आंबेडकरी अनुयायांचा आदर्श

23

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनाचे भीषण संकट असल्याने सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आहे. दरवर्षी १४ एप्रिलला विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते पण यावर्षी कोरोनामुळे आंबेडकर जयंती सार्वजनिकरीत्या साजरी न करता घरीच उत्साहात साजरी करावी असे आव्हान मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी केले . त्याला प्रतिसाद देत आंबेडकर अनुयायांनी घरीच पण उत्साहात आंबेडकर जयंती साजरी केली. आंबेडकर जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अनेकांनी आपल्या घरावर ध्वज उभारला. घरासमोर रांगोळी काढून डॉ बाबासाहेब आंबेडकरांसह सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करुन त्यांच्या प्रतिमेसमोर समतेचा दिवा पेटवून समतेचे प्रज्ञासूर्य ठरलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.

यादिवशी अनेकांनी आपल्या घरातील कोरडा शिधा गरिबांना वाटला, तर काहींनी कोरोनामुळे संकटात सापडलेल्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात वाचलेली पुस्तके आणि भेटलेली माणसे या बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे काहींनी वाचनालय आणि ग्रंथालयांना पुस्तके दान केली. तसेच एमपीएससी व युपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पुरवले. आंबेडकर जयंतीच्या दिवशी सर्वांनी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी तर सलग चौदा तास वाचन करुन महामानवाची जयंती साजरी केली. सलग १४ तास अभ्यास करून महामानवाला अभिवादन करण्याची विद्यार्थ्यांची कृती जितकी स्पृहणीय आहे तितकीच ती अनुकरणीयही आहे.

महामानवाचे विचार समजून घ्यायचे असेल तर वाचना शिवाय तरणोपाय नाही हेच या विद्यार्थ्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. कोरोनाच्या संकटात राज्यात रक्ताचा अभूतपूर्व असा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे राज्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानाला आंबेडकरी तरुणांनी भरभरून प्रतिसाद देत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात हजारो तरुणांनी रक्तदान करून हजारो बाटल्या रक्त संकलित केले. काहींनी प्लाझ्मा दान करुन कोरोनाबाधित रुग्णांना जीवदान दिले. काहींनी मास्कचे तर काहींनी सॅनिटायजरचे घरोघरी जाऊन वाटप केले. आंबेडकरी तरुणांच्या या सामाजिक बांधिलकीचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून त्यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

कोरोनारूपी संकटात घराबाहेर न पडता, लॉक डाऊनचे नियम पाळत आंबेडकरी अनुयानांनी बाबासाहेबांची जयंती साजरी करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. आंबेडकरी अनुयानांनी जो संयम व वैचारिक प्रगल्भता दाखवून दिली त्याबद्दल आंबेडकरी अनुयायांचे मनापासून आभार व अभिनंदन !

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५