महात्मा फुले नावाचं मुलभूत क्रांती विज्ञान

25

तुम्ही सावित्रीमाईंना शिकवलं नसतं तर
आज आमच्या माता-भगीनी
शाळा-कॉलेजात शिकल्या नसत्या
आणि स्वाभिमानी आयुष्य जगू शकल्या नसत्या.

तुम्ही ‘शेतक-यांचा आसूड’ लिहून
भारतीय शेतीच्या शोषणाचं षडयंत्र
शास्त्रीय पद्धतीनं समजून सांगीतलं.

तुम्ही वैदिक व्यवस्थेला विवेकवादी उत्तरं देत
आजच्या भारतीय लोकशाहीचा पाया रचला
ज्याची कोणशीला कधी काळी
गौतम बुद्धानं रचली होती.

बुद्ध कबीर आणि फुले
अशी बाबासाहेबांच्या गुरुंची परंपरा सांगीतली जाते
त्यात तुमचा आदरार्थी उल्लेख यासाठी की
तुम्ही प्रत्येक शोषण व्यवस्थेला
अगदीच समर्पक प्रायोगीक उत्तरं दिली
ज्यांची फळं आम्ही आज चाखतो आहोत.

तुम्ही पुण्यात राहून कुमारी आणि विधवांचे
बाळांतपणं केले, त्यांच्या पुनर्विवाहाचा आग्रह धरला,
हे आठराव्या शतकातल्या
कट्टर धार्मिकतेला कदापी मंजूर नव्हते.

तुम्ही यशवंताला ओटीत घेऊन
एकाच वेळी कुमारी मातेच्या विवंचनेचा
आणि निराधार होवू घातलेल्या लेकराच्या पालकत्वाचा प्रश्न मिटवला.

हंटर कमिशनपुढं तुम्ही सर्वांसाठी नि:शुल्क आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण आणि स्त्रीयांच्या शिक्षणाचा आग्रह धरला जो देशाच्या मनुस्मृतीला कदापी मंजूर नव्हता आणि तरीही तमाम कट्टरपंथींचा राग द्वेश स्विकारून
तुम्ही आपला सत्यधर्म मांडला
हे या देशातल्या तमाम माय-बहिनींनी
काळजावर नोंदवून ठेवावी अशीच गोष्ट आहे.
त्यांच्या आजच्या सुखी, समृद्ध जीवनाचा पाया
त्या कठोर निर्दयी काळात
तुम्ही कृतीशील पद्धतीने रचला होता
आणि मग बाबासाहेबांनी तर या सगळ्या बाबींना
रीतसर राज्यघटनेचाच भाग बनवून कळसच काढला.

तुमच्या सुरुवातीच्या सात आठ मुलींच्याच शाळेत
सावित्रीमाईंच्या वर्गात ही मुक्ता साळवे शिकली
जीचा निबंध केवढा क्रांतीकारी…
‘आम्ही धर्म नसलेली माणसं’ म्हणाली आणि तमाम बहिष्कृतांच्या व्यथा वेदनांचा पाढा वाचला.
हीच ती लहुजी उस्ताद साळवेंची नात.
लहुजी उस्तादाच्या तालमीचं सुरक्षाबळ
या आरंभीच्या काळात या शिक्षण व्यवस्थेला, सावित्रीमाईला लाभलं आणि देशाच्या स्वातंत्र्यालाही गब्बर महापुरुष दिले
ते ही याच उस्तादांच्या तालमीनं
हा ही आमच्यासाठी गौरवाचाच इतिहास.
हे तुमच्या एकुणच विचारधारेला
आणि शिक्षण व्यवस्थेला दिलेलं बळ आमचं मुठभर मास वाढवतं.

तुम्ही इश्वराला ‘निर्मिक’ म्हणालात
हे मानवाला निसर्गाच्या अधीक जवळ नेणारं आहे.
हे विज्ञानालाही, विवेकालाही अधीक जवळचंच वाटतं.

“एवढे अनर्थ सगळे एका अविद्येने केले” म्हणालात तुम्ही.
या आपल्या अल्पाक्षरी कवितेतून तुम्ही शोषणाची साखळीच जणू समजावून सांगीतली. कधी कविता, कधी नाटक, कधी निबंध अशा सगळ्या साहित्यशाखाही तुम्ही गरजेनुसार चपलखपणे हाताळल्या.आणि म्हणुनच हे तुमचं समाज सुधारणेसाठी साहित्याचा वापर करणं आम्हाला अनुकरणीय वाटतं.

या देशाचं महिला शिक्षण, वंचितांचे न्यायहक्क, पुरोगामी,
परिवर्तनवादी, विवेकवादी, सत्यधर्मी चळवळींचा विचार आज तुम्हाला सोडून करता येत नाही.

आज ११ एप्रिल,
तुमचा जन्म १८२७चा.
तुम्हाला जन्मुन २९४ वर्षे झाली.
तुमचा स्मृती दिन २८ नोव्हेंबर १८९० चा.
केवळ त्रेसस्टच वर्ष तर तुम्ही जगलात
पण काय क्रांतीकारी,
कसली कसली आव्हाणं स्विकारलीत
कसल्या कसल्या अराजकांशी भिडलात,
किती अवहेलना सहन केलात न डगमगता.
हे मानवतावादी बळ कुठून एकवटलं होतं तुमच्या अंगी.
भवतालाच्या दीन, दुबळ्या, शोषीत, वंचीतांचा, अबलांचा आवाज होवून लिहीत बोलत आणि कृती करत राहिलात.

_तुमची जयंती !
मी तुमच्या चिवट सत्यधर्मी वर्तनाला अंत:करणपुर्वक अभिवादन करतो_

📚💐🙏
✒️लेखक:-गझलकार प्रा डॉ मुकुंद राजपंखे सर
(पदवी व पदव्युत्तर इंग्रजी विभाग प्रमुख
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई. जि बीड.)
मो : 9881294226.

▪️संकलन:-नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी,बीड जिल्हा)मो- 8080942185