कोरोना वारियर्सना समजून घेणे आवश्यक

28

अनेकांच्या कथा आणि व्यथा शब्दात मांडायचे आहेत. कसे आणि कुठून सुरू करावे ? याहीपेक्षा किती आणि काय मांडवे ? हा ही एक प्रश्न आहे. अनेकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकलेला आहे. खऱ्या अर्थाने मरणाची भीती नसलेला कोणताही प्राणी शोधून सापडणार नाही. त्याला माणूस कसा अपवाद असेल ? मनुष्य तर संवेदनशील आहे. दुसऱ्याच्या भावना, संवेदना, दुःख, वेदना त्याला जाणवतात. मग याच भावना त्याच्या कशा नसतील? त्यालाही दुःख, वेदना, संवेदना, भीती असेलच ना ? सेवा करा, सेवेकरी व्हा. देव दगडात नाही. खरा देव माणसात आहे. तो देव ओळखायला शिका, खऱ्या अर्थानं मनात देव जागवायला शिका. आपल्या वर्तनात देव उतरवायला शिका. असे लिहिणे, सांगणे, म्हणणे खूप सोपे आहे.प्रत्यक्षात तसे वागणे फार कठीण आहे.

आज कोरोना या महाभयानक विषाणू सोबत लढणारे डॉक्टर, नर्स पॅरामेडिकल स्टाफ, सर्व दवाखान्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व स्वच्छता कर्मचारी, महानगरपालिका,नगरपालिका कर्मचारी संपूर्ण पोलीस यंत्रणा, कोरोना या विषाणू सोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लढणारा प्रत्येक फ्रन्टलाइन वारियर्स हेच खऱ्या अर्थाने आजच्या काळातील, आजच्या प्रसंगातील खरेखुरे साक्षात भगवंत आहेत. परमेश्वर आहेत. म्हणून तर या आजारातून बरे होणारे कित्येक जण, याच फ्रन्टलाइन वारियर्स समोर नतमस्तक होत आहेत. “आमच्यासाठी तुम्हीच देव आहात. तुमचे उपकार या जन्मात फेडता येणार नाहीत. आम्ही आपले मनस्वी ऋणी आहोत.” असे मनापासून म्हणत आहेत. खरेही आहे ते… फ्रन्टलाइन वॉरियर्स यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. त्यांचा करावा तेवढा आदर थोडाच आहे. त्यांचे व्यक्त करावे तेवढे ऋण कमीच आहे. कारण आजारी माणसांची काळजी घेणे. त्याची सेवा सुश्रुषा करणे. त्याचे मनोधैर्य वाढवणे. त्याला संकटाला तोंड देण्यासाठी खंबीर बनवणे. त्याच्यावर योग्य तो औषध उपचार करणे. औषधोपचारांसोबत मनाला नवीन उभारी देऊन, या विषाणू सोबत लढवायला लावून, ठणठणीत बरे करून, या विषाणू विरोधात जिंकवणे. हे खूप कठीण आणि जिकरीचे असले तरी चांगले काम आहे, पुण्याचे काम आहे. हे करताना त्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. स्वतःला आजाराचे संक्रमण होऊ शकते. ही भीती पत्करावी लागत आहे.

अनेक असाह्य, हतबल झालेल्या रुग्णांचा त्रास बघावा लागत आहे.त्यांना वाटणारी भीती हे लोक स्वतः अनुभवत आहेत. त्यांना होणारी वेदना, यातना स्वतः भोगत आहेत. गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांची अवस्था पाहून कित्येक वेळेस यांनाही खूप दुःख होत असेल.वेदना होत असतील. त्यांची अवस्था पाहून यांना ही भीती वाटत असेल. तरीदेखील खचून न जाता सर्वप्रथम स्वतः खंबीर होऊन त्यानंतर आपल्या सोबत्यांना खंबीर करणे. याच सक्षमतेने आपण उपचार करत असणाऱ्या रुग्णांना खंबीर आणि बळकट बनवणे. हे किती अशक्य वाटणारे काम आहे. तरीदेखील हे काम ही सगळी मंडळी आनंदाने आणि पूर्ण निष्ठेने करत आहेत. त्यांच्या कार्य कर्तुत्वाला, त्यांच्या महानतेला, त्यांच्या त्याग वृत्तीला, त्यांच्या समर्पणाला, त्यांच्या सहनशीलतेला आणि त्यांच्या सेवा भावाला मनस्वी प्रणाम ! त्रिवार वंदन! अशाप्रकारे मानाचा मुजरा करून, त्यांचा आदर करून, त्यांचा सन्मान करून आपल्यासारखे अनेकजण मोकळे होत असतील. हे पवित्र काम करताना त्यांना काय आणि कसे वाटत असेल. याचा थोडासा विचार आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे.

‘ जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.’

असे म्हणतात. असे म्हणणे फार सोपे आहे. पण प्रत्यक्ष काम करताना या फ्रन्टलाइन वॉरियर्सच्या जीवाची होणारी घालमेल. अंगाची होणारी लाही लाही. हृदयाची होणारी तळमळ. मनाला वाटणारी अनामिक हुरहुर. दुसऱ्याची तडफड पाहून त्याच भीतीने त्यांचाही तडफडणारा आत्मा. कधी आणि कशाप्रकारे या संकटातून आपण बाहेर पडू याची लागलेली ओढ. परत कधी ते सुखाचे आनंदाचे आणि कसलीही भीती नसलेले दिवस येतील. याचीच प्रत्येक जण वाट बघत आहे.

या भूतो न भविष्यती…! वैद्यकीय आणीबाणीच्या काळात अहोरात्र वैद्यकीय सेवा आरोग्य यंत्रणा पुरवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून,एका भयंकर शारीरिक व मानसिक विवंचनेतून हे सर्वजण जात आहेत. विशेषतः ड्युटीवर असताना PPE (Personal Protective Equipment) घातल्यानंतर या कठीण काळाचे गांभीर्य अधिकाधिक जाणवत असेल. PPE घालणे आणि काढणे याचे काही नियम आहेत ते पाळणे बंधनकारक आहे. संसर्गाचा धोका कमी करण्यात महत्त्वाचे आहे. हे PPE घातल्यानंतर सहा-सात तास खाणे तर सोडाच साधे पाणी सुद्धा पिता येत नाही. लघवीला जाणे सुद्धा शक्य होत नाही.

मुंबईची गरमी, दमट वातावरण दिवसेंदिवस वाढत जात असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव AC मध्ये होण्याचा जास्त धोका असल्याने म्हणून दवाखान्यात AC बंद ठेवाव्या लागत असतील. डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत झाकलेल्या या वॉटरप्रूफ पीपीई किटमध्ये घामाने कित्येक वेळा अंघोळ होत असेल. परंतु संसर्गाचा धोका असल्यामुळे दुसरा पर्यायही नसेल.

चेहऱ्याला N-95 मास्क, त्यावर सर्जिकल मास्क आणि त्यावर घातलेल्या चेहरा झाकण्याच्या प्लास्टिकच्या कव्हर मुळे निट श्वासही घेता येत नसेल. प्रचंड गुदमरल्यासारखे होत असेल. त्यामुळे थकवा, डोकेदुखी व इतर समस्या उद्भवत असतील. याही परिस्थितीत सतत सतर्क राहून, येणाऱ्या प्रत्येक पेशंटला संभाव्य धोका समजून, त्यावर दिलेल्या नियमावलीप्रमाणे उपचार करून पटापट निर्णय घ्यावे लागत असतील. दररोज कित्येक रुग्ण तपासावे लागत असतील. कित्येक रुग्ण केवळ घाबरल्यामुळे येत असतील. त्यांना हे सगळं समजून सांगणे अति अवघड होत असेल. कारण डॉक्टरांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल. ओरडून ओरडून बोलले तरच आवाज रुग्णांपर्यंत पोहोचत असेल. ओरडल्यामुळे घसा पार कोरडा होत असेल त्यात पाणी पिण्याची सोय नाही. खरंतर पी पी इ किट घालून काम करणे हे प्रचंड गैरसोयीचे. मोकळा श्वास न घेता येण्याचे. स्वतःला बांधून टाकल्याप्रमाणे वाटण्याचे काम आहे. सतत अशा अवस्थेमध्ये राहून या फ्रन्टलाइन वॉरियर्स ची अवस्था गुदमरून गेल्यासारखे होत आहे. याचा विचार केला तरी असाह्य होते.. मग ते कसे सहन करत असतील..

हे सहन करताना त्यांना काय वाटत असेल.. त्यांनाही वाटत असेल ना, की आमचे हे दुःख कोणीतरी समजून घ्यावे. कोणीतरी आमच्याशी प्रेमाने वागावे. ज्याच्या खांद्यावर डोके ठेवले, की अक्षरशः बांध फुटावा. गहिवरून जावे. मनात भरून आलेले सगळे सगळे सांगून मोकळे व्हावे. दुःखाने डोळे डबडबले, मन भरून आले तर सावरण्यासाठी कुणीतरी जवळच आपल्या हक्काचे असावे. लवकरात लवकर या आजारावर लस सापडावी. औषध उपचार सापडावा. संक्रमित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ती कमी व्हावी, थांबावी. आपल्यावरील कामाचा ताण थोडासा तरी कमी व्हावा.

सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे होणारा प्रसार थांबवावा. स्वतःचा जीव धोक्यात घालू नये आणि पर्यायाने विनाकारण आपल्यावरील कामाचा ताणही वाढवू नये. या रखरखत्या उन्हाच्या दिवसात आमच्या जीवनातही थोडासा गारवा असावा. जिवाच्या भीतीने घालाव्या लागणाऱ्या पी पी इ किट पासून आमची सुटका व्हावी. आम्हालाही मोकळा श्वास घेता यावा. आतुरतेने वाट बघत असणाऱ्या कुटुंबातील सदस्य साठी तरी घरी जाता यावे. आमच्याही लाडक्या लेकरांना भेटता यावे. आई-बाबा, पती-पत्नी, भाऊ-बहीण, बालचिमुकले त्यांना डोळे भरून पाहता यावे. त्यांच्या सहवासामध्ये राहता यावे, जगता यावे. काळजाचा तुकडा असणाऱ्या चिमुकल्यांना घेता यावे. त्यांचा लाड करता यावा, हृदयाशी धरता यावं. त्यांच्याशी खेळता यावं. बालगोपाळांना प्रेमाने गोंजारता यावं. हे झालं त्यांचं…

आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कसं वाटत असेल…? याचा थोडा विचार करून पाहू. कित्येक आई-बाबांना वाटत असेल. कसं असेल माझं बाळ ? काही खाल्लं असेल का ? त्याला जेवता तर येत असेल ना ? पण जेवण जात असेल का ? त्याच्या मनाची अवस्था कशी असेल ? कोण त्याला आधार देत असेल ? काय आणि कसे खात असेल माझे बाळ? त्याला तर भूक सहन होत नाही. भूक लागली की खूप असह्य होते त्याला. भुकेला कोवळे आहे माझे लेकरू. मनात कधी काही ठेवत नाही. प्रत्येक गोष्ट आई-बाबाला सांगायची सवय आहे. आज कुणाला सांगत असेल ?

कित्येक वेळा सांगितलं बाकीच्यांना जाऊदे दुसऱ्या गावी राहायला. आम्ही तुझ्या जवळच राहतो. आम्हाला नाही कशाची भीती. आम्हाला काही होणार नाही. तू येत जा घरी. घरी आल्याशिवाय पोटभर जेवण होत नाही, आराम होत नाही. एवढे काम करायचे म्हणल्यावर जेवणाची आणि राहण्याची सोय चांगली असली पाहिजे. हॉटेलवर सगळ्या सुविधा असतील. पण आई बापाचे प्रेम थोडेच असणार आहे. त्यामुळे तू आमची काळजी करू नकोस. तू घरी येत जा. यावर लेकरू म्हणाले. “नाही. आई-बाबा, मला घरी येता येणार नाही. माझ्यामुळे तुम्हाला या आजाराचा धोका नको. आता तुमचं वय झालय. तुमची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे. आम्ही दुसऱ्यांना सांगतोय वयोवृद्ध माणसांना जपा. आपल्या आई-वडिलांना जपा. त्यांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या. आणि मीच कसा घरी येऊ बाबा. माझ्यामुळे तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. काही दिवसाची तर गोष्ट आहे. मी हॉटेलवरच राहतो. मी माझी काळजी घेत जाईन. तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही लेकरा बाळांना घेऊन सुरक्षित रहा. मी राहतो काही दिवस हॉटेलवर. त्याला करमत असेल का? किती आठवण येत असेल? वाईट वाटल्यावर कुणाला सांगत असेल? कुणाशी बोलत असेल? एक आणि अनेक प्रश्नांचा कल्लोळ या फ्रन्टलाइन वॉरियर्सच्या आई-वडिलांना समोर उभा असेल.अशा अवस्थेत त्यांच्या मुखात आनंदाने घास जात असेल का?

त्यांच्या पती-पत्नीला काय वाटत असेल…? आज खऱ्या अर्थाने माझ्या जोडीदाराला मानसिक, भावनिक आधाराची गरज आहे. किती कामाचा ताण आहे? किती प्रचंड काम करावे लागत आहे? किती सहन करावे लागत आहे? अशावेळी आपण मदत करायची. त्यांचे दुःख समजून घ्यायचे. त्यांचे दुःख कमी करायचे. पण वेळ कशी वैरी झाली. अशा कठिण परिस्थितीमध्येही आपल्याला सोबत करता येत नाही. आयुष्याचा साथीदार असून, आयुष्याचा सोबती असून, आपला काय उपयोग आहे. अशा असंख्य वेदना त्यांच्या जोडीदाराला होत असतील. अशावेळी किती असाह्य आणि हतबल होत असेल. काय भावना असतील त्यांच्या. किती हृद्य भरून येत असेल. किती डोळे पाणावत असतील. त्यांच्या भावना खरेच शब्दात व्यक्त करण्यासारखे आहेत का? मला तर फारसे लिहिता येत नाही. पण खऱ्या अर्थाने जी लेखक, कवी मंडळी आहे त्यांना तरी यांच्या भावना शब्दबद्ध करता येतील का? हे सारे कसे शब्दांच्या सामर्थ्य पलीकडच आहे.

यांच्या बहीण, भावांची काय अवस्था असेल. किती आतुरतेने आपल्या स्वजनांची वाट बघत असतील. काय भावना असतील त्यांच्या. आपला दादा, आपली ताई सुरक्षित रहावी. तिला त्रास होऊ नये. तिला हा आजार होऊ नये. असे मनोमन वाटत असेल. त्यासाठी ते देवाकडे प्रार्थना करत असतील. माझ्या दादाला, ताईला सुरक्षित ठेव. हीच विनंती करत असतील.

बाळबोध लेकरांना काय वाटत असेल ? त्यांची काय अवस्था असेल ? कित्येक लेकरं टाहो फोडून, हंबरून म्हणत असतील. “आई आई…. बाबा बाबा…. तुम्ही घरी का येत नाही ? मला तुमची खूप आठवण येत आहे. मला तुमच्या शिवाय झोप येत नाही. मला तुमच्या शिवाय करमत नाही. आई-बाबा तुम्ही लवकर घरी या. मी तुमची खूप वाट बघत आहे. मला तुमच्या शिवाय या जगातील कोणतीच वस्तू नको. मला फक्त तुम्ही पाहिजे आहात. या ना लवकर.” त्यांना कसे समजावत असतील. काही मुले तर एवढी लहान असतील की त्यांना बोलता येत नसेल. त्यांना काय वाटत असेल. त्यांच्या नि:शब्द भावना कशा असतील.

 

या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार

नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार

आईस देव माना, वंदा गुरूजनांना

जगी भावनेहुनी या कर्तव्य थोर माना,

गंगे परी पवित्र, ठेवा मनी विचार

नव हिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार.

 

याचा थोडासा तरी विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. या कठीण दिवसांमध्ये फ्रन्टलाइन वारियर्स यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ज्या भावना दिव्या मधून जावे लागत आहे. त्याचे वर्णन अशक्य आहे. त्यांच्या भावनांचा, त्यांच्या संवेदनांचा, यांच्या हृद्यद्रावक अवस्थेचा. त्यांच्या परिस्थितीचा नितांत आदर, सन्मान प्रत्येकांनी मनोमन बाळगला पाहिजे. त्यांच्यासाठी तरी आपण सर्वांनी नियम पाळून, सुरक्षित राहिले पाहिजे. एवढे जरी केले तरी त्यांच्यावरचा अवाजवी ताण वाढणार नाही. हेच त्यांच्यासाठी सहकार्य असेल, की आपण सर्वांनी मीच माझा रक्षक व्हावे.

 

✒️लेखक:-श्री. मयूर मधुकरराव जोशी(ग्रीन पार्क, जिंतूर. जिल्हा परभणी)मो:-9767733560,7972344128