गोंदवले बुद्रुक येथे प्रभाकर देशमुख यांच्या पुढाकाराने डी.सी.एच.सी व सी.सी.सी

    73

    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686109

    माण(दि.9मे):- तालुक्यातील कोविड-१९ रुग्णांच्या सेवेत गोंदवले येथे लवकरच अत्याधुनिक रुग्णालय सुरु होणार आहे. तीस ऑक्सिजन बेडचे कोविड रुग्णालय व शंभर बेडचे आयसोलेशन सेंटर सुरु होत आहे अशी माहिती माजी आयुक्त व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिली.माण व खटाव तालुक्यातील विकासकामांच्या व सामाजिक कार्यात अग्रेसर राहून काम करणाऱ्या प्रभाकर देशमुख यांनी आणखी एक गरजेचे सामाजिक काम हातात घेऊन कोरोना काळात गरज असताना कोरोना रुग्णालय सुरू करत असल्याने जनतेची मोठी सोय होणार आहे.

    पत्रकारांना माहिती देताना श्री. देशमुख म्हणाले, ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थानचे रुग्णालय शासनाने अधिग्रहित केले आहे. मंदिर समितीच्या संमतीने या रुग्णालयात ड्रीम सोशल फाऊंडेशन कडून सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. ऑक्सिजन लाईन, तीस फाऊलर बेड, छत्तीस आऊटलेट तयार करण्यात आली आहेत. शासन या ठिकाणी स्टाफ व औषधे देणार आहे. सोबत आम्हीसुद्धा औषधे देणार आहोत. ग्रामपंचायत पाणी पुरवठा करणार आहे. तर मंदिर समिती शिधा देणार आहे.श्री. देशमुख पुढे म्हणाले, श्रीमंत रामराजेंच्या चैतन्य हायस्कूल मध्ये शंभर बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करत आहोत.

    या ठिकाणी मंदिर समिती बेड, जेवण आदी साहित्य देणार आहे. तर ड्रीम सोशल फाऊंडेशन औषधे व इतर साहित्य लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करुन देणार आहोत. तसेच काही दानशूर व्यक्ती व संस्थांच्या माध्यमातून ऑक्सिजन काॅन्संट्रेटर उपलब्ध करून देत आहोत.श्री. देशमुख पुढे म्हणाले, कोविड-१९ रुग्णांची वाढती संख्या व उपलब्ध बेडची संख्या यात मोठी तफावत आहे. त्यामुळे या रुग्णांना मोठ्या प्रमाणात व चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि लवकरच आम्ही त्या सुविधा उपलब्ध करुन देत आहोत.