चमत्काराने ओतप्रोत जीवन!

55

[संत गोरोबा काका पुण्यतिथी]

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती! देह कष्टविती परोपकारे!!” असे संतांसाठी म्हंटले गेले. ते सत्य असल्याची प्रचीती ठायी-ठायी येते. संत महात्मे हे चंदनासारखे भासतात, चंदन जसे स्वतः झिजून इतरांना सुगंध देतो अगदी त्याच प्रमाणे संत स्वतः झिजून जगाच्या कल्याणाचा मार्ग तयार करतात. असेच प्रपंच व परमार्थ वेगळा न मानता प्रपंच परमार्थमय करणारे संत गोरोबा काका ऊर्फ गोरा कुंभार देखील एक श्रेष्ठ संत या महाराष्ट्र भूमीत होऊन गेले.संत गोरोबा काका म्हणून सर्वसामान्यांना ते अधिक जवळचे वाटतात, एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचे आयुष्य व्यतीत झाले. विठ्ठलाप्रती आपला भक्तीभाव जपत त्यांनी आपला संसार परमार्थमय केला. “नर करणी करे सौ, नर का नारायन होय।” या उक्तीप्रमाणे त्यांनी विठ्ठल परब्रह्माची महिमा सर्वांना पटवून दिली. जणू विठ्ठल भक्तच विठ्ठल होऊन गेले. संतश्रेष्ठ गोरोबा काका हे संत नामदेवजी आणि संत ज्ञानेश्वरजी यांच्या काळातील असल्याचे मानले जाते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पहायला मिळतात. जसे –

“तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम। देह प्रपंचाचा दास, सुखे करी काम।।”

सगळ्या संत मंडळींमध्ये ते वडील होते, संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना काका ही उपाधी बहाल केली होती. ते विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले, निर्गुण निराकार परब्रम्हाचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार! स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून संतत्व जपत असत. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची योग्यता होती.आपली रोजची कर्मे जवाबदारीने करत. कुठेही असो घरीदारी, डोंगर-दऱ्यात, अरण्यात पण त्यांच्या मनात मानव कल्याणाचा ध्यास असे. स्वार्थी व लोभी मनुष्य वारकरी संत म्हणून त्यांना मान्य नाही. संतश्रेष्ठ गोरोबा हे आपले नित्यकर्म करत असतांना देखील विठ्ठल नामात तल्लीन असत. कुंभारकाम करत असतांना पांडुरंगाचे गुणगान सतत त्यांच्या मुखी असायचे. एकदा त्यांची पत्नी आपल्या रांगत्या मुलाला अंगणात ठेऊन पाणी आणायला गेली. त्यावेळी अंगणात ते माती तुडवीत होते.

नामसंकीर्तनात ते इतके तल्लीन झाले की रांगणारे बाळ त्यांच्याकडे येत असल्याचे भान देखील त्यांना राहिले नाही. बाळ जवळ येऊन मातीच्या गाऱ्यात पडले व त्यांच्या पायाखाली तुडविले गेले. याची जाणीव देखील त्यांना राहीली नाही. विठ्ठल भजनात तल्लीन गोराबांना तुडवितांना मूल रडत असल्याचे देखील लक्षात आले नाही. पाणी घेऊन आलेल्या त्यांच्या पत्नीने अंगणात आपल्या चिमुकल्याला शोधले, पण तो सापडला नाही. तिचे लक्ष पती तुडवीत असलेल्या मातीकडे गेले, ती माती रक्ताने लाल झालेली तिला दिसली. तिने हंबरडा फोडला,आकांत केला. दोघांवरही आभाळ कोसळले होते. प्रायश्चित म्हणून गोरोबांनी आपले दोन्ही हात तोडून घेतले.

हात तुटल्याने त्यांचा व्यवसाय देखील बसला. असं म्हणतात की, स्वतः विठ्ठल-रुखमाई त्यांच्या घरी येऊन राबू लागले आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा बहरला. पुढे आषाढी वारीच्या निमित्ताने संत मंडळी पंढरपुरास निघाली, वाटेत संत ज्ञानेश्वर आणि नामदेवांनी तेरढोकी येथून गोरोबा आणि त्यांच्या पत्नीला देखील सोबत घेतले. गरुड पारावर संतशिरोमणी नामदेवजी कीर्तनाला उभे राहीले. संत ज्ञानेश्वरजींसह सकल संत मंडळी कीर्तन ऐकावयास बसली. संतश्रेष्ठ गोरोबा आपल्या पत्नीसह कीर्तनात बसले होते. त्या दरम्यान वारकरी पांडुरंगाचा नामगजर करीत हात वर करून टाळ्या वाजवू लागले. गोरोबांनी देखील अभावितपणे आपले हात उचलले, त्याक्षणी त्या थुट्या हातांना हात फुटले. सर्वांना अतिशय आनंद झाला संत मंडळीनी विठ्ठलाचा जयजयकार केला. पतीचे हात पाहून तिला समाधानाचे भरते आले.

तिने चालू असलेल्या कीर्तनात पांडुरंगाची करुणा भाकली, प्रार्थना केली, “पांडुरंगा माझे मूल पतीच्या पायी तुडविले गेले, त्यामुळे आम्ही फार दुःखी-कष्टी आहोत. तुला माझी करुणा येऊ दे, माझे मूल मला परत दे!” ती पुन्हा पुन्हा विनवणी करू लागली…. आणि काय आश्चर्य! त्या कीर्तनात चिखलात तुडविले गेलेले तिचे बाळ रांगत-रांगत तिच्याकडे येत असल्याचे तिने पाहीले. आनंदाच्या भरात तिनं बाळाला कडेवर उचललं. सगळ्यांनी विठ्ठलाच्या नावाचा जयघोष केला, आनंदाने सभामंडप दुमदुमून गेला. संतश्रेष्ठ गोरोबा काकांचे जीवन हे त्यांच्या जन्मापासूनच चमत्कारमय घडत गेल्याच्या अनेक आख्यायिका इतिहासात वाचण्यास मिळतात. मात्र खरेच असे घडत गेले का? हा संशोधनाचा विषय आहे.आजच्या दिवशी म्हणजेच चैत्र कृष्ण त्रयोदशी शके १२३९ला (२० एप्रिल १३१७) संत गोरोबा काकांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. त्यांचे समाधीस्थळ उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी या गावी आहे. त्या ठिकाणी असलेलं त्याचं घर आणि मुल तुडविलेली जागा आज देखील भाविक दाखवितात, हे विशेष!

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांच्या पावन पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलक व लेखक:-श्री निकोडे कृष्णकुमार गुरुजी.(संत व लोकसाहित्याचे अभ्यासक.)मु. पो. ता. जि. गडचिरोली.
व्हा. नं. ९४२३७१४८८३.