कोव्हिड सेंटर मध्ये औषधी व खाटा नसल्याबाबत मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, परिस्थिती न सुधारल्यास मनसे आंदोलनाचा इशारा

31

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि.26मार्च):-संभाजीनगर मध्ये दिवसेंदिवस पेशंट वाढत असताना कोव्हिड सेंटर मध्ये पुरेशा खाटा व औषधी उपलब्ध नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.तसेच काल एका ७०वर्षीय आजोबांनी आपल्या कोव्हिड पोजिटिव्ह नातवाला औषधी मिळवून देण्यासाठी अक्षरशः घरातले मंगळसूत्र विकून औषधी उपलब्ध केली होती हा प्रकार मनसे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावर काल सदरील मेलट्रॉन कोव्हिड सेंटर वर मनसे कार्यकर्त्यांनी धाव घेऊन सदरील गंभीर प्रकार मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडे यांच्या लक्षात आणून दिला होता.

त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आज मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे व शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी श्री. सुनिल चव्हाण यांना निवेदन देऊन कोव्हिड सेंटर मध्ये सुरू असलेला अनागोंदी कारभार लक्षात आणून दिला, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ औषधी उपलब्ध करण्याविषयी सूचना करून सदरील प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. ही परिस्थिती लवकरच सुधारू याचे आश्वासन दिले…

यावेळी मनसे शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्यासह शहर सचिव संतोष कुटे, शहर सहसचिव दिपक पवार, विभाग अध्यक्ष चंदू नवपुते, कामगार सेनेचे बाबुराव जाधव हे उपस्थित होते.यानंतरही कोव्हिड सेंटरची परिस्थिती न सुधारल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मनसे तर्फे देण्यात आला…