आदिवासी समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ !

  135

  (अनुताई वाघ जन्म दिवस)

  अनुताई बालकृष्ण वाघ या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले. पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांचेसोबत त्यांनी बालशिक्षणाचे कार्य केले.
  अनुताईंचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. त्यांचा जन्म दि.१७ मार्च १९१० रोजी मोरगाव, पुणे येथे झाला. वयाच्या तेराव्या वर्षी इ.स.१९२३ साली शंकर वामन जातेगावकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. परंतु सहा महिन्यांतच त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य आले. पुन्हा त्या ग्रामीण भागात सामाजिक व शैक्षणिक कार्यांत मग्न झाल्या. म.गांधींच्या ‘खेड्याकडे चला’ या आदेशातून प्रेरणा घेऊन सन १९४५ साली मुंबईमधील बोरिवली भागात भरलेल्या ग्रामसेविकांच्या प्रशिक्षण शिबिरात दाखल झाल्या. पुढे तत्कालीन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले व शिक्षिका म्हणून काम करीत असताना त्यांना ताराबाई मोडक भेटल्या.

  त्यांनी ताराबाईंच्या बोर्डी, ठाणे येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला. तेथे इ.स.१९४७ ते १९९२ अशी ४७ वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले. पुढे कोसबाडच्या नूतन बालशिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकरिणी सदस्य, अखिल भारतीय पूर्वप्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षणपत्रिका व स्त्रीजागृतीसाठी असलेल्या ‘सावित्री’ मासिकाच्या त्या संपादिका होत्या. अनुताईंनी आपल्या शैक्षणिक संकल्पना, पद्धती आणि प्रयोग यांची साद्यंत चर्चा स्फुटलेखन व पुस्तकांद्वारे केली. त्यांच्या पुस्तकांपैकी बालवाडी कशी चालवावी – सन १९५६, कुरणशाळा, विकासाच्या मार्गावर, शिक्षणमित्र माला, अजब सातभाई – सन १९७७, आटपाट नगरात, सकस आहार गीते, टिल्लूची करामत, कोसबाडच्या टेकडीवरून – सन १९८०, गुरुमाऊलीचा संदेश – नाटक सन-१९८२, सहजशिक्षण – सन १९८२, दाभणेच्या जंगलात, विकासवाडी दर्शन – नाटक आदी पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांपैकी काही पुस्तकांचे इंग्रजी, हिंदी, गुजराती, इ.भाषांत अनुवादही झाले असून काहींच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत. १) बालवाडीतील गोष्टी भाग १ व २, २) बालवाडीतील बडबडगीते, ३) बालवाडीतील कृतिगीते, ४) प्रबोधिका इ.पुस्तके व शिक्षक-पालक प्रबोधनासाठी चालविलेल्या शिक्षणपत्रिका, स्त्रीजागृती करणारे सावित्री इ.मासिकांचे त्यांनी स्फुटलेखन केले.

  केसरी, छावा आदी नियकालिकांतून स्फुटलेखन केले. अनुताईंचे हे कार्य तरुणपिढीस, विशेषतः स्त्रीवर्गास स्फूर्तिदायक व मार्गदर्शक ठरेल असेच आहे. कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेलाच ‘कोसबाड प्रकल्प’ म्हणून ओळखले जाते. आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका ट्रेनिंग काॅलेज इ.शैक्षणिक संस्था सुरू केल्या. भारताच्या केंद्र सरकारतर्फे साक्षरता प्रसारार्थ अनुताईंनी लिहिलेल्या सहजशिक्षण या पुस्तकास इ.स.१९८१ साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन करून आयुष्य वेचणाऱ्या या अनुताईंना आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, फाय फाऊंडेशन, सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांबरोबरच पद्मश्रीने सन्मानित केले गेले. कोसबाड, बोर्डी येथे त्यांचे अल्पशा आजाराने दि.२७ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.
  !! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जन्म दिनी अनुताईंना व त्यांच्या स्फूर्तिदायी कार्यांना विनम्र अभिवादन !!

  ✒️संकलन व शब्दांकन -श्री कृष्णकुमार गो. निकोडे गुरुजी.[संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.]मु. पोटेगावरोड, पॉवर स्टेशनच्या मागे, रामनगर, गडचिरोली.
  जि. गडचिरोली (७७७५०४१०८६).