आंबेडकरी क्रांतीजाणिवाचा काव्यवेध

28

परिवर्तन विचार मंच नागपूरच्या वतीने दुसरे ऑनलाईन फुले – आंबेडकर साहित्य संमेलन दिनांक- ११ एप्रिल २०२१ ते १४ एप्रिल २०२१ पर्यंत घेण्यात आले.१३ एप्रिल २०२१ ला संमेलनाचे तिसरे सत्र कविसंमेलनाचे ठेवण्यात आले.हे कवी संमेलन युटूब व फेसबूकवर प्रसारीत करण्यात आले.या कविसंमेलनात कवियत्री सुरेखा ताकसांडे ,सुनंदा गायकवाड,कवी माधव जांभुळे ,संजय सायरे,विलास गजभिये,एम.एस.वानखेडे,जया कलिहारी,संदीप गायकवाड,व भूपेश वराडे यांना सहभाग घेतला.या कविसंमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ कवी भूपेश वराडे यांनी भूषविले तर सुत्रसंचालन कवी संदीप गायकवाड यांनी केले.

कोविड-१९ च्या महामारीने जवळपास एक वर्षापासून जगात मोठे थैमान मांडले असून नव्या वर्षात मोठ्या प्रमाणात लोकांचे प्राण जात आहेत . आरोग्य यंत्रणा कमकुवत होत आहे.सुविधा अभावाने अनेक लोकांचे हकनाक बळी जात आहेत .तर देशाचे राजकर्ते निवडणूकीच्या प्रचारात दंग आहे.अक्कल नसलेले नेतृत्व या महामारीला आटोक्यात आणण्यात अयशस्वी झाले आहेत.अशा भयंकर दहशतीतही आंबेडकरी क्रांतीजाणिवा नव्या आव्हानाचा सामना करत आहे.फुले – आंबेडकर यांनी या देशाच्या मनुरोगावर जबरदस्त इंजेक्शन देऊन नवा क्रांतीकारी माणूस निर्माण केला आहे.यांच जाणिवेतून दुसरे ऑनलाईन फुले आंबेडकर साहित्य संमेलन पार पडले आहे.

कविसंमेलनाच्या सुरवातीला लोककलाकार विरा साथीदार यांचे निधन झाल्याने त्यांना शब्दांजली वाहण्यात आली . दैनिक बहुजन सौरभचे मुख्य संपादक मिलींद फुलझले यांनी त्याच्या कार्यकर्तृत्वाचा संघर्ष आपल्या भावनेतून व्यक्त केला.
कविसंमेलनातून क्रांतीदर्शी कविता ऐकायला मिळाल्या.कवियत्री सुरेखा ताकसांडे यांनी ‘लसीकरण’ही कविता सादर करून लसीकरणाचे सत्यस्वरूप मांडले.कवी माधव जांभुळे यांनी ‘संविधानाचं पातं’ या कवितेतून

देशाच्या तानाशाहीला
हटवले पाहिजे.
खंबीर बनून सर्वानी
लढलेच पाहिजे.

या कवितेतून बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनमोल विचारांचे महत्व मांडले.कवियत्री सुनंदा गायकवाडने ‘तू महिलांचा दाता’या कवितेतून स्त्रीयांसाठी आंबेडकरांनी जी मेहनत घेतली त्यांची जाणीव करून दिली.

कवी संजय सायरे यांनी ‘अमन’या कवितेतून वर्तमानातील वास्तविकतेची नोंद घेतली.शेतकरी जीवनातील दुःखावर ‘कहर लई माजला ‘ही कविता एम.एस.वानखेडे यांनी अप्रतिम सादर केली.कवी विलास गजभिये यांनी ‘जिंदाबाद ‘ही नव्या बदलाची गर्जना करणारी कविता सादर केली.कवियत्री जया कलिहारीने ‘सावित्रीमाई’ या कवितेतून सावित्रीमाईच्या त्यागाची जीवनातील संघर्ष मांडला.कविसंमेलनाचे संचालन करणारे संदीप गायकवाड यांनी ‘धम्मजागर’ही अप्रतिम कविता सादर केली.

भीमाच्या तरूणांनो।एकसाथ चला ।।
सकल मानवा।मित्रत्व माना।।
युगवीर मानवतेचा ।क्रांतीयोध्दा ठरला।।
लोकशाही तत्वाचा।धम्मजागर केला।।

कविसंमेलनाचे अध्यक्ष भूपेश वराडे यांनी’काफिर ‘ या कवितेतून अस्वस्थ असलेल्या मनाचे अचूक स्पंदन भावाकिंत केले आहेत.वर्तमानाचे भिषण वास्तव आपल्या मनोगतातून व्यक्त केले.या कार्यक्रमाला मा.सिध्दार्थ कांबळे,संध्याताई राजूरकर,विलास गजभिये,संजय सायरे यांनी मेहनत घेतली.

✒️लेखक:-प्रा.संदीप गायकवाड