आष्टी येथे आदिवासी महिलेवर प्रभारी ठाणेदाराने केला अत्याचार

35

🔺प्रभारी ठाणेदाराची चौकशी करून जेरबंद करण्याची आ.धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी

✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहेरी(दि.24मार्च):- चामोर्शी तालुक्यातील आष्टी उप पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार बिराजदार यांनी सोमवार 22 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास एका आदिवासी महिलेसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्राप्त झाली असून प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आष्टी येथील प्रभारी ठाणेदार बिराजदार याला जेरबंद करून कठोरातील कठोर शिक्षा देण्याची तीव्र मागणी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे.

एका कौटुंबिक विवाद प्रकरणा संदर्भात चौकशीच्या बहाण्याने सोमवारी पीडित महिलेचे घर गाठून बिराजदार यांनी त्या महिलेसोबत कुकर्म करण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण गंभीर असून तात्काळ बिराजदार याला जेरबंद करण्याची व कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी करून असले घाणेरडे प्रकार यापुढे कदापिही खपवून घेणार नाही असा सज्जड इशाराही दिले.

अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची अपेक्षा पोलिसांकडून असते,मात्र पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले तर न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. महाराष्ट्र राज्यात गृह विभागावर सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असताना आष्टी सारखे प्रकार होत आहेत, त्यामुळे आता आष्टी पोलिसांची कार्यप्रणाली बाबतीत शासन कोणती भूमिका पार पाडेल,याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.