जागतिक जल दिन

26

आज २२ मार्च, आजचा दिवस जागतिक जल दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. पाणी ही सजीवांची मूलभूत गरज आहे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही. पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र नाही. पण आज जगभर पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पूर्वी मुबलक स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या पाण्याची आज मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. पाण्याचे महत्व अनन्य साधारण आहे. पाणी बचत ही काळाची गरज बनली आहे. यामुळेच पाण्याच्या बचतीसाठी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने १९९२ मध्ये झालेल्या अधिवेशनात २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर २२ मार्च १९९३ रोजी पहिल्यांदा जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. ब्राझीलची राजधानी रियो डी जिनोरियो येथे पहिला जल दिन साजरा करण्यात आला.

पाणी बचतीसाठी जगभरात जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. २२ मार्च हाच दिवस जागतिक जल दिन म्हणून निवडण्यामागे कारणही तसेच आहे. २२ मार्च पासून वातावरण बदलास सुरवात होते. त्यामुळे तात्विक दृष्ट्या पावसाळ्याची सुरवात होण्यासाठी हा दिवस कारणीभूत ठरतो. हा तर्क वापरुन हा दिवस निवडण्यात आला आहे. पृथ्वीवर पाण्याचे पाण्याचे प्रमाण ७१ टक्के इतके असले तरी पिण्यायोग्य पाणी अल्प प्रमाणात आहे. वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यास हे पाणी कमी पडत आहे. पाणी ही सजीवांची मूलभूत गरज असली तरी इतर सजीव पाण्याच्या अपव्यय करित नाहीत मानव मात्र पाण्याचा मोठा अपव्यय करतो, गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतो. पाणी वापराचे नवनवीन मार्ग मानव शोधीत असतो त्यामुळे पाण्याची तीव्रता जाणवते. हवामान बदलामुळे पावसाच्या पद्धतीत झपाटयाने बदल होत आहे. पूर्वी नियमित येणारा पाऊस आता बेभरवशाचा झाला आहे. पावसाचे दिवस आणि पावसाचे प्रमाणही कमी होत चालले आहे. त्यामुळे दुष्काळाचे प्रमाणही वाढले आहे.

जागोजागी बोअरवेल घेऊन जमीनीखालील पाणीही मानवाने संपवले आहे त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळेच कदाचित पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल असा अहवाल काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाने दिला आहे. २०२५ पर्यंत जगातील एक तृतीयांश देशात पाणी पेटणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले आहेत. आशिया खंडाबाबत सांगायचे झाले तर भारतात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. भारतात मार्चच्या सुरवातीलाच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागतात. दरवर्षी ४० टक्के गावांत दुष्काळ असतो. महाराष्ट्रातील मराठवाडा सारख्या विभागात तर दरवर्षी दुष्काळ असतो. लातूर सारख्या शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागतो. ग्रामीण भागात तर भीषण पाणी टंचाई जाणवते. अनेक गावांत टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. एकदा आलेला टँकर आठ दिवसांनीच पुन्हा येतो. काही गावात तर एका महिन्यात एकदाच पाणी मिळते. हंडाभर पाण्यासाठी महिलांना कैक किलोमीटरची पायपीट करावी लागते. पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. कृत्रिम पाणी तयार करण्यात अजूनही शास्त्रज्ञांना यश आले नाही म्हणूनच आहे त्या पाण्याची बचत करणे हेच आपल्या हातात आहे. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. पाण्याची बचत करूनच आपण पाणी टंचाईवर मात करू शकतो. जल है तो कल है… या उक्तीनुसार येणारा काळ सुखकर करायचा असेल तर पाण्याची बचत करावीच लागेल. आजच्या दिवशी प्रत्येकाने पाणी बचतीचा संकल्प करून पाणी बचतीसाठी प्रयत्न केला तरच जागतिक जल दिनाचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)९९२२५४६२९५