ज्येष्ठ मित्रांचा वयाच्या पांच्याहत्तरीतला स्नेहमेळावा

30

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.21मार्च):-भुदरगड तालुक्यातील फये या धरणाच्या जवळील रिसॉर्टवर माजी आमदार बजरंग देसाई यांनी आपले लहानपणाचे मित्र, शाळेतील मित्र व कॉलेजमधील मित्र यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. दूर अंतरावर पसरलेली डोंगररांग, निळेभोर आकाश आणि एका डोंगरावर नवीन झालेले रिसॉर्ट येथे हे पन्नास-साठ मित्र पाहून एक भावनिक इंद्रधनुष्य तयार झाल्यासारखे वाटत होते. प्रथम माजी आमदार देसाई यांच्या सोनाळी येथील वाड्यामध्ये सर्व जमले. चहापाणी झाल्यानंतर एक मेकाच्या गळाभेटी झाल्या. मिठाई भरवली. फोटोसेशन झाले. मग 15 की.मी. अंतरावरील निसर्गरम्य फये धरणाकडे गाड्यांचा ताफा सुसाट निघाला.सर्वांचे स्वागत टी.बी.पाटील यांनी केले. डॉ सुभाष देसाई यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की,आम्ही घाटगे देसाई, मूळ मुंगी पैठण येथून आलो. येथील देशमुखी मिळाली. अनेक कर्तबगार आणि समाजावर प्रभाव पाडणारी मंडळी आमच्या घरात आली. तोच बहुजन हिताय बहुजन सुखाय हा वारसा आम्ही सगळे चालवीत आहोत.

यावेळी गोखले कॉलेज चे माजी प्राचार्य बी.के.पाटील म्हणाले आम्ही खूप लहानपणापासून जीवाभावाचे मित्र आहोत. माझे मित्र बजरंग यांच्यामुळे मी शिक्षक झालो. त्यांनी मला शिक्षण क्षेत्रात जायला सांगितले नसते तर मी आता पोलीस अधिकारी म्हणून रिटायर्ड झालो असतो. अशा अनेक आठवणी प्रत्येक मित्रांनी आमदार देसाई यांच्या बद्दल व्यक्त केल्या. विविध क्षेत्रात नाव असलेल्या या मंडळींनी आपला परिचय करून दिला.
यानंतर देसाई कुटुंबातील रणजित देसाई, प्रकाश देसाई, धैर्यशील देसाई, राहुल देसाई यांनी उपस्थित सर्वांचे शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. भोजनानंतर पुन्हा एकदा भेटण्याचे आश्वासन देत सर्व मित्र आपापल्या घरी परतले. अशा या स्नेह मेळाव्यातून सर्व मित्र पुन्हा एकदा जुन्या आठवणींची शिदोरी घेऊन परतले.