सेंद्रिय शेतीमाल वाहतुकीसाठी 11 गटांना वाहनांचे वाटप

26

🔹शेतीमालाच्या सुलभ विपणना साठी शासन प्रयत्नशील -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अमरावती(दि.5एप्रिल):- सेंद्रिय शेती उत्पादनांना मोठी मागणी असते. त्यामुळे सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सेंद्रिय शेती उत्पादनांच्या सुलभ विपणनासाठीही शासन प्रयत्नरत असून, त्याअंतर्गत गटांना उपलब्ध करून दिलेली वाहने शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत पारंपरिक कृषीविकास योजनेत शेतकरी बांधव व गटांना सेंद्रिय शेतीमालाच्या वाहतुकीसाठी वाहनांचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.माजी जि. प. सभापती जयंतराव देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, अनिल खर्चान यांच्यासह विविध अधिकारी, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, शेतीमालासाठी बाजारपेठ मिळवून देणे, प्रक्रिया सुलभ करणे यासाठी शासनाकडून ‘विकेल ते पिकेल’ कार्यक्रमासह विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी होणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. शेतमाल वाहनामुळे मालाची ने- आण करणे अधिक सोयीचे होईल. शेतकरी पाहिजे त्या बाजारपेठेत आपला शेतमाल विक्रीस नेऊ शकतील.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंद्रिय शेतकरी बचत गट (करजगाव) येथील गट प्रवर्तक देवराव मोलके, जय बाबा सेंद्रिय शेती गटाचे (आमला) सदस्य प्रीतीश नेरकर, एकता सेंद्रीय बचत गटाचे (शेंदुर्जना) सदस्य शेख हारूण शेख मोहम्मद, युवा सेंद्रिय शेतकरी बचत गटाचे (टेंभुरखेडा) सदस्य रवींद्र निंभोरकर,पिंगळाई कृषी विज्ञान मंडळाचे (लेहेगाव) गट प्रवर्तक विजय तट्टे, बळीराजा सेंद्रीय शेती उत्पादक गटाचे (हिंगणी) दीपक तायडे, सेव्हन व्हील सेंद्रिय शेतकरी गटाचे (कुंभरगाव) धीरज मानकर, सुयश सेंद्रिय शेती उत्पादक गटाचे सदस्य बळीराम हेकडे, उत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी गट (वायगाव), संत जाटूबाबा सेंद्रिय बचत गटाचे प्रवर्तक लक्ष्मण सावलकर, भानुदास महाराज सेंद्रिय शेतकरी गटाचे (तिवसा) नीळकंठ खाकसे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतमाल वाहनाच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या.श्री. चवाळे यांनी प्रास्तविक केले.