धम्मयानच्या माध्यमातून पुस्तक वाचन चळवळ गतिमान होणार

  41

  ?धम्मयानचा लोकार्पण सोहळा

  ✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  कोल्हापूर(दि.22मार्च):-सामाजिक क्षेत्रात प्रबोधनाचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या धम्म भवन चॅरीटेबल ट्रस्ट निर्मित धम्मयान या फिरत्या पुस्तक वाचनालयाचा व प्रबोधन रथाचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. 20 मार्च रोजी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे धम्म अभ्यासक भदंत एस. संबोधी, इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे आणि दिशादर्शक विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या हस्ते पार पडला.

  आगळ्या वेगळ्या धम्मयानच्या लोकार्पण सोहळ्यावेळी, भदंत एस. संबोधी म्हणाले की, महामानवांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्यासाठी हा ज्ञानाचा रथ आता गावोगावी फिरणार आहे. या माध्यमातून वाचन चळवळही वाढेल आणि अजुनही ज्यांना महामानव माहित नाहीत त्यांना त्यांची ओळख होईल. या फिरत्या पुस्तक ग्रंथालयात महाराष्ट्रातील अनेक नामवंत व प्रसिद्ध लेखकांची निर्मिती प्रकाशन, संवाद प्रकाशन, चैत्र प्रकाशन, प्रयास प्रकाशन यांची जवळपास 3000 पुस्तके उपलब्ध आहेत. या धम्मयानच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पुस्तक वाचन चळवळ राबवली जाणार आहे. यावेळी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा प्रा. करुणा मिणचेकर यांनी या धम्मयानाची संकल्पना स्पष्ट केली. या धम्मयान मधुन गावोगावी जाऊन विविध प्रबोधनात्म कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  लोकार्पण सोहळ्यास अनिल म्हमाने, प्रा. डॉ. अमर कांबळे, प्रा. डॉ. कपिल राजहंस, प्रा. शोभा चाळके, मंदार पाटील, अमित मेधावी, रुपेश पाटील, सुरेखा भोसले, सुरेश केसरकर, संदीप कांबळे, गंगाधर म्हमाने, प्रकाश नाईक, सई पाटील, विजय कोरे, शांतीलाल कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.