चक्रिवादळाच्या आवर्तात न सापडता नवे मूल्यमंथन करायला निघाली आहे.प्रस्थापित मुजोर व्यवस्थेला समाप्त करण्यासाठी अग्नीज्वालेचे शब्दक्षेपणास्त्र घेऊन रणांगणावर उतरली आहे.अग्निपरिक्षेचे वेळापत्रक या कवितासंग्रहातून इहवाद,मानवतावाद,बंधुभाव,स्वातंत्र्य,समता,समाजवाद,बुध्द्वाद,संविधानमूल्य,स्त्रीवाद,वास्तववाद,यांचा बदलत्या वर्तमानानुसार वेध घेतला आहे.जाडजूड असलेला हा कवितासंग्रह मानवतेच्या पंखाना नवी उभारी देत आहे.ते “वैश्विक उजेडाची परीक्षा”या कवितेत लिहितात की,

शत्रू अंधार गुंडाळत होते
माझ्याभोवती तेव्हाही
मी उजेडाच्याच ऊर्जेची कविता
लिहली…
……………..
मी प्रयोजन बदलीन प्रवाहाचे
मी अंथरीन प्रवाहापुढे
नवनवे उषःकाल..
……………
मी अशा सर्वच क्रौर्याची मुळे शोधतो आहे
जाळण्यासाठी
आणि माझे खुळेपण
क्रौर्यमुक्त मानवाच्या जीवनाचे संविधान तयार करीत आहे…

कवीने या कवितेततून राजकारण्यांच्या कार्यशीलतेचा सामोपचार घेतला आहे.नव्या राजकिय व्यवस्थेतील अफूमय वातावरणाचा वास्तविक भयावस्था रेखांखित केला आहे.

कोविड-१९ या महामारीने जग अस्वस्थ आहे.सूक्ष्मजीवांच्या भयकंप प्रसाराने मानवाला जीवनातून उठवले आहे.सूक्ष्मजीवापेक्षा राजकिय मनविषाणू साऱ्या भारताला काळोखाच्या मुलखात ढकलत आहे.कविची संवेदना कामगार,श्रमीक,यांच्या यातनानी गैहवरून येत आहे.माणसाने माणसालाच रोगी केले आहे.सहिष्णूता लपून बसली आहे घराघरात भीतीने आणि बेबंद असहिष्णूता हुडरते आहे मुलखात विनाहरकत.कवी “संदर्भासहित आमची मरणझड ” या कवितेत लिहितात की,

सुरू झाला आहे मोसम
अग्निपरीक्षेचा
वादळाचा लगाम येत नाही
हातात माणसाच्या अजून …१२४
……………….
टाळेबंदीच्या अनियाेजनामुळे माणसाचे खच्चीकरण केले यांची दाहकता या कवितेत मांडताना ते म्हणतात की,

अतिसृक्ष्म रोगाणुंचा
सुरू झाला हाहाकार
संसर्गाचा
आणि कोसळत राहिला
गरीबांच्या बेसावधपणावर
बेदरकार….१२७
…………….
हे अगणित जगण्याचे युध्द
या रस्त्यानी प्रथमच
बघितले असावे…१४३
……………
जगातील सर्व दैवीशक्ती
विषाणूंनी पार दिवाळखोरीत
काढल्या….
………
धर्मनिरपेक्ष जागतिक विद्यापीठांमधूनच
उगवते सौहार्दाची सौंदर्यपौर्णिमा
उगवते माणुसकी असीम
परस्परोपकारक…
……………….
निर्वाणीच्या वेळी समुद्राला मागे हटवणारी ही माणसे ..
………….
ही मरणाला थकवणारी
आणि मरण मारीत मारीत
जगणारी जिवट माणसे आजही
मरणझडीतून काढत आहेत वाट..

या कवितेतून टाळेबंदीतील माणसाच्या जीवनाचे ज्वलंत चित्रण रेखाटले आहे.नियोजनाच्या अभावाने माणसाला कसे नागवले गेले.जात धर्म, पंथ यावरून भेदाभेदाची नवी व्यवस्था कशी निर्माण झाली.देशातील मीडीयाने व नेत्यांनी देशालाच युध्दचचक्रात तबदिल केले.पण या कठीण काळातही कामगार व श्रमीक यांनी अमर्त्य फिनिक्सपणात़चा नवा ऊर्जायान घेऊन नवा आत्मविश्वास जगण्याला दिला आहे.ही अत्यंत क्रांतीदर्शी गोष्ट आहे.

कवी हा आकाशातून जमीनीवर उतरत नसतो तर तो जमीनीवर उगवून आकाशापर्यंत पोहचलेला असतो.नवे विज्ञाननिष्ठ विचार घेऊन स्वतःचे आयुष्य प्रकाशन करत असतो.अवैैज्ञानिक खुळचट विचारांना अग्निपरीक्षेत नापास करत नवसंजीवनाचे नवे तत्वज्ञान निर्माण करत असतो.कवी स्वतः जगत असला तरी त्याची निर्मिती विश्व कल्याणासाठीच तयार झाली असते.कवी यशवंत मनोहर यांची कविता मानवी तरल मनाचा भावस्पर्श हेरून जगाला नवी दिशा दाखवत आहेत.ते “कवी उगवतो तेव्हा” या कवितेत म्हणतात की,

राखेतून झेपावलेला
पहिला फिनिक्सही कवीच आहे.
लाचारीत क्रांती शिकवणारी
पहिली युध्दशाळाही
कवीच असतो.. १२
………
कवी मृत्यूला शिकवतो जीवन
शिकवतो सभ्यता
त्याच्या असभ्यतेला
आणि मरणही जाते मरूणच
पेटलेल्या जंगलासारखा
कवी उगवतो तेव्हा…१३

कवीची कविता समाजपरिवर्तनाला नवा आयाम देणारी आहे.कवी कोणत्याही कठीण प्रसंगाला घाबरत नाही तर मोठ्या धिराने प्रसंगावर मात करतो . स्वतःच्या दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा समस्त माणसाच्या उन्नतीचा जयघोष करतो.नवे आंबेडकरी मूल्यक्षितीज निर्माण करतो.कवी म्हणतो की,”मी वीज आहे ढगातील कविच्या काळजावर कविता लिहणारी.”ही ऊर्जायनी ‘असमाधानी प्रयोगशाळा’ या कवितेत व्यक्त करताना लिहितात की,

मी रचतोय संहिता नव्या प्रारंभाची
मुलाखत नवा दिवस. सुरू करण्याऱ्या
उलथापालथीची..
………….
माझ्या कवितेत आहे
मुक्या ओठांसाठी स्वातंत्र्याची नवी आशा
अंधारात बुडत चाललेल्या रस्त्यांसाठी
नक्षत्रांची प्रतिबंध भाषा..
………….
मला विझू देत नाहीत
पुनर्रचनेच्या करूणामय झळा
मी झालो आहे
स्थित्यंतराची असमाधानी प्रयोगशाळा…

वर्तमानाने मानवी शोषण अत्यंत नियोजनबंध केले आहे.आज माणूसच माणसापासून दूर जात आहे.नव्या खासगीकरणाच्या माध्यमातून भारतीय संविधानात्मक ढाचा उद्धवस्त केला जात आहे.देशातील घडणाऱ्या दंगलीमधून नवे दंगलशास्त्र विकसित होत आहे.या दंगलशास्त्राच्या अभ्यासक्रमातून नवे दंगलग्रस्त मेंदू तयार केले जात आहे.धर्माधिष्टीत नव्या विकृत मेंदूचे भक्त दंगलशास्त्राच्या विद्यापीठातून विषमतामूलक कौर्यभरी व्यवस्थेची निर्मिती करत आहेत.मिडियाच्या अनैसर्गिक तंत्राने मानवी मनावर गोबल्सतंत्रचे भूत बसवले जात आहे.शिक्षित समाज धर्मनेत्याच्या गळाला लागल्यामुळे भारतीय एकात्मता धोक्यात आली आहे.या दंगलग्रस्त मेंदूच्या तरूणांना राष्ट्रवादाची नवी नशा पाजल्या जात आहे.म्हणून कवी अस्वस्थ आहे.जिभा कापलेले शब्द तयार झाले असून नवा अध्यात्मतेचा अभ्यासक्रम तयार करणारे रस्ते मानवाचे प्रचंड शोषण करत आहेत .कवी “रस्ते ” या कवितेत लिहितात की,

हिंस्त्र जनावरे
रस्त्यावरून फिरतात
मोकाट
आणि फळा पुसला जावा
तशी माणसे पुसली जातात
रस्त्यावरून..

तर “कलेवरसंस्कृती” या कवितेत वर्तमानाचे आक्रंदन विशद केले आहे.ते लिहितात की,

हे आहे भयदग्धपर्व
जात्यंघ आणि धर्मांध जनावरांनी सुरू केलेले!
या हिंसेच्या मोकाटपणाची रखवाली
करतेय सत्ता..

कवीने नव्या प्रतिमासृष्टीतून अंधभक्तांची बैलोपनिषेद वर्णन अत्यंत बंडखोरवृत्तीने केले आहे.ते “बैलोपनिषेद” या कवितेत लिहितात की,

स्वातंत्र्याचा वारा व्हावे तुम्ही आता
कशासाठी होता सांगकामे ?
बैलोपनिषेद जाळा आता त्यांचे
नव्या व्यवस्थेचे सौंदर्य व्हा…

या कवितासंग्रहातील सर्वंच कविता नवा मूल्यकोश विणणाऱ्या आहेत.भावबंध धांग्याची प्रणयता या कवितेत ठासून भरलेली आहे.जगातील घडणाऱ्या विविध संदर्भाचा आढावा घेत अंर्तमयी विचारांची दिशा प्रतिबिंबित करते.”नदीमाय”ही कविता गावच्या शिवारातून उगम पावणाऱ्या जांब नदीपासून तर अंजिठा लेण्याच्या कुशितील वाघूर नदी व निरंजना नदी यांच्या सोबत नाते सांगते.नदीमायला कोणताही धर्म नाही .जात नाही.तिला माहीत नाही गर्भाशय व देश .नदी ही माणसाच्या उन्नतीचे प्रमाणबंध ओरिजीन असते.नदीमाय या कवितेत कवी म्हणतो की,

नदी अशी अनेक भूमिका करणारी
विश्वातील पहिली सूपर अभिनेत्री आहे…
………….
माझ्या डोळ्यात कोरड्या पात्राचे अश्रू आहेत
आणि तुझ्या डोळ्यात युगाचे अश्रू पेटत आहेत
रक्ताचे…
…………
अश्रू असे पुनरावृत्त होत होते
नदी पात्रातून आटली होती
आणि माझ्या डोळ्यातून मी
हमसून हमसून वाहत होती..

नदीमायचे विविध वैशिष्ट्ये कविने अलगत रेखाटले आहे.
अठ्याहत्तराव्या वर्षीही रडत आहे मन माझे अशी खंत कविने व्यक्त केली आहे.अशीच “अग्नीकाल” ही दिर्घ कविता ५२ कवितेच्या सृजनत्वातून व आशयसुत्रातून बांधली आहे.प्रतिमा व प्रतिकाचा उपयोगातून ज्वलंत व वास्तवदर्शी चलचित्रपट मांडला आहे .ते या कवितेत लिहितात की,

सत्ता निर्माण करते
आवाज न करता बोंबलणाऱ्या मेंढरांचा
आदर्श समाज
मग एखादे महामेंढरू
मेंढरोपनिषद निर्माण करते
आज अशा मेंढरोपनिषदाच्या
दरक्षणी नव्या आवृत्त्या निघत
आहेत..
………..
मुलखा
हा मुद्दा सत्यासाठी
अप्रियता पत्करणाचा आहे
हा मुद्दा कवी होण्याचा नाही मुलखा
हा मुद्दा सौहार्दाच्या संवर्धनाचा आहे.
दिवा विझू नये म्हणून
फँसिस्ट वादळाशी वैर घेण्याचा आहे…
……………
संविधानातील सौंदर्याला आग लावणाऱ्याविरुध्द
आणि तुझ्या अब्रुचे धिंडवडे काढणारांविरुध्द
तू प्रबोधनाचे युध्द प्रखर कर मुलखा…

या कवितेतून कविने नवी आक्रमकता पेरली आहे.बनावट युगाचा नाश करण्यासाठी समग्र मानवाने लढण्याचे आयुधे पाजवले पाहिजे.”सत्तांतरांचे पडघम ” या कवितेत हाथरस येथे घडलेल्या मनीषाच्या अन्यायकारी कृतीवर कवी बेचैन झाला आहे.अमानवीय छळणाऱ्या श्वापदांना जमीनदोस्त करणे नितांत गरजेचे आहे.मनुन्यालयातून न्याय निघतो तो अमानवीय आहे.ते म्हणतात की,

कामसांग्यांच्या आदेशानुसार
सांगकाम्यांनी मनीषाचे
प्रेत नाही जाळले
पेट्रोल ओतून मध्यरात्री
मानवत्वाची अख्खी
कमाईच जाळली सरणात…

आज देशात गुलामीची नवी फौज तयार करून मानवीय साऱ्या सभ्यतेला जाळत सुटली आहे.वर्तमान झाला आहे लुळापांगळा आणि पांगळे विचारताहेत कुठे राहतो हा पांगळेपणा ? गुलामीचे नवे जोखंड घेऊन वावरत असतात मानवीबॉम्ब मनु व्यवस्थेच्या निर्मितीसाठी .”सूर्य उगवण्याचा आवाज ” या कवितेत लिहितात की,

परिवर्तन सौहार्द संविधान
असे सर्व उजेडाचे वागवणारे शब्द
शब्दकोशातून
काढण्याची तयारी होत आहे
भव्य मोहीम…

या कवितासंग्रहात कविने वर्तमानकाळ,भूतकाळ,व भविष्यकाळ यांचे कार्यकारणभाव पळताळून दाखविले आहे.स्त्री समाजाचे उन्नयन करण्यासाठी ही कविता नवी शक्ती प्रदान करते .या माणूसमय स्त्रिया,उगवते माणसाचे उगवणे,कलेवरसंस्कृती,यातून स्त्री जीवनाचे भावचित्र रेखाटले आहे.या जगाला नवे तत्वज्ञान देणारे तथागत गौतम बुध्द् यांच्या मानवतावादी कार्यऊर्जेची प्रेरणा कवीला मिळाली आहे.तथागत गौतम बुध्द् यांनी स्वातंत्र्य ,समता,व बंधूभाव यांचे अथांग सरोवर निर्माण करून मानवाला अत्त-दीप-भवः चा नवा क्रांतीगर्भ दिला आहे.बुध्द !बुध्दा!! बुध्द् : आगीतून बाहेर नेणारा रस्ता या कवितामधून नवे ऊर्जाबल दिले आहे.

अत्तदीपत्व हे माणुसकिचे
त्यांच्या स्वायत्तेतेचे आणि
माणसाच्या अस्तित्वतत्वाचेच नाव आहे बुध्द् !
…………..
मी विज्ञानशील
आणि गुणादुर्गुणांसकट
माणूसच आहे माझ्यासाठी
अंतिम सत्य ,
आणि तोच आहे महानायक
माझ्या निर्मितीचा
तोच आहे माझ्यासाठी
परमसौंदर्य !
……………
असा बुध्द् असतो
रस्त्यावरच्या आगीमध्ये
रस्त्यावरच्या स्वातंत्र्ययुध्दामध्ये
जमिनीला व माणसाला लागलेली आग
विझवणाऱ्या हातामध्ये ..!
…………….
..बंद डोक्यात ,बंद घरात वा बंद डोळ्यात
तू कुठेच नसतो बुध्द् !
तू असतो फक्त
निरंतर उजेड होत राहणाऱ्या
माणसात …

अग्निपरीक्षेचे वेळापत्रक या कवितासंग्रहातील सर्वच कविता अग्नीज्वालेचा आवेग व्यक्त करणाऱ्या आहेत.कवी यशवंत मनोहरांची कविता एखाद्या महाप्रलयासारखी आहे.मुलतत्ववादाच्या शेंडीदारी विचाराला जाळत सुटली आहे.या कवितेची व्याप्ती गंभीर स्वरूपाची आहे.दिर्घ कवितेमुळे वाचकाला अर्थ लावण्यास कठीण जात असले तरी मानवाच्या मनाला अंतर्मुख करणारी ही कविता नव्या विजयाचे सुंदर गाणे गाते.राजकिय विकृतीचे चिरेबंध वाडे जमीनदोस्त करते.या कवितासंग्रहात नव्या प्रतिमासृष्टीचा व प्रतिकाचा मुक्त आविष्कार दिसून येतो.बैलोपनिषद,मरणझड,
सूर्यग्रह,अंधारग्रस्त,कलैवरसंस्कृती,भयदग्धपर्व,डॉयनामिक,महाप्रकल्प,प्रीयाम्बल,अग्निपरीक्षा,रोगांणू,टाळेबंदी,मेढरीकरण,विनासायस,पर्यायविहिनता,दुर्दिनासारखे,नरनारीभक्षक,मनुन्यायालय,मर्मांतक,डायनासोरअंधार,हाकोडेमुक्त,संस्कृतीद्रोही,अस्तित्वदंड,उंदिराचार्य,बेडकीकरण,अशा अनेक सृजनोत्सव शब्दांमधून कवितेला नवे ज्वाजल्यत्व प्राप्त झाले आहे.कविने स्वतःला मर्यादेत न बांधता असीम अशा जागतिक क्षितीजावर स्वतःला विस्तारले आहे.धर्म ,जात,पंथ,भाषा,प्रदेश,यांचा भेद न ठेवता कवी आता विश्वव्यापी बनले आहेत.जगात आज माणूसकी नष्ट होत असतांना माणूसकिचे नवे तारांगण तयार करण्याची जिद्द अतूलनिय आहे.वर्तमान खदखदणाऱ्या दाहकतेतून स्वतःची नवी प्रज्ञानी प्रतिभा ते घडवत आहेत.कोणत्याही राजकिय पक्षांच्या दावनीला स्वतःला न बांधता सर्वकष माणूस तयार करणारी नवनिर्माणशाळा अग्निपरीक्षेचे वेळापत्रक या कवितासंग्रहात दिग्दर्शित झालेली आहे.अग्निपरिक्षेचे वेळापत्रक मधील कविता माणुसकिचा असीम सौहार्दाच्या सौंदर्यपौर्णिमेची कविता आहे.या कवितासंग्रहाचे मुखपृष्ट नव्या पर्वताच्या अज्ञानी काळोखशीलाला पेलण्याची उर्मी माणसाला देत आहे.हा कवितासंग्रह वर्णमुद्रा पब्लिशर्स शेगाव यांनी प्रकाशित केला आहे.कविच्या आंतरिक महाऊर्जेला नवे धुमारे फुटून नवी क्रांतीकविता पुन्हा वाचकाला मिळावी यासाठी कविला पुढील काव्यप्रवासाला मंगलकामना चिंतितो..!

✒️लेखक:-प्रा. संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००