डॉ. सतीश पावडे लिखित ‘मराठी रंगभूमी आणि ॲब्सर्ड थिएटर’ ग्रंथाचे प्रकाशन

22

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.2एप्रिल):-भारतीय रंगभूमीत महत्त्वपूर्ण असलेल्या मराठी रंगभूमीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. पाश्चिमात्य साहित्यातील नाविन्यता मराठी रंगभूमीने आत्मसात केली आहे. प्रायोगिक रंगभूमीवर नवनवीन कलात्मक जाणिवा आविष्कृत होत असताना, विसंगतीतून सुसंगतीचा शोध घेणारा ‘मराठी रंगभूमी आणि ॲब्सर्ड थिएटर’ हा वैश्विक रंगभूमीचा मराठी वारसा सांगणारा ग्रंथ आहे, असे गौरवोद्गार अभिनेत्री आणि लेखिका डॉ. निशिगंधा वाड यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारवंत,नाटककार संजय सोनवणी होते.

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त भारतीय साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान “शब्दसृष्टी” द्वारा आयोजित डॉ. सतीश पावडे लिखित व नेक्स्ट पब्लिकेशन, पुणे प्रकाशित ‘मराठी रंगभूमी आणि ॲब्सर्ड थिएटर’ या ग्रंथाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रकाशन करण्यात आले. हा ग्रंथ मराठीतील ॲब्सर्ड रंगभूमीचा इतिहास मांडत असला, तरी त्याला तत्त्वचिंतनाची आणि द्रष्टेपणाची अनोखी झालर लाभलेली आहे. सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ॲब्सर्डिटी, ॲब्सर्डिझम व ॲब्सर्ड या तत्त्वांचा भारतीय परिप्रेक्ष्यात विचार व्हायला हवा. भारतीय विचार पद्धतीला नवीन संधी देवून ॲब्सर्ड थिएटरचा पायाभरणी करणारा हा मराठी वैश्विक ग्रंथ असल्याचे संजय सोनवणी म्हणाले.

मुक्त आशयातून जन्म घेणारा ॲब्सर्ड हा कलाप्रकार आहे. मानवी विचार प्रसारणाच्या मुळाशी असलेल्या सामाजिक, मानसिक प्रक्रियेच्या गुंतागुती प्रकट करण्याचे सामर्थ्य या कलाप्रकारात अधिक आहे. संवेदनशील, सृजनक्षम व मर्मज्ञ ज्ञानेंद्रियातून आविष्कृत झालेला डॉ. सतीश पावडे यांचा हा ग्रंथ मराठी रंगभूमीला नवी दिशा देणारा आहे, असे मत विजयराज बोधनकर यांनी व्यक्त केले.

मानवाच्या जीवनातील निरर्थकता, विसंगती व मिथ्याभानाची जाणीव करून देणारे तत्त्वज्ञान म्हणजे ॲब्सर्ड थिएटर आहे. ॲब्सर्ड नाटक हे माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी, सुसंगत करण्यासाठी, मानवी लढ्यासाठी सज्ज करते. जीवनाविषयीचा हा अगम्य आशावाद ‘मराठी रंगभूमी आणि ॲब्सर्ड थिएटर’ या ग्रंथाने दिला असल्याच्या भावना वीरेंद्र गणवीर यांनी यावेळी व्यक्त केल्यात.

‘मराठी रंगभूमी आणि ॲब्सर्ड थिएटर’ या ग्रंथाने मानवी जीवनाचा शोध घेतला आहे. ॲब्सर्ड तत्त्वज्ञान म्हणजे नकारात्मक, निराशावादी आणि निरर्थक अशी मांडणी झाली परंतु हे तत्त्वज्ञान निराशेचे नसल्याचे या ग्रंथातून जाणवते. या ग्रंथात मराठी नाटकांची संहिता व प्रयोग यांचे चिकित्सात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. हा ग्रंथ मराठी रंगभूमीला नवा ॲब्सर्ड राजाश्रय मिळवून देण्यात मैलाचा दगड ठरेल, हा विश्वासही डॉ. मंदा नांदुरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक “शब्दसृष्टी”चे संस्थापक-अध्यक्ष व “मनोहर मीडिया”चे संचालक प्रा. डॉ. मनोहर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या ‘इंटरनैशनल थिएटर इन्स्टिट्यूट’ने २७ मार्च हा दिन “जागतिक रंगभूमी दिन” म्हणून जाहीर केल्यानंतर दरवर्षी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे हा दिन साजरा केल्या जातो, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की ,व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत ‘थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा शब्द वापरतो.

रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत.” असे नमूद करून “रंगभूमीच्या इतिहासापासून ते आजची रंगभूमी, मराठी नाटककारांनी लिहिलेली नाटके, त्यांच्या मर्यादा, प्रेक्षकांची मनोभूमिका या मुद्यांवर सविस्तर विवेचन करणे ही काळाची गरज बनली आहे” असे प्रतिपादन केले. या बरोबरच त्यांनी खंत व्यक्त केली की, “आजपर्यंतच्या रंगभूमीचे सिंहावलोकन केल्यास असे लक्षात येते की इंग्रजी नाटके मराठीत अनुवादित होतात. मात्र मराठी नाटक इंग्रजीत अनुवादित होत नाहीत.”

कार्यक्रमाचे यशस्वी संचालन “शब्दसृष्टी”चे विश्वस्त व समारंभ संयोजक प्राचार्य मुकुंद आंधळकर यांनी केले तर आभार “शब्दसृष्टी” पत्रिकेच्या प्रबंध संपादक व समारंभ संयेजक आशा रानी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी “शब्दसृष्टी”चे प्रसिद्धीप्रमुख व समारंभ समन्वयक डॉ. अनिल गायकवाड, समारंभ तंत्र समन्वयक शैलेष सकपाळ, रवींद्र महाडिक यांनी परिश्रम घेतले. दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार आणि परिवार जन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****