नांदगाव मनमाड रस्त्याकरिता रू.252 कोटींचा निधी मंजूर – खा. डॉ.भारती पवार

20

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.3एप्रिल):-नांदगाव मनमाड रस्त्याकरीता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी जी यांनी काल दि.1 एप्रिल 2021 रोजी घोषणा करत रू.252 कोटीं रुपयांच्या कामास मंजूरी दिली आहे. सदर काम झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग 753 जे ची पूर्ण 168.800 लांबीचे काम पूर्ण होईल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र (खानदेश विभाग) हा शहादा शिर्डी राष्ट्रीय महामार्ग 753जी ला मनमाड येथे मिळेल व मनमाड पासून चांदवड पर्यंतच्या लांबीचे काम देखील सध्या महाराष्ट्र रस्ते विभाग महामंडळामार्फत प्रगतीत असल्याने चांदवड येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला मिळेल.

सदर मंजूर प्रकल्पांतर्गत नांदगाव ते मनमाड या नाशिक जिल्ह्यातील तथा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव तालुक्यातील रस्त्याच्या लांबीचा समावेश असल्याचे खा. डॉ.भारती पवार यांनी सांगितले. सदर प्रकल्पाची एकूण लांबी 21.375 किमी आहे. त्यातील नांदगाव ते पानेवाडी याची 13.695 किमी दु पदरीसाठी असेल. उर्वरित पानेवाडी ते मनमाड ही 7.71 कीमी लांबी चौपदरी अशी एकूण 25 मीटर रुंदीसाठी आहे. मनमाड ते पानेवाडी या लांबीत रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे, हायमास्ट, बस थांबे इत्यादीची तरतूद गृहीत धरण्यात आलेले असल्याचे देखील खा. डॉ.भारती पवार यांनी सांगितले.

कामाचे नाव जळगाव पाचोरा भडगाव चाळीसगाव नांदगाव मनमाड (नांदगाव मनमाड) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 जे सां. क्र. 147/425 ते 468/800 या लांबीमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे हे काम (ईपीसी) तत्वावर केले जाणार असून याचा मोठ्या प्रमाणावर प्रवाश्यांना फायदा होणार आहे व दळणवळण देखील सुखरूप होणार आहे. नांदगाव मनमाड रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी जी व देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांचे खा.डॉ.भारती पवार यांनी आभार व्यक्त केले.