आई अखेर पोरकं करून गेलीस !

34

✒️लेखक:-दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

गेले दोन महिने मृत्यूशी झुंज देणा-या आईची अखेर मागच्या गुरूवारी प्राणज्योत मालवली. आयुष्यभर पाषणाशी टक्कर घेत जीवनातल्या अनेक संकटांचा हसत हसत सामना करणारी झुंजार आई अखेर पोरकं करून गेली. मी सहा महिन्याचा पोटात असताना बाप निघून गेला. त्या दिवसापासून तिच आमचा बाप आणि आई होती. तिनेच बापाचे छत्र धरले आणि तिनेच मातृत्वाची ममता दिली. आज तिच्या जाण्याने ही दोन्ही नाती गेली. जणू आभाळ आणि जमिन एकाचवेळी फाटली. ख-या अर्थाने आता पोरके झाल्यासारखे वाटते आहे. माणसाच्या आयुष्यात बेहिशोबी, निर्व्याज, निखळ व निस्वार्थ प्रेम करणारे एकमेव नाते म्हणजे आई. बाकीची नाती हिशोबी. प्रेम द्या आणि घ्या (Give and take) हा हिशोबी व्यवहार इतर नात्यात आढळतो. संत तुकोबारायांच्या शब्दात सांगायचे तर “जग हे दिल्या घेतल्यांचे ।” आईच्या माघारी “दिल्या घेतल्यांच्या” या जगात आईची उणीव क्षणाक्षणाला भासेल. कारण तिची जागा कोणीही घेवू शकत नाही. दाही दिशाला टाहो फोडला तरी आई भेटणार नाही, गालावरून, पाठीवरून फिरणारा आईचा तो प्रेमळ हात भेटणार नाही.

कपाळावर ममतेने टेकणारे ते ओठ आता कधीच मिळणार नाहीत. आई नावाचा काळजातला हळूवार कप्पा आणि तिच्याशिवाय परके वाटणारे आपलेच घर, त्या घरात सर्वत्र भरून उरणारी तिची जागा आता तशीच रिकामी राहिल. सतत तिची आठवण करून देत राहिल. आई आयुष्याला पुरत नसते पण आई आयुष्य व्यापून टाकते त्याचे काय ?

अखंड आयुष्यभर पराकोटीचे कष्ट करून नव-याच्या माघारी पाच मुलं जगवणं, शिकवणं सोपी गोष्ट नव्हती. आईने ती किमया साधली. प्रचंड काबाडकष्ट करून आम्हा भावंडांना तिने लहानाचे मोठे केले. तळ्याचे, विहीरीचे, रस्त्याचे, फॉरेस्टचे आणि शेताची सर्व कामे करत करत आमच्या सर्वांच्याच पोटाची खळगी तिने भरली. कित्येकदा उपाषीपोटी दगड-मुरूमाशी टक्कर घेत असताना पोटात दुखायचे. घरात धान्य नसले की ती सकाळी उपाशीपोटीच कामावर जायची. हातात टिकाव घेवून विहीर, तलाव खोदताना, खड्डे काढताना तिच्या पोटात दुखायचे. अशावेळी उपाशी असणारे पोट टॉवेलने बांधायचे आणि निमुटपणे काम करत रहायचे. गरिबीने गांजलेला नाचार संसार साजरा करताना तिने रक्ताचे पाणी केले. आम्ही वाढत होतो पण तिच्या कष्टावर, कष्टा-कष्टाने आटलेल्या तिच्या रक्तावर. तिचे थेंब थेंब रक्त आटत होते आणि आमचे पोषण होत होते. या सगळ्या प्रवासात तिने जे सोसलय, जे भोगलय ते भयंकर आहे. तिचा संघर्ष आठवला की विषाचे घोट पचवणारा शंभू महादेवही तिच्यापुढे फिका वाटतो. गरिबीच्या विषाचे घोट पचवत तिचा संघर्ष नेहमी सुरूच होता. हा संघर्ष करताना तिनेही या हिशोबी जगाचे कटू अनुभव घेतले. अनेकदा आपली असणारी नातीच कशी वैरी होतात ? छळ करतात ? याचा पदोपदी अनुभव तिने घेतला.

वयाच्या चौथ्या वर्षापासून अनुभवलेला आईचा अफाट आणि पराकोटीचा संघर्ष डोळ्यासमोर आजही तसाच उभा राहतो. जणू एखादा चित्रपट समोर दिसावा तसे तिचे संघर्षमय आयुष्य डोळ्यासमोर उभे राहते. फाटक्या परस्थितीमुळे लवकरच उमज आलेली होती. त्यामुळे तिच्या आयुष्यातला संघर्ष समजत होता. ती किती यातना झेलते, ती किती कष्ट उपसते याची जाणीव होत होती. प्रचंड विपरीत परस्थिती असतानाही तिने कधी स्वाभिमान गहाण टाकला नाही, कधी लाचार झाली नाही. स्व कष्टावर आमच्या घराचा डोलारा उभारणारी माझी आई म्हणजे रणांगणावर मोघलांशी झुंजत झुंजत स्वराज्य वाचवणारी ताराबाई वाटते. बापाने जाताना पदरात पाच पोरं टाकली. या पलिकडे त्याने काहीच दिले नाही. ना घर ना शेत ना कुणाचा आधार. केवळ काबाडकष्ट वाट्याला आलेल्या आईने प्रचंड संघर्ष केला. या सगळ्या संघर्षात तिने कमालीचा प्रामाणिकपणा, स्वाभिमान व नितीमत्ता जपत भाकरीचा संघर्ष करणे सोपे नव्हते. कित्येक वेळा घरात भाजीला काही नसायचे. आई भरल्या रानातून जायची-यायची. कित्येकदा मी तिच्यासोबत जायचो. कामावरून घरी येताना दोन्ही बाजूला भरलेली शेतं असायची पण आईने कधी कुणाच्या शेतातला भाजीचा देठ तोडला नाही. कुणाच्या शेतातली जळणाची काटकी कधी उचलली नाही. अनेकदा शेताच्या मालकीनींना आईची दया यायची आणि “आक्काताय वयनी तुमाला फोड उठला जळान न्या, कालवणाला कायतरी न्या ! असं म्हणून स्वत:च जळण व भाजी तोडून द्यायच्या. त्यांनी जळण व भाजीला दिले तरी ते ही मर्यादेत घेणारी आई जगावेगळी होती.

कुणाचे फुकटात लुटायचे नाही, कुणापुढे लाचार व्हायचे नाही, समोरच्याने दिलय म्हणून ओरबाडणारी नव्हती. तिच्या आयुष्यातले अनेक कटू प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात. तिला मदत करणा-या कचरेवाडीतील माय माऊल्या तशाच डोळ्यासमोर उभ्या राहतात. येसामामी, मालू मामी, रखू मामी, गंगू मामी, राजू मामी या सर्व माय माऊल्यांचे उपकार कधीच विसरणार नाहीत. गावच्या तळ्याचे काम चालू होते पण पगार झालेला नव्हता. दिवाळीचा सण होता. उधारी भागवली नाही म्हणून किराणा दुकानदाराने उधार दिलेला दिवाळीचा किराणा माल परत काढून घेतला होता. आई रडत होती. पोरांना दिवाळी मिळणार नाही याचे तिला दु:ख होते. तेवढ्यात रखू मामी (रूक्मिणी ठोंबरे) या आल्या. त्यांनी आईला रडताना पाहिले आणि आईची समजूत काढली. स्वत:च्या दिवाळीतला अर्धा माल आम्हाला दिला. रडू नका आक्काताय वयनी. दिवस घर बांधून रहात नाहीत. पोरं मोठी झाली की तुमच्या तोंडाकडे बघायचीही कुणाची हिम्मत राहणार नाही. जातील की हे बी दिवस ! असे सांगून रखू मामीने आईची समजूत काढली. रखू मामीच्या दातृत्वाने आमच्या घरात दिवाळीचे दिवे पेटले. दिवाळीचा सण गोड झाला. तिच्या संघर्षमय आयुष्यातले असे एक ना अनेक प्रसंग आहेत.

काळजाला चिरणारे, काळजाला भिडणारे पण आई लढत राहिली. धिरोदत्तपणे विपरीत परस्थितीशी झुंजत राहिली. संकटाच्या छाताडावर पाय देत स्वत: उभी राहिली आणि तेवढ्याच सामर्थ्याने आम्हालाही उभे केेले. “उकिरड्याचाही पांग फिटतो अरे आपण तर माणसं आहोत, आपलेही दिवस जातील !” हा सकारात्मक विचार आमच्या मनात पेरत राहिली. तिच्या जलमाची चितरकथा आठवताना परत परत डोळे भरून येतात. एखादी व्यक्ती इतका संघर्ष करू शकते ? यावर विश्वास नाही बसत. कुणाच्याही, कसल्याही मदतीशिवाय घराचा डोलारा सांभाळणारी, उभारणारी, इमानदारीचे व स्वाभिमानाचे संस्कार हाडात पेरणारी माझी आई खरच खुप खुप मोठी होती.

गेल्या दोन महिन्यात तिने मला कुठेच सोडले नाही. चार वर्षापुर्वी चित्रलेखा या साप्ताहिकासाठी महाराव सरांच्यासोबत काम करायचे ठरवले होते. सरांनी तशी विचारणा केली होती. सरांसोबत काम करायची माझी इच्छाही होती. मी ते आईला सांगितले. त्यावर आई पटकन म्हणाली, तु मुंबईला जा आणि माझी जँकी श्रॉफची आई कर. ती मेल्याली त्याला समजली नाही. मी मेल्याली तुला कळायचे नाही. मरताना तुझी माझी भेटही व्हायची नाही. तिने टिव्हीवर जँकी श्रॉफची मुलाखत ऐकली होती. त्यावेळचे तिचे शब्द काळजाला चिरत गेले. आमच्यासाठी स्वत:च्या आयुष्याची होळी करणा-या आईला वृध्दापकाळात सोडून मुंबईला जाण्याचा विचार मी बदलला. तिच्या अखेरच्या वेळी तिचे सुख हिरावून घ्यायची इच्छा नाही झाली. अखेर तीने तिचेच खरे केले. गेल्या दोन महिण्यात कुठेच जाऊ दिले नाही. दिवस-रात्र बरोबर थांबायला लावले. आपण जाणार आहोत हे तिच्या लक्षात आले होते की काय कोणास ठाऊक ? शेवटी शेवटी तर जवळ बोलवायची, डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवायची, अपार मायेनं कुरवाळायची. माझ्याजवळ बस, बिलगून झोप म्हणायची. गालाचे, कपाळाचे मुके घ्यायची अन डोळे पाण्याने भरायची. रात्री तिला झोप लागायची नाही.

झोप येईना की, “मी तुझे बाळ आहे मग मला थोपट की !” म्हणायची. थोपटायला लागले की हात घट्ट पकडून ठेवायची. तिच्या डोळ्यातले पाणी पाहून गलबलून यायचे पण तिच्या समोर डोळ्यात पाणी आणायची हिम्मत होत नव्हती. ती खचू नये वाटायचे. ज्या दिवशी गेली त्या दिवशी “आई मी लगेच ऑफीसला जावून येतो म्हंटलं तर नको जाऊ, थांब, बस इथेच !” म्हणाली. एक अर्जंट काम होते. जेवण करून तिला फसवून जायचे अन तासाभरात परत यायचा विचार मी मनातल्या मनात केला होता. तिने आम्हा सर्वांना जेवायला अलिकडे पाठवले अन अवघ्या दहा मिनिटात तीनेच फसवले. सर्वांना जेवायला जावा म्हणून पाठवले अन पलिकडे कसलाही आवाज न करता गपचुप निघून गेली. मी फसवणार होतो पण तिनेच फसवले. जेवण करून पलिकडे गेलो तर आईचे शरिर निपचीत पडले होते. कँन्सर सारख्या दुर्धर आजाराच्या वेदनेतून ती मुक्त झाली पण जाताना मला पोरकं करून गेली. “तुझी एकट्याचीच आई आहे का ? तिला आमच्याकडेही पाठवत जा !” म्हणून बहिणी माझ्याशी भांडायच्या. मला ती घरात नसलेली कधी चालायचे नाही. आता उभे आयुष्य तिच्याशिवाय कसे काढायचे ? हा डोंगरासारखा प्रश्न सतावच राहतो.