ओडिशा सरकारच्या धर्तीवर पत्रकारांना फ्रंटलाइन कोरोना वॉरियर घोषित करा व मृत्यू झालेल्या पत्रकाराच्या कुटुंबियाला १५ लाखांची मदत द्या

🔸खासदार बाळू धानोरकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.2मे):-कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर सर्वत्र एक वर्ग नेहमी कार्य करीत राहिला. नेहमी संकटकालीन परिस्थिती व सामान्य जनता यातील दुवा म्हणून पत्रकार कार्य करीत आहे. दुसऱ्या लाटेत देखील हा वर्ग मोठ्या प्रमाणात २४ तास सेवा देत असतो. कुटुंब घरी सोडून ते कार्य करीत आहेत. ओडीशा सरकारने वृत्तपत्र व टीव्ही पत्रकारांना फ्रंटलाइन कोरोना वॉरियर घोषित करून त्यांना कोरोनामुळे मुत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियाला १५ लाखांची मदत देखील देण्यात येत आहे. त्यांचं धर्तीवर महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारचा निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

देशात, राज्यात तसेच जिल्ह्यात देखील पत्रकार २४ तास आपली सेवा बजावत आहेत. त्यामध्ये आतापर्यंत देशात जवळपास १६५ पत्रकार मृत्यू पावले आहे. अलीकडेच आजतक या वृत्त वाहिनीचे प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांच्या देखील कोरोनामुळे मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात देखील तालुक्यावर काम करणाऱ्या पत्रकारांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. या पत्रकारांच्या मृत्यूने समाजाचीच नाही तर त्यांच्या कुटुंबाची देखील भरून न निघणारी हानी होत असते.

जिल्ह्यातील किंवा राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण थांबल्याच्या बातम्या आल्या. केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजन व धोरणामुळे महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी थांबला. कोरोना बाधितांची संख्या व बाधित मृत्यूची संख्या दिवसागणिक वाढत असतांना प्रिंट व इलेक्ट्रानिक मीडियाचे पत्रकार जीवाची बाजी लावून वृत्त संकलन करीत आहेत. अशा परिस्थित पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी राज्य सरकारने घेऊन निर्णय घेऊन पत्रकारांना फ्रंटलाइन कोरोना वॉरियर घोषित करून त्यांना लसीकरण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, मागणी, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED