सुलतानपूर येथील जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

21

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.6मे):-लोणार तालुक्यातील सुलतानूपर येथील भारतीय लष्कारातील मराठा रेजीमेंटला असलेले जवान पवन विष्णू रिंढे यांचे राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात कर्तव्यावर असताना आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर 4 मे रोजी रात्री उशिरा शासकीय इतमामात लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते राजस्थानमधील जोधपूर येते कर्तव्यावर होते. तेथे जवान पवन विष्णू रिंढे यांचे 2 मे रोजी आकस्मिक निधन झाले. 2018 मध्ये ते सैन्यदलात भरती झाले होते. बेळगाव येथे त्यांनी त्यांचे सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले होते.

दरम्यान, 4 मे रोजी सायंकाळी त्यांचे पार्थिव सुलतानपूर येथे त्यांच्या मुळ गावी आणण्यात आले. जवान पवन रिंढे यांच्या पार्थिवाचे त्यांच्या निवासस्थानासमोर नातेवाईक व ग्रामस्थांनी अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या निवासस्थानी नातेवाईक व ग्रामस्थांनी कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करत अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांचे पार्थिव मोजक्याच नातेवाईकांसह स्मशानभूमीत नेण्यात आले. येथे सर्वप्रथम लोणारचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

सोबतच सैन्यदलातील नाईक सुभेदार बळीराम खांडेभराड, संतोष लगड, हवालदार विनोद इंगळे, सैनिक ओमप्रकाश गाडेकर, गोपाल टकले व मेहकर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक जायभाये, माजी सैनिक कल्याण विभागाचे वसतिगृह अधिक्षक संजय गायकवाड, अर्जुन गाडेकर, सरपंच चंद्रकला अवचार यांनीही त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी सैन्यदलातील जवानांनी सलामीही दिली. सोबत ‘पवन रिंढे अमर रहे।’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी ग्राम विकास विकास अधिकारी संतोष क्षीरसागर, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर सानप, निवृत्ती सानप, उपसरपंच प्रदीप सुरूशे, तलाठी प्रमोद दांदडे यांच्यासह मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत कोराना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.