झाडीबोलीचे ज्येष्ठ कवी बापुरावजी टोंगे यांचे दुःखद निधन

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.12मे):-झाडीबोली साहित्य मंडळ वरोरा शाखेचे अध्यक्ष तथा आसगाव (पवनी ) येथे भरलेल्या २१ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बापुरावजी टोंगे यांचे आज ह्दय विकाराने वरोरा येथे दुःखद निधन झाले. ते ७६ वर्षाचे होते. त्यांचे मुळ गाव घोडपेठ असून त्यांंनी आजवर ११ ग्रंथाचे लेखन केलेले आहे.धावाधाव हा त्यांचा झाडीबोलीतील आत्मचरित्रपर ग्रंथ मराठी साहित्यविश्वात गाजला. मागील वर्षात त्यांच्या अमृतमहोत्सवीवर्षाच्या निमित्ताने वरोरा शाखेनी कलाविष्कारांचे सादरीकरण आणि मान्यवरांच्या मुलाखती असा विविधांगी कार्यक्रम आयोजित केलेला होता. तरूणांना लाजवेल असे त्यांचे कार्यकर्तृत्व होते. शाखेचे संचालन, कार्यक्रमाचे नियोजन ते उत्तमरित्या करीत असत.

कवी आणि संघटक म्हणून बापूरावजीचे कार्य मोठे – डाॕ. हरिश्चंद्र बोरकर
——————-
गेल्या ११ वर्षापासून ते वरोरा शाखेचे अध्यक्ष होते. कवी ,संघटक म्हणून त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे,असे प्रतिपादन डाॕ. हरिश्चंद्र बोरकर यांनी केले.

झाडीबोली चळवळीची हानी – ना.गो.थुटे
—————
बापुरावजी सारख्या कर्तृत्ववानाच्या जाण्याने झाडी बोली चळवळीची मोठी हानी झाली आहे , अश्या शोकसंवेदना ज्येष्ठ साहित्यिक ना.गो.थुटे यांनी केले .
बापुरावजीनी नवसाहित्यिकांना पुढे आणण्यासाठी मोठे योगदान दिले – बंडोपंत बोढेकर
—————————-
वरोरा शाखेचे उत्तम नियोजन करीत अनेक नवसाहित्यिकांना झाडीबोली प्रवाहास जोडणारे कवीवर्य बापुरावजी आगळेवेगळे व्यक्तीमत्व होते, असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.

याप्रसंगी ॲड. लखनसिंह कटरे, डाॕ. राजन जयस्वाल , हिरामण लांजे ,डाॕ.पाखमोडे ,डोमा महाराज कापगते , श्रीमती कुसूमताई अलाम, मिलिंद रंगारी ,पवन पाथोडे, नारायण निखाते, लोकराम शेंडे, मा.तू. खिरटकर , पंडीत लोंढे, डाॕ. धनराज खानोरकर ,अरूण झगडकर ,डाॕ. चंद्रकांत लेनगुरे , प्राचार्य रत्नमाला भोयर ,सुखदेव चौथाले तसेच सर्व झाडीबोली शाखेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.