खरे महात्मा व बुकर टी वॉशिंग्टन कोण ?

108

[महात्मा दिवस]

आज खरंच चिक्कार आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस उजाडला आहे. शेतकऱ्यांचे कैवारी, शिक्षणसम्राट, शुद्रातिशूद्रांचे आबा, कांतिसूर्य जोतीराव गोविंदराव फुले यांचा आज ११ मे हा गौरव दिन आहे. जनतेद्वारे दिलेला हा सन्मान खराखुरा गौरव आहे. तो स्वयंघोषित वा एकट्या-दुकट्याने दिलेला मुळीच नाही. जनतेने दि.११ मे १८८८रोजी भव्य समारंभ आयोजित केला. त्यात क्रांतिबा जोतिबा ‘महात्मा’ पदवीने सन्मानित झाले. दि.११ मे १८८८ म्हणजेच आजच्या दिवशी रायबहादूर वड्डेदार यांनी सर्वांच्या वतीने क्रांतिसूर्य जोतीरावजी फुले यांना ‘महात्मा’ ही उपाधी बहाल केली. त्याकाळी कामगार युनियनच्या प्रमुख कार्यकर्त्यांस रायबहादूर संबोधण्याची पद्धत रूढ होती.रायबहादूर हे नाव नाही तर सन्मानाचे संबोधन आहे.

बहुजनांची बालविद्या, स्त्रीमुक्ती, स्त्रीशिक्षण, सामाजिक हक्क, वंचितांना मानवाधिकार, अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीपुरुष तथा जातीय भेदाभेद आणि अन्नदाता बळीराजा शेतकऱ्याची गुलामी अशा सर्वच क्षेत्रात महान व अविस्मरणीय कार्य करणारे सर्वसामान्यांचे आबासाहेब कांतिसूर्य जोतीरावजी फुले यांच्या कार्यांची दखल शासनाने नव्हे तर सामान्य कष्टकरी जनतेने घेतली. त्यांच्या या अचाट कार्यकर्तृत्वांचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी ही आजच्या दिवशी देण्यात आली होती. त्या घटनेला आज १३३ वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेलसरचे सुपुत्र रायबहादूर – विठ्ठलराव कृष्णाजी वड्डेदार यांनी जोतिबांना ‘महात्मा’ उपाधी ससन्मान बहाल केली. जोतीबा फुले यांनी वयाची ६० वर्षे व समाजकार्याची ४० वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे सहकारी रायबहादूर – विठ्ठलराव वड्डेदार, रायबहादूर – नारायण मेंघाजी लोखंडे व तमाम कष्टकरी वर्गांनी त्यांच्या अतुलनीय कार्यकर्तृत्वांचा समारंभपूर्वक गौरवपूर्ण सत्कार केला.

सदर सत्कार सोहळा रायबहादूर वड्डेदार यांनी मुंबईतील मांडवी कोळीवाड्यातील ‘मुंबई देशस्थ मराठा जाती’ या धर्मसंस्थेच्या सभागृहात आयोजित केला होता. बडोदा संस्थानचे पुण्यशील श्रीमंत राजे सयाजीराव गायकवाड यांनाही अगत्याचे निमंत्रण देण्यात आले होते. जोतीरावजी फुले यांना भारताचे ‘बुकर टी वॉशिंग्टन’ अशी भारदस्त पदवी द्यावी, असा निरोप त्यांनी उलट टपाली पाठवला होता. ‘आपल्या उग्र तपस्येने महाराष्ट्रातील स्त्री-पुरुषांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे, त्यांच्यात नवचैतन्य, जागृती, उमेद व क्रांती निर्माण करणारे जोतीराव फुले हेच खरेखुरे महात्मा आहेत. त्यांना ‘महात्मा’ ही पदवी देणेच योग्य आहे, असे वड्डेदारांनीही आपले मत प्रदर्शिन केले. तद्वतच जनतेच्या वतीने आपण आबासाहेब जोतिबांना ‘महात्मा’ ही उपाधी प्रदान करत असल्याचे भरसभामंडपात जाहीर केले होते.

महात्मा म्हणजे महान असा आत्मा. महात्मा ही उपाधी महान कर्तबगारी गाजविणाऱ्या माणसाच्या नावासमोर लावतात. हे जगजाहीर झाले आहे की मोहनदास गांधीजींना महात्मा ही पदवी कुणीही दिलेली नाही अथवा तशी नोंद कुठल्याच दस्तावेजात आढळत नाही. तसेच लोकमान्य, स्वातंत्र्यवीर, हिंदूहृदय सम्राट, समर्थ, स्वामी, माऊली आदी पदव्या या जनतेने दिलेल्या नाहीत तर त्या त्या व्यक्तींनी स्वतःहून लावून घेतल्या म्हणजेच त्या स्वयंघोषित आहेत. मात्र याला अपवाद जोतीरावजी फुलेंचा! त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी जनतेने उत्स्फुर्तपणे दिली होती व त्यासाठी भव्यदिव्य महोत्सव घडवून आणला होता. “जनसेवा हीच निर्मिकसेवा आहे. हजारो वर्षे ज्यांना अस्पृश मानले गेले. ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला गेला. ज्यांना मानवाधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले. त्यांच्यासाठी काम करणे मी माझे परम कर्तव्य समजतो.” असे रोखठोक प्रतिपादन शिक्षणसम्राट महात्मा फुलेजींनी त्या समारंभप्रसंगी केले होते.

समाजसुधारक रायबहादूर – विठ्ठलराव वड्डेदार व त्यांचे कुटुंबीय हे मुंबईत स्थायिक झाले होते. ते जोतिबांच्या सत्यशोधक चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते होते. बहुजन समुदायांच्या शिक्षण, कामगार, सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात त्यांनी बहुमोल कार्य केले. पुण्यात इ.स.१८८५साली झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आंदोलन केले. त्यात त्यांनी एका शेतकऱ्याचा २४ फुटांचा पुतळा उभारून सर्वांचे लक्ष केंद्रीत केले होते. मुंबई महापालिकेचे जागरूक सदस्य म्हणूनही त्यांनी २३ वर्षे काम पाहिले होते. तसेच इ.स.१८९३मध्ये मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याच्या कामीही मोलाची प्रमुख भूमिका बजावली. त्यासाठी त्यांनी राणीच्या बागेत साठ हजार नागरिकांचा शांतता महामेळावा घेतला होता. अशा महान समाजसुधारक व्यक्तीच्या हस्ते क्रांतीसूर्य जोतीरावजी फुले सन्मानित झाले. त्याची आठवण बहुजनांना राहावी म्हणून हा ‘महात्मा दिन’ दरवर्षी मोठ्या आनंदोत्सवात साजरा होत असतो.

यावर्षी सन २०२१मध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे आपल्या महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन अंतर्गत कडक संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आले आहे. घरीच थांबून आनंदाचा सोहळा पार पाडता यावा, सर्वांना सहभाग घेता यावा म्हणून राज्यस्तरीय आभासी – ऑनलाइन पद्धतीने तो होऊ घातला आहे, असे कळते.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे सर्व जनतेला महात्मा दिनाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलक व लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.[संत-लोक साहित्य व इतिहास अभ्यासक.]मु. पो. ता. जि. गडचिरोली. व्हा.नं. ७४१४९८३३३९.